प्रायोगिक नाट्यचळवळीतील आद्यसंस्था

सांगलीच्या नाट्यविश्‍वात ‘ॲमॅच्युअर्स ड्रामॅटिक असोसिएशन’ ही प्रयोगशील नाट्यसंस्था राहिली. पुण्यात ‘प्रोग्रेसिव्ह ड्रामॅटिक असोसिएशन’ होती.
armature dramatic association and progressive dramatic association drama theatre group
armature dramatic association and progressive dramatic association drama theatre groupSakal

सांगलीच्या नाट्यविश्‍वात ‘ॲमॅच्युअर्स ड्रामॅटिक असोसिएशन’ ही प्रयोगशील नाट्यसंस्था राहिली. पुण्यात ‘प्रोग्रेसिव्ह ड्रामॅटिक असोसिएशन’ होती. त्याच धर्तीवर काम करणारी ही संस्था अनेक नवोदितांना रंगमंचावर नवनव्या प्रयोगाचं स्वातंत्र्य देणारी ठरली. नाट्यकार्यशाळा, नाट्यसंवाद, नाट्य अभिवाचन यातून या संस्थेने नाट्य चळवळ जोपासली.

- संजय पाटील, लेखक व अभिनेते

सांगलीत १९६६-६७ च्या आसपास नाटक बसवणाऱ्या काही संस्था कार्यरत होत्या. त्यातून मुख्यतः स्थानिक मंडळी सहभागी व्हायची. नोकरीनिमित्तानं त्या काळात काही अन्य गावांतील नाट्यवेडे लोक सांगलीत आलेले. नाशिक, पुणे, मुंबई, कोकण येथून आलेले हे शिक्षित तरुण आपापल्या गावातून सांगलीत नाट्य संस्कार घेऊन आलेले होते. त्यांना इथं स्वतःला आजमावून पाहायचं होतं.

त्या काळात अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समिती ही प्रामुख्यानं नाटक बसवणारी संस्था, पण तो ग्रुप ठरलेला. नवागतांना तिथे प्रवेश घेणं तसं जिकिरीचं होतं. यातूनच केवळ नाटक करणं, या उद्देशानं काही लोक एकत्र आले.

बहुतेक यात प्राध्यापक अधिक होते. डॉ. तारा भवाळकर, प्रा. मोरेश्वर फाटक, प्रा. मकरंद जोगळेकर, प्रा. व. ना. देशपांडे, मनोहर घाटे अशा हौशी समविचारी नाट्यकर्मींनी एकत्र जमून नाटक करण्याचं ठरवलं.

वालचंद कॉलेजमध्ये प्राध्यापक असलेले मोरेश्वर फाटक यांनी फाळणीनंतरच्या विस्थापितांच्या जीवनावर आधारित एक नाटक लिहिलेलं ‘का? असंच का?’ या नावाचं. १९६७ च्या दसऱ्याच्या दिवशी या नाटकाचा प्रयोग झाला. तिथून पुढं प्रतिवर्षी राज्य नाट्य स्पर्धेत नाटक करण्याचं ठरवलं.

पुण्यामध्ये त्यावेळी ‘प्रोग्रेसिव्ह ड्रामॅटिक असोसिएशन’ ही भालबा केळकर यांची संस्था आघाडीवर होती. पुण्याहून आलेले मकरंद जोगळेकर यांनी या संस्थेच्या नावावरून या ग्रुपला नामाभिधान केलं ते म्हणजे...

ॲमॅच्युअर्स ड्रामॅटिक असोसिएशन. पुण्याची संस्था पीडीए, तर सांगलीची एडीए. १९६७ च्या विजयादशमी दिवशी झालेल्या पहिल्या नाटकाच्या प्रयोगावरून तोच स्थापना दिवस ठरवून संस्था नोंदणीकृत केली. १९६७ ते १९७७ पर्यंत आणि पुन्हा १९८७ पासून साधारण १९९८ पर्यंत संस्थेने प्रतिवर्षी राज्य नाट्य स्पर्धेत हजेरी लावून अनेक पारितोषिकं मिळवली.

‘वेड्याचं घर उन्हात’, ‘प्रेमा तुझा रंग कसा?’, ‘एक होती राणी’, ‘रातराणी, शांतता कोर्ट चालू आहे’, ‘अँटीगनी’, ‘सारेच ययाति’, ‘तीन अंकी हंसा वाडकर’, ‘घरोघरी मातीच्या चुली’, ‘विनाशपर्व’, ‘तू वेडा कुंभार’, ‘खजिन्याची विहीर’,‘ दिनकर पुरोहिताचा खून’, ‘आपलं बुवा असं आहे...’ ही आणि अशी अनेक नाटकं सादर केली.

स्त्री भूमिकेची मुख्य भिस्त तारा भवाळकर यांच्यावर होती. त्या काळात नाटकातून काम करायच्या त्या व्यावसायिक नट्या. बहुदा त्या कोल्हापुरातून, उदगावहून येऊन तेवढ्याच नाटकापुरत्या सामील व्हायच्या.

हौशी स्त्री कलाकार म्हणून तारा भवाळकर त्या काळात अग्रेसर होत्या. त्यांना अनेक नाटकात अभिनयाची प्रशस्तिपत्रं आणि रौप्यपदक मिळालेलं आहे. याशिवाय नेपथ्य, दिग्दर्शन, प्रकाश योजना या विभागातही संस्थेला अनेक पारितोषिकांनी गौरवलं गेलं आहे.

तरुण मुलांमध्ये नाट्याविषयी वातावरण निर्माण करण्याचं मोठं काम हाती घेण्यासाठी संस्थेनं पुण्याच्या ‘पुरुषोत्तम करंडका’च्या धर्तीवर सांगलीमध्ये १९६८ पासून शालेय व महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यास सुरवात केली. सांगली परिसरातील अनेकांना या स्पर्धेने संधी दिली.

जवळजवळ चौदा वर्षं या स्पर्धा घेतल्या गेल्या. त्यानंतरही बाबूभाई ठक्कर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दोन वर्ष एकांकिका स्पर्धा घेतल्या. संस्थेनेसुद्धा अनेक एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घेऊन यश संपादन केलं.

संस्थेची नाटकं सादर करण्याबरोबरच इतर संस्थांची उत्तम नाटक सांगलीत लोकांना पाहायला मिळावी, म्हणून बऱ्याच नाटकांचे आयोजन करण्यात संस्था अग्रेसर होती. सोलापूरच्या संस्थेच्या अतुल कुलकर्णी यांची चाफा,

तसंच आम्ही सारे घोडेगावकर, श्याम मनोहर यांचे येळकोट, गायन समाज देवल क्लबचं हृदय अशी काही वेगळ्या शैलीतील नाटक सादर करण्यात आली. शिवाय काही वर्षं बालनाट्य शिबिरही संस्थेच्या वतीनं घेण्यात आली.

सांगलीत झालेल्या ६९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात संस्थेच्या श्याम मनोहर लिखित हलकी डोकी, या तथाकथित रंगमंचीय आकृतीबंधाच्यां चौकटी मोडणारा प्रयोग चालू असतानाच हुल्लड करून बंद केला.

नंतरच्या प्रत्येक परिसंवादामध्ये महाराष्ट्रातून आलेल्या विचारवंतांनी या गोष्टीचा निषेध केला आणि नाट्य संमेलनात वेगळा विचार करणाऱ्या नाटकाचा प्रयोग करण्याची संस्थेनं मुहूर्तमेढ रोवली. साचेबद्ध नाटकाच्या चौकटीत अडकलेल्या नाट्य संमेलनात अशाप्रकारे बंद पाडण्यात आलेलं हे नाटक संस्थेच्या अभिमानाची गोष्ट ठरली.

सामाजिक दायित्वाच्या भावनेने काही नाटकांचे प्रयोगसुद्धा सामाजिक संस्थांच्या मदतीसाठी आयोजित केले गेले. नवजीवन मतिमंद मुलाच्या शाळेसाठीचा प्रयोग... या प्रयोगातूनच हरीपूर इथं कुलकर्णी यांच्या मुलाला शस्त्रक्रियेसाठी मदत केली.

ॲमॅच्युअर्स ड्रॅमॅटिक असोसिएशन या संस्थेचे नाटक किंवा एकांकिका म्हणजे काहीतरी वेगळं बघायला मिळणार अशी उत्सुकता होती. काही कारणवश या संस्थेचं सध्याचं कामकाज थोडंसं मंदावलं आहे. सांगलीतील अत्यंत प्रतिष्ठित अशी ही संस्था पुन्हा नव्यानं कार्यरत राहील, असे प्रयत्न सुरू आहेत.

नव्या संहिता वाचनासाठी आले दिग्गज

१९८७ नंतर प्रा. अरुण पाटील यांच्या नेतृत्वाखाली विविध रंगमंचांवर अनेक वेगळे प्रयोग केले गेले. लेखनापासून ते सादरीकरणापर्यंत विविध आकृतिबंध हाताळले गेले. त्यांच्याबरोबर विवेक देशपांडे, डॉ. बाळकृष्ण चैतन्य,

अभय कुलकर्णी, प्रतिमा सप्रे, प्रतिमा जोगळेकर, धनंजय कुलकर्णी, अरुण खरे, रवी जोगळेकर, सुप्रिया खरे, नंदिनी देशपांडे, हरीष यमगर, संजय पाटील या नवीन पिढीनं संस्थेचा वसा पुढं चालवला. नाट्यविषयक चर्चा, संस्थेला भेट आणि नव्या संहितांचं वाचन करण्यासाठी अनेक मान्यवर लेखक संस्थेत येऊन गेले.

त्यात प्रामुख्याने विजय तेंडुलकर, वि. बा. आंबेकर, माधव वझे, आत्माराम भेंडे, पद्माकर गोवईकर, पा. रा. बावदाने, सतीश आळेकर, श्‍याम मनोहर, यशवंत दत्त, विनायक पडवळ, गिरीश ओक, वि. भा. देशपांडे, चं. प्र. देशपांडे, दिलीप जगताप अशा दिग्गजांचा समावेश होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com