ऑन स्क्रीन - ब्लॅक विडोज : गुंतागुंतीची; पण रंजक सूडकथा

‘ब्लॅक विडोज’मध्ये शमिता शेट्टी, मोनासिंग आणि स्वस्तिका मुखर्जी.
‘ब्लॅक विडोज’मध्ये शमिता शेट्टी, मोनासिंग आणि स्वस्तिका मुखर्जी.

‘झी ५’वर प्रदर्शित झालेली ‘ब्लॅक विडोज’ची कथा विरा, जयती आणि कविता या तीन मैत्रिणींभोवती फिरते. कथेच्या सुरुवातीलाच या तिघींचे नवरे ज्या बोटीत बसलेले असतात तिचा स्फोट होतो. आपला कट यशस्वी झाल्याचा आनंद जगासमोर लपवत तिघी पोलिस चौकशीला सामोऱ्या जातात. नवऱ्यांच्या सततच्या त्रासाला कंटाळून त्यांना एकत्र संपवण्याचा या तिघींचा कट यशस्वी तर होतो; पण या खुनाच्या गुंत्यात त्या अडकत जातात. विराच्या पतीची कंपनी, त्याचे पैशांचे व्यवहार, त्यातून मिळणाऱ्या धमक्या, जयतीच्या सावत्र मुलाचं अचानक तिच्या घरात राहायला येणं, सतत चांगल्या साथीदाराच्या शोधात असलेल्या कविताचं नैराश्य, अशा अनेक घटना तिघींच्या आयुष्यात सुरू होतात. एकीकडे पोलिस चौकशीची टांगती तलवार, तर दुसरीकडे विराचा पती जतीन जखमी अवस्थेत परतल्याने उडालेला गोंधळ, अशा विचित्र मनःस्थितीत तिघींचा प्रवास सुरू असतो. आपल्याला मारण्याचा प्रयत्न नेमका कोणी केला, याचा जतीनला शोध घ्यायचा असतो. 

या मुख्य कथानकाव्यतिरिक्त आणखी एक कथानक यामध्ये मांडण्यात आलं असून, त्यामुळे या तीन पत्नींच्या सूडनाट्यात अनेक वळणं येत जातात. एका फार्मा कंपनीची मालकीण इनाया आपल्या औषधाची बेकायदा चाचणी करत असते. या चाचणीत अनेक निरपराध लोकांचा बळी जातो. इनायाची कंपनी आणि जतीनची कंपनी एकत्र काम करत असतात. जतीन जिवंत असल्याचं कळताच इनाया नेमका काय निर्णय घेते? आपल्याला मारण्याचा कट नेमका कोणी केला हा जतीनचा शोध या तीघींपर्यंत येऊन पोहचतो का? या प्रश्नांची उत्तरं या सीरिजमध्ये देण्यात आली आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘ब्लॅक विडोज’ची जमेची बाजू म्हणजे कथेची मांडणी. अनेक पात्रं, त्यांच्या समस्या, घरगुती हिंसाचार, खुनाचा कट, औषध कंपनीचा क्रुरपणा असा भरमसाठ मालमसाला या सीरिजमध्ये दाखवण्यात आला आहे. साधारण अर्ध्या तासाचा एक भाग अशा बारा भागांमध्ये मांडण्यात आलेली गोष्ट कमालीची गुंतागुंतीची असली, तरी ती रंजक पद्धीतीनं मांडण्यात लेखक, दिग्दर्शकाला यश आलं आहे. सीरिजच्या जवळपास प्रत्येक भागात कथा नवीन वळण घेत जाते आणि तितकीच ती रंगत जाते. अधूनमधून संवादांच्या माध्यमातून होणारी विनोदाची पखरणंही ही गुंतागुंत सुसह्य करते.

मोना सिंग, स्वस्तिका मुखर्जी, शमिता शेट्टी, शरद केळकर या मुख्य कलाकारांचा अभिनय, छायाचित्रण या सीरिजच्या आणखी काही जमेच्या बाजू ठरतात. विरा आणि जयतीसारख्या हुशार स्त्रियांनी कवितासारख्या अपरिपक्व व्यक्तीला एवढ्या मोठ्या कटात सामिल करून घेणं, एका उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्यानं एका सराईत गुन्हेगारासारखे खून करणं यासारख्या काही गोष्टी पाहताना खटकतात. सीरिजची लांबीही  जास्त आहे. एका निर्णायक वळणावर पहिला सीझन संपवल्यानं या प्रश्नांच्या उत्तरांसाठी दुसऱ्या सीझनची वाट पाहावी लागेल. १२ भाग पाहिल्यानंतर शेवट काय असेल यासाठी दुसऱ्या सीझनची वाट पाहायला लागणं थोडी निराशा करतं. एकंदरीत ‘ब्लॅक विडोज’च्या सूडाची ही रंगतदार कथा पाहण्यासारखी तर आहेच, शिवाय सीरिजच्या दुसऱ्या सीझनची प्रतीक्षाही करायला हरकत नाही.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com