esakal | 'बंदिश बँडिट्स'मधील अभिनेता अमित मिस्त्री यांचं निधन; सिनेसृष्टीला मोठा धक्का

बोलून बातमी शोधा

Amit Mistry

'बंदिश बँडिट्स'मधील अभिनेता अमित मिस्त्री यांचं निधन; सिनेसृष्टीला मोठा धक्का

sakal_logo
By
स्वाती वेमूल

अभिनेते अमित मिस्त्री यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. गुजराती नाटकांपासून करिअरची सुरुवात करणारे अमित यांनी हिंदी मालिका, चित्रपटांसोबतच वेब सीरिजमध्येही दमदार भूमिका साकारल्या होत्या. 'तेनालीराम', 'सात फेरों की हेराफेरी' यांसारख्या मालिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकणारे अमित हे अॅमेझॉन प्राइमच्या 'बंदिश बँडिट्स' या वेब सीरिजमध्येही झळकले होते. सीरिजमध्ये त्यांनी 'देवेंद्र राठोड'ची भूमिका साकारली होती. अमित हे स्वत: संगीतप्रेमी असल्याने 'बंदिश बँडिट्स'सारख्या संगीतावर आधारित सीरिजमध्ये काम करण्यास मिळाल्याने ते फार खूश होते. 'तेनालीराम' या मालिकेत त्यांनी बिरबलाची भूमिका साकारली होती.

अमित यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं होतं. कॉलेजमध्ये असल्यापासूनच त्यांनी विविध नाटकांच्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली होती. गाण्याच्या एका प्रोफेशनल ग्रुपसोबत ते १२ वर्षे काम करत होते. नंतर पृथ्वी थिएटरमध्ये मकरंद देशपांडेंच्या ग्रुपमध्ये त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. नाटकानंतर 'वो' या मालिकेद्वारे त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. या मालिकेत त्यांनी आशुतोष गोवारीकरांसोबत काम केलं होतं.

प्रीती झिंटा, सैफ अली खान, चंद्रचूड सिंग यांच्यासोबत 'क्या कहना' या चित्रपटातही त्यांनी भूमिका साकारली होती. पैशांची गरज असताना त्यांनी काही नाटकं लिहिली आणि दिग्दर्शनसुद्धा केलं. 'शोर इन द सिटी', 'गली गली मे चोर है', 'एक चालीस की लास्ट लोकल', 'जेंटलमन', 'यमला पगला दिवाना' यांसारख्या चित्रपटांना प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम मिळालं.