प्लॅस्टिक फेकणाऱ्या व्यक्तीला अनुष्का शर्माने दिली तंबी!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 जून 2018

अनुष्काने लगेच त्या गाडीतील व्यक्तीला गाडी समोर घेण्यास सांगितले आणि कचरा फेकणाऱ्या व्यक्तीची खरडपट्टी काढली.

अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने नेहमीच सामाजिक कार्यासाठी पुढाकार घेतला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे जोडपं सोशल मिडीयावरुनही सतत समाज कामांबाबत व्यक्त होत असतात. या कामात अडथळा आणणाऱ्या एका व्यक्तीला सुनावल्याने अनुष्का पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 

विराट आणि अनुष्का गाडीतून प्रवास करताना त्यांना जवळून जाणाऱ्या गाडीतून एक व्यक्ती रस्त्यावर प्लॅस्टिक कचरा टाकताना दिसली. हे बघितल्यावर अनुष्काने लगेच त्या गाडीतील व्यक्तीला गाडी समोर घेण्यास सांगितले आणि कचरा फेकणाऱ्या व्यक्तीची खरडपट्टी काढली. रस्त्यावर प्लॅस्टिक का फेकले? असे विचारत कचऱ्यासाठी कचरापेटीचा वापर करा, असा सल्लाही त्या व्यक्तीला दिला. विराटने या घटनेचा व्हिडीओ काढत आपल्या सोशल मिडीया अकाउंटवर अपलोड केला आहे. या व्हिडीओला अनेकांनी पसंती दर्शविली आहे. 
 

तसेच विराट कोहलीने आपल्या ट्विटर अकाउंटवरुन स्वच्छतेसाठी पुढाकार घेण्याचं आवाहनही केलं आहे. आपण नेहमी आपल्या आजुबाजूला कुणीतरी कचरा फेकताना बघतो आणि समोरच्याला तसं न करण्यास सांगण्याची हिंमत ठेवत नाही. पण आपण स्वच्छतेबाबत जागृती निर्माण करायला पाहिजे. विराट आणि अनुष्का यांनी पर्यावरण बचाव, स्वच्छ भारत यांसारख्या अनेक अभियानांमध्ये सहभाग नोंदवला आहे. 
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anushka Sharma lashes out a man who throws a garbage on road