दिग्दर्शक अनुराग कश्यपला लैंगिक अत्याचार प्रकरणी मुंबई पोलिसांनी बजावले समन्स

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Wednesday, 30 September 2020

अनुरागवर बॉलीवूड अभिनेत्री पायल घोषने बलात्कारासोबतंच अनेक गंभीर आरोप केले होते. अनुराग कश्यपला गुरुवारी मुंबईतील वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये पोहोचावं लागणार असल्याचं कळतंय. 

मुंबई-  दिग्दर्शक अनुराग कश्यपला लैंगिक अत्याचार प्रकरणात मुंबई पोलिसांनी समन्स बजावले आहेत. अनुरागवर बॉलीवूड अभिनेत्री पायल घोषने बलात्कारासोबतंच अनेक गंभीर आरोप केले होते. अनुराग कश्यपला गुरुवारी मुंबईतील वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये पोहोचावं लागणार असल्याचं कळतंय. 

हे ही वाचा: अमिताभ बच्चन बनले अवयवदाता, चाहते म्हणाले 'तुम्हाला तर हेपॅटायटिस आहे'  

एएनआय या वृत्तसंस्थेने केलेल्या ट्विटनुसार, मुंबई पोलिसांनी दिग्दर्शक अनुराग कश्यपला गुरुवारी वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये बोलवलं आहे. त्यांच्यावर पायल घोषने लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. अनुरागला सकाळी ११ वाजता पोलीस स्टेशनला पोहोचायचं आहे.काही दिवसांपूर्वी अभिनेत्री पायल घोषने व्हिडिओ पोस्ट करत अनुराग कश्यप विरोधात अनेक गंभीर आरोप लावले होते. तिने सांगितलं की त्यांची मैत्री फेसबुकवर झाली. त्यानंतर ती अनुरागला भेटली. तिस-या भेटीत अनुरागने तिला तिच्या घरी बोलवलं आणि तिथे तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.

पायलने अनुराग विरोधात गंभीर कलमांअंतर्गत केस दाखल केली आहे. पायल सतत अनुरागला अटक करण्याची मागणी करत आहे. सोबतंच तिने तिच्या जीवाला धोका असल्याचंही सांगितलं आहे. या कारणासाठी ती रामदास आठवले यांच्यासोबत नुकतीच महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देखील भेटली. या भेटी दरम्यान तिने स्वतःसाठी Y दर्जाच्या सुरक्षेची मागणी देखील केल्याचं कळतंय.   

anurag kashyap summoned by mumbai police in sexual assault case  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: anurag kashyap summoned by mumbai police in sexual assault case