मी "आईपण' एन्जॉय केलं : सोनाली खरे

sonali
sonali

कम बॅक मॉम

माझी मुलगी सनाया आता 10 वर्षांची झाली आहे. ती झाल्यानंतर मी जवळजवळ 6 वर्षांचा ब्रेक घेतला होता, कारण मला घेतलेली जबाबदारी पूर्णपणे सांभाळायची होती. मला माझ्या मुलीला आईकडे किंवा पाळणाघरात ठेवायचं नव्हतं. तिला स्वतःचं स्वतःला समजेपर्यंत मला तिला सांभाळायचं होतं. ती मोठी होताना तिच्यातील प्रत्येक बदलाचा, म्हणजेच तिचा पहिला शब्द, तिचं पहिलं पाऊल अशा सगळ्या गोष्टींचा मला आनंद घ्यायचा होता. त्यामुळं मी ठरवून मला सध्या काम करायचं नाही, असा निर्णय घेतला होता. ती स्वतःची काळजी स्वतः घेते, हे जाणवल्यावर काम करायचं, असं मी ठरवलं होतं.

मी माझं आईपण खूप एन्जॉय केलं. मी माझं आईपण जरा जास्तच एन्जॉय करत होते, त्यामुळं तीन वर्षांचा ठरवलेला ब्रेक सहा वर्षांचा झाला! पण, ब्रेक झाल्यानंतर अर्थातच काम करायचं होतं. पण ते थोडं कठीण गेलं. माझा ब्रेक खूप मोठा होता, त्यामुळं इंडस्ट्रीमध्ये लोक तुम्हाला विसरतात. तुम्ही काही काळ न दिसल्यास प्रेक्षक व निर्मात्यांच्या दृष्टीनं तुम्ही विस्मरणात जाता. अशावेळी कमबॅक करणं खूप कठीण गेलं. अजूनही मी स्ट्रगल करतेच आहे. ब्रेकनंतर मी "बे दुणे दहा' नावाची मालिका केली. "अप्सरा आली'मधून मी कमबॅक केलं होतं. काही काळासाठी "आम्ही सारे खवय्ये'साठी सूत्रसंचालनही केलं. मग आता काही चित्रपट आणि नाटके केली. मला अजूनही खूप काम करायचं आहे, खूप इच्छा आहे. मात्र, आता माझ्या कामाला चाळण लागणार आहे. कारण आई झाल्यानंतर काम आणि मुलीलाही तितकाच वेळ देणं गरजेचं आहे.

आई झाल्यानंतर आपल्या शरीरात खूप बदल होतात. त्यामुळं मी गरोदर होते तेव्हाच गरोदरपणासाठी असलेली वेगळी योगासने करायला सुरवात केली होती. माझ्या डोक्‍यात पहिल्यापासून पक्कं होतं, की गरोदरपणात जाड झाले, तरच मी व्यायाम करणार असं नाही. माझ्या बाळाला पोटात असल्यापासूनच एक सुदृढ शरीर आणि सुदृढ मन मिळावं म्हणून मी मी अय्यंगार योग सुरू केला होता. बाळ झाल्यानंतर काही महिने व्यायाम करायचा नसतो. ते मी पाळलं आणि नंतर मात्र कंबर कसली. मी परत योगासने सुरू केली. माझं वजन गरोदरपणात 25 किलोनं वाढलं होतं. माझं वजन 75 किलो झालं होतं आणि ते मला पूर्ववत 50 किलोपर्यंत आणायचं होतं. मी फार डाएटिंग केलं नाही, पण साखर खाणं बंद केलं होतं. कोणतेही गोड पदार्थ व्यर्ज केले होते. मी सकस आहार घेत होते, कारण मी माझ्या मुलीला स्तनपान करत होते. त्याचबरोबर मी रोज न चुकता योगासने करीत होतेच. मला जीमचा अतिशय कंटाळा येतो त्यामुळे मी फक्त योगासनांवर अवलंबून राहिले होते.

मला माझं वजन पूर्ववत करण्यासाठी 9 महिने लागले. मी कुठेही घाई किंवा क्रॅश डाएट केलं नाही. वजन वाढायला जेवढा कालावधी लागला, तेवढाच मी ते कमी करण्यासाठीही घेतला. तुम्ही शरीराने सुदृढ असल्यास मनानेही सुदृढ होता. तुम्ही व्यायाम केल्यानं तुमच्या शरीरात काही प्रकारची रसायने सोडली जातात व ती तुम्हाला मनाने सुदृढ व्हायला मदत करतात. त्यामुळं प्रत्येकानंच व्यायाम केल्यास त्याचा फायदा सगळ्यांनाच होणार आहे. मला अजून खूप काम करायचं आहे, मग ते नाटक असो, चित्रपट असो किंवा सध्याचं डिजिटल प्लॅटफॉर्मवरील काम. मी मिस केलेली सहा-साडेसहा वर्षं भरून काढायची आहेत, चांगलं काम करायची तडफड आहेच. माझ्यातल्या कलाकाराला मी बॅकसीटला ठेवलं होतं, आता त्याला न्याय द्यायचा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com