ऑन स्क्रीन : नात्यांतील द्वंद्वाचा अनोखा पट

antardwand Movie
antardwand Movie

कोरोनाकाळात सर्व सिनेमागृहं बंद पडली आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर मनोरंजनाचे मार्ग शोधण्याशिवाय रसिकांना दुसरा पर्यायही उरला नाही. पूर्वी पाहायचा राहून गेलेला सिनेमा कायमचा विस्मरणात जात होता. आता ओटीटीमुळं असे सिनेमे शोधून पाहणं, हाही एक नवा छंद प्रेक्षकांना जडल्याचं दिसून येतं. वेब सीरिजच्या जोडीला काही राहून गेलेले हे चित्रपट एक वेगळाच आनंद देऊन जातात. ‘अंतर्द्वंद्व’ हा आजच्या महिलांवरील अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर वेगळाच विचार देऊन जाणारा चित्रपट. हा चित्रपट अनेक वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला असला, तरी त्याच्या विषयाचा ताजेपणा कोणालाही भावेल असाच आहे. अगदी मोजके कलाकार, सुशील राजपाल यांचं हटके दिग्दर्शन, विषयापासून थोडीही न भरकटणारी पटकथा यांमुळं हा सिनेमा अविस्मरणीय अनुभव देऊन जातो.

एखाद्या निर्णयाबाबत प्रत्येकाच्या मनात अंतर्द्वंद्व सुरू असतंच. प्रत्येक जण स्वतःच्या पातळीवर बरोबर असला, तरी समाजाच्या दृष्टीनं तो चुकीचाही असू शकतो. ‘अंतर्द्वंद्व’मधील प्रत्येक पात्राचं असंच झालं आहे. चित्रपटाची कथा बिहारमधील एका छोट्या शहरात सुरू होते. रघुवीर (राजसिंग चौधरी) दिल्लीत राहून आयएएसची परीक्षा देत असतो व तिथं त्याचं एका मुलीवर प्रेम जडलेलं असतं व त्यांनी लग्नाच्या आणाभाकाही घेतलेल्या असतात. रघुवीरचे वडील मधुकर (विनय पाठक) त्याच्यासाठी चांगलं स्थळ शोधत असतात.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्याचवेळी शेजारच्या गावातील महेंद्रबाबू (अखिलेश मिश्रा) आपल्या मुलीचं स्थळ घेऊन मधुकर यांच्याकडं येतात. बरीच चर्चा झाल्यानंतर मधुकर हे स्थळ नाकारतात व महेंद्रबाबूंना तो मोठा अपमान वाटतो. बडं प्रस्थ असलेले महेंद्रबाबू मग अगदी बिहारी स्टाईलनं घरी आलेल्या रघुवीरचं अपहरण करतात. त्यांची मुलगी जानकीला (स्वाती सेन) या प्रकरणाची कोणतीही माहिती दिली जात नाही व खूप हाल करून, रात्रं-दिवस जागं ठेवून रघुवीरचं लग्न ग्लानीच्या स्थितीतीच जानकीशी लावलं जातं. शुद्धीवर आलेल्या रघुवीरला हा खूप मोठा धक्का असतो. जानकीशी त्याचं थेट वैर नसलं तरी तो तिचा दुःस्वास करू लागतो. दिल्लीतील आपल्या मैत्रिणीच्या आठवणीनं हळवा होतो. आता हे सर्व प्रकरण नक्की काय आहे, हे जानकीच्या लक्षात येतं व रघुवीरबद्दल तिला सहानुभूती वाटू लागते. रघुवीरला आपल्या जुन्या मैत्रिणीला दिलेला शब्द पाळताना, जानकीला रघुवीरला सांभाळून घेताना, महेंद्रबाबूंना आपण केलेली मोठी चूक लक्षात आल्यावर व रघुवीरच्या वडिलांना आपल्या चुकीनं घडलेल्या या धक्क्यातून बाहेर येताना मोठ्या अंतर्द्वंद्वाचा सामना करावा लागतो.

चित्रपटाची कथा वेगळी आहे. त्यातील अपहरणाच्या प्रसंगापासून रघुवीर-जानकीच्या लग्नापर्यंतचे प्रसंग अंगावर काटा आणतात. अपहरणं फक्त खंडणी वसुलीसाठीच नव्हे, तर लग्नासारख्या गोष्टींसाठीही केली जातात, हाही प्रेक्षकांसाठी धक्का ठरतो. सर्व पात्रांच्या मनात सुरू असलेलं अंतर्द्वंद्व दिग्दर्शकानं बेमालूमपणे उलगडून दाखवलं आहे आणि हेच या चित्रपटाचं वैशिष्ट्य ठरतं. राजसिंग चौधरीचा ‘गुलाल’नंतरचा हा मोठी भूमिका असलेला चित्रपट व त्यानं रघुवीर छान साकारला आहे. स्वाती सेननं जानकीच्या भूमिकेत कमाल केली आहे. इतर कलाकारांची त्यांना छान साथ मिळाली आहे. एकंदरीतच, अपहरणासारखा विषय केंद्रस्थानी घेऊन नात्यांतील द्वंद्व दाखविण्याचा दिग्दर्शकाचा हा प्रयत्न यशस्वी झाला आहे. हा चित्रपट तुम्हाला ‘अॅमेझॉन प्राइम’वर पाहता येईल.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com