Bala Review : विनोदी तरीही महत्तवपूर्ण संदेश देणारा चित्रपट

bala movie review
bala movie review

मुंबई : सध्या आयुषमान खुराना बॉलीवूडमधील चांगलंच चलनी खणखणीत नाणे आहे. फारसे हिरो मटेरियल किंवा डोलेशोले लूक नसतानाही सलग सहा-सात यशस्वी चित्रपट त्याच्या नावावर आहेत. चांगले दिग्दर्शक आणि उत्तम स्क्रीप्ट त्याला मिळाल्यामुळे यशाची एकेक पायरी तो पादाक्रांत करीत चाललेला आहे. नुकताच त्याचा प्रदर्शित झालेला "बाला' हा चित्रपट पाहिला असता त्याच्या शिरपेचात आणखीन एक यशस्वी चित्रपट नोंदवला जाणार आहे. 

बाला हा चित्रपट विनोदी असला तरी बरेच काही सांगून जाणारा आहे. एखाद्या व्यक्तीमध्ये काही कमतरता असेल किंवा मनात काही न्यूनगंड असेल त्यांना सल्ला देणारा हा चित्रपट आहे. कारण आपल्या आजूबाजूला-अवतीभवती काही माणसे अशी असतात की त्यांच्यामध्ये काही तरी कमतरता किंवा एखादी उणीव जाणवत असते. त्याचीच त्यांना आयुष्यभर खंत वाटत असते. ती माणसे आपल्या आनंदात किंवा सुखात सहभागी होतात खरी; परंतु त्यांच्यामध्ये असलेली कमतरता त्यांना सतत सतावीत असते. "बाला' या चित्रपटात तारुण्यात टक्कल पडलेल्या आणि त्याच्याच मनात न्यूनगंड असलेल्या एका तरुणाची कथा मांडण्यात आली आहे. कानपूरसारख्या शहरात बालमुकुंद (आयुषमान खुराना) राहात असतो. एका मध्यमवर्गीय कुटुंबात लहानाचा मोठा झालेल्या बालमुकुंद ऐन तारुण्यात केसगळतीमुळे कमालीचा त्रस्त असतो. लहानपणी त्याचे लांब आणि भुरभुरणारे केस असतात. त्यामुळे त्याच्यावर अनेक मुली फिदा असतात. मात्र मोठे झाल्यानंतर हळूहळू त्याला टक्कल पडत जाते आणि त्यांची खिल्ली उडविली जाते. डोक्‍यावर केस उगविण्यासाठी तो कमालीची कसरत करतो..विविध औषधे आणतो आणि केस वाढविण्याचा प्रयत्न करतो. पण त्याचा काही एक परिणाम होत नाही. एका मार्केटिंग कंपनीमध्ये तो कामाला असतो. वारंवार खिल्ली उडविल्यामुळे तो केसाचा विंग वापरण्याचा निर्णय घेतो. 

विग वापरण्यास सुरुवात केल्यानंतर मॉडेल परी मिश्रा (यामी गौतम) हिच्या तो प्रेमात पडतो. त्या दोघांचे लग्न होते खरे. पण लग्नाच्या पहिल्या दिवशी 
परीला सत्य परिस्थिती समजते. एकीकडे आत्मविश्‍वास गमावलेला हा बालमुकुंद आणि दुसरीकडे त्याची बालपणीची मैत्रीण लतिका (भूमी पेडणेकर) ही कृष्णवर्णीय असते. तिला आपल्यातील कमतरतेचा अजिबात न्यूनगंड नसतो. ती शिकून वकील बनते. तिचा आत्मविश्‍वास कमालीचा असतो; तर बालमुकुंदचा आत्मविश्‍वास ढासळलेला असतो. मग पुढे काय व कोणत्या घडामोडी घडतात हे चित्रपटात पाहिलेले बरे. दिग्दर्शक अमर कौशिक यांनी चांगली कथा आणि मांडणीही उत्तम केली आहे. आयुषमान खुराना, भूमी पेडणेकर, यामी गौतम अशा सगळ्याच कलाकारांनी छान कामगिरी केली आहे. चित्रपटातील संवाद खुसखुशीत आहेत आणि ती सगळी किमया साधली 

लेखक नीरेन भट यांनी. त्यांनी चांगली स्क्रीप्ट लिहिली आहे. चित्रपटाचा पूर्वार्ध चांगला जमलेला आहे. मात्र उत्तरार्धात भाषणबाजी अधिक झाली आहे. परंतु चित्रपट हसतखेळत पुढे जाणारा आहे आणि सामाजिक संदेशही देणारा आहे. 
चार स्टार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com