पाच चित्रपटांना टक्कर देत 'हिरकणी'ची बॉक्स ऑफिसवर दिवाळी!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2019

Hirkani movie : दिवाळीच्या मुहुर्तावर एकुण पाच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत आणि त्यातूनही मराठमोळ्या 'हिरकणी'ने बॉक्सऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. 

मुंबई : धनत्रयोदशीपासून दिवाळीची सुरुवात झाली आहे आणि 'हिरकणी' प्रदर्शित झाल्यामुळे दिवाळी मराठमोळ्या पध्दतीने साजरी करण्याची जय्यत तयारी सुध्दा सर्वत्र चालू झाली आहे. दिवाळी म्हटलं की जल्लोष आणि उत्साह आणि असाच उत्साह आता चित्रपटगृहांतही दिसू लागलाय. आज शुक्रवार म्हणजे प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा वार आणि दरवर्षी चित्रपटसृष्टी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी चित्रपट प्रदर्शित करतात. यंदाच्या दिवाळीत देखील दोन मराठी आणि तीन हिंदी असे एकूण ५ चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.

'हिरकणी', 'ट्रिपल सीट', 'सांड की आँख', 'मेड इन चायना' आणि 'हाऊसफुल ४' असे पाच चित्रपट जरी आज प्रदर्शित झाले असले तरी देखील प्रसाद ओक दिग्दर्शित 'हिरकणी' बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करण्यात यशस्वी झाली आहे. प्रेक्षकांच्या प्रेमामुळे आणि चांगल्या प्रतिसादामुळे चित्रपटाने कमाई करण्यात यश संपादन केले आहे. 

प्रसाद ओक दिग्दर्शित आणि चिन्मय मांडलेकर लिखित एका आईच्या धाडसाची, धैर्याची आणि पराक्रमाची गाथा असलेला 'हिरकणी' चित्रपट २४ ऑक्टोबरला प्रदर्शित झाला आणि एका दिवसातच प्रेक्षकांकडून पसंतीची पावती मिळवत आहे. सोनाली कुलकर्णी, अमित खेडेकर यांची यामध्ये प्रमुख भूमिका असून मॅगीज पिक्चर्स यांच्या सहकार्याने इरादा एंटरटेनमेंटने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. राजेश मापुस्कर हे क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहेत. लॉरेन्स डिसुझा हे सहनिर्माते आणि 'इरादा एंटरटेनमेंट'च्या फाल्गुनी पटेल या निर्मात्या आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: with the bang opening hirkani has given tough fight to five movies