आपल्या माणसांच्या सहवासाची ऊर्जा 

आशुतोष गोखले 
Friday, 23 October 2020

आपल्याला सगळ्यात जास्त आनंद देतात. या धावपळीपासून आपल्याला जो ब्रेक गरजेचा असतो तो या आपल्या माणसांमुळेच मिळतो आणि या छोट्याछोट्या गोष्टीमधूनच तो आनंद मिळतो.

मालिकांमध्ये काम करणाऱ्या कोणताही कलाकाराच्या नशिबी सुट्टी मिळण्याचे दिवस फार कमी येतात. शेड्युल जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत तुम्हाला रोज काम करावं लागतं. बरं तुम्हाला शनिवार रविवारीच सुट्टी मिळेल असंही काही नाही. त्यामुळे महिन्यातले २४-२५ दिवस मालिकेत मुख्य भूमिकेत असलेल्या कलाकाराला काम करावं लागतं. म्हणून जे काही सुट्टीचे दिवस मिळतात ते खूप खास असतात माझ्यासाठी किंवा कुठल्याही कलाकारासाठी. सलग आठ-नऊ दिवस काम केल्यावर खरी गरज असते ती आराम करण्याची; पण नुसतंच आराम केला असं होत नाही. त्यामुळे त्या आरामासोबतच मला ज्या गोष्टी केल्याने आनंद मिळतो त्या गोष्टी मी करतो. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

माझा मित्र परिवार खूप मोठा आहे. एरवी शूटिंगच्या व्यस्त शेड्युलमुळे मला त्यांना भेटता येत नाही. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी आवर्जून मी माझ्या मित्रांना भेटण्याचा अगदी छोटासा का होईना; पण प्लॅन बनवतो. तसं मी माझ्या मित्रांच्या एका कोणत्यातरी ग्रुपला दोन दिवस आधीच कळवतो. त्यातलेही माझे बरेचसे मित्र हे मालिकांमध्ये कामं करणारे कलाकार आहेत. त्यामुळे त्यांना त्या दिवशी सुट्टी असेलच असं नाही; पण जर तसा योग जुळून आला तर आणि काय हवं! 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

त्याचप्रमाणे अजून एक गोष्ट जी मी आवर्जून करतो, ती म्हणजे घरच्यांबरोबर वेळ घालवणं. मी माझ्या आई-बाबांबरोबर राहतो. अनेकदा शूटिंगमुळे त्यांनाही काहीच वेळ देता येत नाही. कारण मी रात्री उशिरा घरी येतो, तेव्हा त्यांचं सगळं आवरून झोपायची वेळ झालेली असते आणि सकाळी ते उठायच्या आत मी पुन्हा शूटिंगला निघालेलो असतो. तसं असल्यानं त्यांच्याबरोबर छान वेळ घालवता येईल, अशी संधी खूप कमी वेळा मिळते. म्हणून दोन दिवस सुट्टी मिळाली, तर त्यातले काही तास तरी घरच्यांसोबत घालवले जातील हा माझा प्रयत्न असतो. हल्ली घरच्यांसोबत एकत्र बसून जेवणं ही संधीही खूप कमी वेळा मिळते. त्यामुळे दिवसातलं आमचं कमीत कमी एक वेळचं जेवण एकत्र होईल याकडे मी लक्ष देतो. त्यानिमित्ताने आई-बाबांबरोबर गप्पा मारता येतात, काही गंमतीजमती शेअर केल्या जातात, एकमेकांच्या आयुष्यात काय कसं चाललं आहे हे कळतं. 

तसंच या सगळ्याशिवाय एखादी बघायची राहिलेली सिरीज किंवा चित्रपट मी बघतो. खरं तर या आनंद देणाऱ्या फार छोट्या छोट्या गोष्टी आहेत; पण एरवी आपण सतत धावपळ करत असतो, फार बिझी शेड्युल पाळत घडयाळाच्या काट्याबरोबर धावत असतो. अशा वेळी या छोट्याछोट्या गोष्टी आणि ही सगळी आपली माणसंच असतात जी आपल्याला सगळ्यात जास्त आनंद देतात. या धावपळीपासून आपल्याला जो ब्रेक गरजेचा असतो तो या आपल्या माणसांमुळेच मिळतो आणि या छोट्याछोट्या गोष्टीमधूनच तो आनंद मिळतो. त्या आनंदाबरोबरच रिफ्रेश होऊन पुन्हा पुढचे काही दिवस हेक्टिक शूट करण्याची ऊर्जासुद्धा याच गोष्टींतून मिळते आणि मी पुन्हा एकदा कामाला लागायला सज्ज असतो. 
(शब्दांकन - राजसी वैद्य) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article about Ashutosh Gokhale

Tags
टॉपिकस
Topic Tags: