वेब सिरीज : वकालत फ्रॉम होम

वेब सिरीज : वकालत फ्रॉम होम

टोटल  धमाल
लॉकडाऊनमध्ये एकत्र येऊन शूटिंग करणं शक्य नसल्यानं कलाकारांनी आपल्या घरी शूटिंग करून तयार केलेल्या वेब सिरीजचा प्रयोग चांगलाच यशस्वी झालेला पाहायला मिळतोय. यामध्ये दिग्दर्शन,अभिनय, संवाद या पातळ्यांवर उत्तम कामगिरी झाली, तरच हा प्रयोग प्रेक्षकांना गुंतवून ठेवू शकतो. याच धर्तीवरील एक नवी सिरीज ‘वकालत फ्रॉम होम’ ॲमेझॉन प्राईम व्हिडिओनं आणली आहे. स्क्रीनसमोर बसलेले चार चेहरे केवळ आपल्या अभिनयाच्या आणि चटपटीत संवादांच्या माध्यमातून प्रेक्षकांना जवळपास अडीच तास गुंतवून ठेवतात.

सुजीन कोहली आणि राधिका सेन या जोडप्याच्या घटस्फोटाच्या केसची सुनावणी ऑनलाईन सुरू होते. सुनावणीदरम्यान या दोघांव्यतिरिक्त, दोघांचे वकील लोबो त्रिपाठी आणि रजनी स्क्रीनवर दिसतात. लॉकडाऊनमुळे सुजीन आपल्या घरी जाऊ शकत नसतो. एकीकडे सुजीन आपल्याला फसवतोय, तो सध्या गर्लफ्रेंडबरोबर राहत असून त्या दोघांनाही एक छोटं मूल असल्याची तक्रार राधिका करते. दुसरीकडे राधिका ही लेस्बियन असून तिचे शिल्पी नावाच्या तिच्या मैत्रिणीसोबत संबंध असल्याचा आरोप सुजीन करतो. या आरोपांना सिद्ध करण्यासाठी दोघं जे पुरावे देतात त्यातला फोलपणा त्यांच्याच स्पष्टीकरणातून येत जातो. राधिकाचा वकील लोबो त्रिपाठी हा एक अतरंगी नमुना या दरम्यान आगीत तेल ओतायचं काम करत असतो. वकिलीपेक्षा त्याच्या मालकीचं हॉटेल आणि त्यातलं खाणं याकडे त्रिपाठीचा जास्त लक्ष असतो. 

यामध्ये सुरवातीला हुशार वाटणारी सुजीनची वकील रजनी ही आणखीच विचित्र निघते. अशा या चार वेगवेगळ्या स्वभावाच्या नमुन्यांचा हा सावळा गोँधळ प्रेक्षकांना हसवत ठेवण्यात यशस्वी ठरतो. या चौघांव्यतिरिक्त शिल्पी, रजनीचा पती आणि  या तीन व्यक्तिरेखा प्रत्यक्ष समोर दिसत नाहीत; पण संवादाच्या माध्यमातून त्याचं अस्तित्व सतत जाणवतं राहतं आणि प्रेक्षक त्या व्यक्तिरेखांचाही विचार करायला लागतो.

सुरुवातीला सुजीन आणि राधिकामधल्या गैरसमजांमुळे घटस्फोट होतोय असं वाटत असतानाच या वादाला या दोघांच्या कमाईतल्या तफावतीची आणि प्रॉपर्टीच्या वादाची पार्श्वभूमी असल्याचंही लक्षात येतं. याभोवती लिहिण्यात आलेले संवाद प्रेक्षकांना खळखळून हसवतात. खरंतर आजकाल पती-पत्नींच्या वादात मोठं कारण बनलेल्या आर्थिक समस्येला लेखकानं हलक्याफुलक्या माध्यमातून समोर आणलं आहे. रजनी आणि तिचा पती यांच्यातील वादाला जास्त खेचण्याच्या नादात कथा काही काळ भरकटते. 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

स्क्रीनसमोर बसलेल्या चार 
व्यक्तिरेखांना दोन-अडीच तास पाहणं सुसह्य झालंय ते संवाद आणि अभिनयातील उत्तम कामगिरीमुळे. सुमित व्यास, निधी सिंह, कुब्रा सैत आणि गोपाल दत्त यांनी या चारही व्यक्तिरेखा अप्रतिमरित्या सादर केल्या आहेत. गोपाल दत्त यांनी साकारलेल्या लोबो त्रिपाठीला तुलनेनं संवाद कमी असले, तरी त्याची देहबोली संपूर्ण स्क्रीन व्यापून राहते. रोहन सिप्पी यांचं दिग्दर्शन आणि अनुभव पाल यांच्या लेखनाची ही टोटल धमाल अनुभवायला ‘वकालत फ्रॉम होम’ ही सिरीज पाहायला हवी.

देशभरातील  बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com