बाजीप्रभू देशपांडेच्या पराक्रमाची शौर्यगाथा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Baji Prabhu Deshpande

बाजीप्रभू देशपांडेच्या पराक्रमाची शौर्यगाथा

बाजीप्रभू देशपांडेच्या पराक्रमामुळेच घोडखिंड ही पावनखिंड म्हणून ओळखली जाऊ लागली.हजारो मेले तरी चालतील पण लाखोंचा पोशिंदा जगायला हवा, या प्रेरणेने शिवाजी महाराज विशाळगडी पोहोचेपर्यंत बाजीप्रभूंनी घोडखिंड अडवून धरली होती. असे प्रामाणिक पराक्रमी धैर्यवान सैनिक प्राणापलीकडे लढले म्हणून आज डोळ्यांनी हे स्वराज्य आपल्याला पहाता आले.

बाजीप्रभू देशपांडे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील हिरडस मावळातले पिढीजात देशपांडे होते. बाजीप्रभू हे हिरडस मावळचे वतनदार असणाऱ्या बांदलांचे दिवाण होते. परंतु बाजींचे प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य पाहून श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपलेसे करून घेतले. पुढे बाजींप्रभूचे शौर्य पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना आपल्या सैन्यदलात उच्च पदावर बसवले. मोगल सैन्याशी लढा देताना, त्यांनी आपले शौर्य दाखवत मोगल सैन्याच्या शंभराहून अधिक सैनिकांसोबत एकट्याने लढा दिला आणि सर्वांना ठार मारून आणि लढाई यशस्वी जिंकून दाखवली.

1648 सालापर्यंत शिवाजी महाराजांच्या सोबत राहून त्यांनी पुरंदर, कोंढाणा आणि राजापूर किल्ले जिंकण्यास मदत केली. पुढे बाजी प्रभूंनी रोहिडा किल्ला आणि आजूबाजूचे सगळेच किल्ले मजबूत केले. यामुळे वीर बाजी मावळ्यांचा एक जबरदस्त मावळा म्हणून ओळखला जाऊ लागले. या प्रांतात त्यांची पकड निर्माण झाली. त्यामुळे लोक आपोआपच त्यांचा आदर करू लागले.

पुढे 1655 मध्ये त्यांनी जावळीच्या लढाईत आणि परकियांकडून मावळ्याचा किल्ला जिंकून घेण्यासाठी अगदी कठोर परिश्रम केले. नुसता हा किल्ला जिंकलाच नाही तर त्यांची नंतर डागडुजी करुन दुरुस्ती देखील केली.

बाजीप्रभूंनी 10 नोव्हेंबर 1659 रोजी अफझलखानाच्या मृत्यूनंतर कुशल नावाच्या जंगलात असलेली आदिलशाही छावणी समूळ नष्ट केली आणि शिवाजी महाराजांना स्वराज्याचा विस्तार करण्यास मदत केली. पुढे मग 1660 मध्ये, मोगल, आदिलशहा आणि सिद्दीकी इत्यादींनी शिवाजी महाराजांना सर्व बाजूंनी घेरण्याचा प्रयत्न केला. तेव्हा शिवाजी महाराज हे पन्हाळा किल्ल्यावर होते.

शत्रुच्या घेऱ्या असलेल्या किल्ल्यातून शिवाजी महाराजांना बाहेर पडणे फार कठीण झाले. यावेळी बाजीप्रभू नावाचा मावळा पुढे आला आणि त्याने शिवाजी महाराजांना बाहेर पडण्यासाठी मदत केली. तेव्हा त्यांनी शिवाजी महाराजांना अर्धे सैन्य देऊन पुढे जाण्यास सांगितले आणि बाजीप्रभू स्वत: घोडखिंडीच्या दाराजवळ सैन्य घेऊन उभे राहिले.

जेव्हा शत्रूंना कळले की शिवाजी महाराज घेऱ्यातून निसटले तेव्हा चवताळल्यासारखे शत्रू बाजीप्रभूंच्या सैन्यावर तुटून पडले जोरदार युद्ध सुरू झाले. या युद्धात बाजीप्रभूंनी शत्रुंसोबत खूप हुशारीने दोन हात केले.

सिद्दी मसूदचे सैन्य अडविताना कामी आलेले मराठी मावळे, धारातीर्थी पडलेले बंधू फुलाजी, जखमी झालेले स्वतःचे शरीर या कशाचेही भान बाजींना नव्हते. महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले याचा इशारा देणाऱ्या तोफांच्या आवाजाकडे त्यांचे कान होते. तोफांचा आवाज ऐकेपर्यंत ते दोन्ही हातात तलवार घेऊन प्राणांची बाजी लावून लढत होते. खिंडीमध्ये महादेवाचा महारुद्र अवतार प्रकटलेला होता. तोफांचे आवाज ऐकल्यावर कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने बाजीप्रभूंनी प्राण सोडले.

मराठी सैनिकांच्या अभूतपूर्व अशा पराक्रमाने आणि बाजींसारख्या स्वराज्यनिष्ठांच्या पवित्र रक्ताने घोडखिंड पावन झाली म्हणूनच तिचे नाव पावनखिंड झाले. बाजी - फुलाजी बंधूंवर विशाळगडावर, महाराजांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बाजीप्रभू व फुलाजी यांची समाधी विशाळगडावर आहे. तसेच पन्हाळगडावर बाजीप्रभूंचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे.

Web Title: Baji Prabhu Deshpande Maratha Empire History

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top