ऑन स्क्रीन : मिर्झापूर २ : हिंसाचाराकडून नातेसंबंधांकडे...

mirzapur 2
mirzapur 2

‘मिर्झापूर’ या ॲमेझॉनवरील वेब सीरिजचा दुसरा भाग गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला आणि सध्या त्याची जोरदार चर्चा आहे. या भागात हिंसाचार (तुलनेनं) कमी आहे आणि नातेसंबंधांवर अधिक लक्ष केंद्रित केल्याचं दिसतं. कथेत नव्यानं आलेली काही मनोरंजक पात्रं, अधिक नेमके प्रसंग, धारदार संवाद आणि कलाकारांचा अभिनय, या जमेच्या बाजू असल्यानं हा भागही प्रेक्षकाचं मनोरंजन करण्यात कुठंही कमी पडत नाही.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गुड्डू पंडितचा (अली फजल) भाऊ आणि बायको मागच्या भागात मारले गेले होते. याचा बदला घेण्याचा आणि मिर्झापूरच्या गादीवर विराजमान होण्याचा निर्धार करून गुड्डू पुन्हा कामाला लागतो. गुड्डूची वहिनी गोलू (श्वेता त्रिपाठी) त्याच्या सोबत आहे. मुन्नाला (द्विवेंदू शर्मा) धडा शिकवण्यासाठी आणि कालिन भैयाला (पकंज त्रिपाठी) पदभ्रष्ट करण्यासाठी दोघं मिर्झापूरच्या सीमेवर राहून तयारी करत आहेत. यात सुरुवातीला पैसा कमावणं व मुन्नाचं व्यापारात नुकसान करण्याचं त्याचं ध्येय आहे. कालिनची पत्नी बिना (रसिका दुग्गल) आता गरोदर आहे आणि त्रिपाठींच्या घरात नवीन राजकारणही सुरू आहे. 

कालिन भैया आपला व्यापार वाढवताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात येतात. त्यांची मुलगी माधुरी यादव (ईशा तलवार) मुन्नाच्या प्रेमात पडते. त्रिपाठी कुटुंबाला आता व्यापाराबरोबर राजकारणातही स्थान मिळतं. गुड्डू आणि मुन्ना व्यापाराच्या निमित्तानं एकमेकांसमोर येत राहतात. बिहारमध्ये व्यवसाय वाढवण्यासाठी दोघंही दादा त्यागी (लिलिपूट) व त्याची जुळी मुलं भरत आणि शत्रुघ्न (दुहेरी भूमिकेत विजय वर्मा) यांच्याशी व्यवहार करू पाहतात. इकडं गुड्डूचे वडील त्याच्याच विरोधात पुरावे गोळा करून त्याला शरण येण्यासाठी भाग पाडत असतात.

या सर्व घडामोडी घडत असताना गुड्डू शेवटी मुन्नावर हल्लाबोल करतो. कालिन भैया, गुड्डू, मुन्ना, गोलू यांचं काय होतं, मिर्झापूरची गादी नक्की कोणाच्या वाट्याला येते, याची उत्तरं देत व तिसऱ्या सीझनची तयारी करीत हा सीझन संपतो. 

मागील भागात बहुतांश पात्रांची ओळख झालेली असल्यानं ही सीरिज पहिल्या भागापासूनच पकड घेते. गुड्डू बदल्याची तयारी कशी करतो हे दाखवण्यात बराच वेळ खर्च होतो. मात्र, दिग्दर्शक करण अंशुमन आणि गुरमितसिंग यांनी कथा कुठंही रेंगाळणार नाही आणि पुढच्या भागाबद्दल उत्सुकता कायम राहील, याची काळजी घेतली आहे. त्रिपाठींच्या घरात बिना खेळत असलेलं राजकारण कथेला उत्कंठावर्धक बनवतं. दादा त्यागी आणि त्यांच्या कुटुंबामुळंही कथेत रंगत येते. गुड्डूच्या बदल्याचा प्रसंग मात्र उरकल्यासारखो वाटतो.

अभिनयाच्या आघाडीवर पंकज त्रिपाठी, द्विवेंदू शर्मा, कुलभूषण खरबंदा, विजय वर्मा चांगली छाप पाडतात. गुड्डूची बहीण डिंपीचा प्रियकर रॉबिन या भूमिकेत प्रियांशू पेन्युली धमाल आणतो. अली फजल, श्वेता त्रिपाठी, रसिका दुग्गल, ईशा तलवार आदी मोलाची साथ देतात. एकंदरीतच, पहिला भाग पाहिलेल्यांची मिर्झापूरची गादी आणि गुड्डूच्या बदल्याबद्दलची उत्सुकता पूर्ण करणारा, राजकारण आणि व्यवसाय, यांचं नातं अधिक खोलात उलगडून दाखवणारा हा दुसरा सीझन जमून आला आहे, हे नक्की.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com