नवी मालिका ‘बायको अशी हव्वी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bayko Ashi Havvi

नवी मालिका ‘बायको अशी हव्वी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

प्रत्येक कुटुंबाला स्त्रीच्या अस्तित्त्वामुळे पूर्णत्त्व येतं असं म्हणतात. पण तरीही स्त्रीला गृहित धरण्याची पद्धत बहुसंख्य घरांत दिसते. तिच्या मतांचा आणि भावनांचा फारसा विचार केला जात नाही. याच धाग्याला घेऊन कलर्स मराठी Colors Marathi वाहिनीवर ‘बायको अशी हव्वी’ bayko ashi havvi ही नवीन मालिका येत्या १७ मे पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता ही मालिका प्रेक्षकांना पाहता येईल. मालिकेची निर्मिती युफोरिया प्रॉडक्शन्स आणि पिकोलो फिल्म्सने केली असून लेखन – दिग्दर्शन विरेन प्रधान यांचे आहे. (bayko ashi havvi new marathi serial coming soon on colors marathi)

भय्यासाहेब राजेशिर्के हे खूप मोठं प्रस्थ मानलं जातं. त्यांचा मुलगा विभास ज्याच्या खांद्यावर घराची, व्यवसायाची जबाबदारी आहे. बाहेरून बघता राजेशिर्के एक आदर्श कुटुंब आहे. पण घरातलं आतलं चित्र मात्र या विरुद्ध आहे. पुरूषांचे वर्चस्व घरामध्ये पिढ्यानपिढ्या चालत आले आहे. बायकांनी उबरंठा ओलांडायचा नाही, चूल आणि मूल याच काय त्या बायकांच्या जबाबदार्‍या अशी त्यांची विचारसरणी आहे. घरातील बायका हे निमूटपणे सहन करत आहेत, पुरुषी अहंकाराला जपत आहेत. याउलट एका छोट्या गावातील मध्यमवर्गीय कुटुंब जे स्त्री – पुरुष असा भेदभाव अजिबात मानत नाही. अशा घरात वाढलेली आजच्या विचारांची मुलगी जान्हवी जेव्हा पुरुषप्रधान संस्कृती रुजलेल्या घरामध्ये लग्न होऊन येते तेव्हा काय घडतं? विभास आणि जान्हवीचं लग्न कोणत्या परिस्थितीत होतं ? यामध्ये दोघांच्या नशिबात काय वाढून ठेवलं आहे ? संसाराबद्दल या दोघांचीही मतं वेगळी आहेत. त्यांची मनं जुळतील का ? हा प्रवास प्रेक्षकांना मालिकेत पाहायला मिळेल.

हेही वाचा: 'नवरा कसा हवा?'; चाहत्याच्या प्रश्नावर गौतमी देशपांडेचं भन्नाट उत्तर

मालिकेचे लेखक - दिग्दर्शक विरेन प्रधान म्हणाले, “शेंदूराचे लेप खरवडले की आत मूर्तीऐवजी दगड सापडतो, तसंच आधुनिकतेचा, समंजसपणाचा लेप खरवडला की बहुसंख्‍य पुरुषांचा स्त्रि‍यांकडे बघण्‍याचा जुनाट दृष्टिकोन आजही तसाच आहे हे जाणवतं. लग्‍न करताना मुलगी बायको मटेरिअल पाहिजे म्‍हणजे स्‍वयंपाकपाणी करणारी, घर सांभाळणारी असावी आणि ते तिचं मुख्‍य ध्‍येय असावं हे पाहिलं जातं. हे ध्‍येय नवरा आणि बायको दोघे मिळून निभावू शकतात याकडे सोयि‍स्‍कर दुर्लक्ष केलं जातं. अजूनही बाईची कर्तव्‍य आणि पुरुषाची कर्तव्‍य अशी लेबलं लावूनच बायकांकडे पाहिलं जातं. या मुखवटयाचं, मुखवटयांआड घुसमटणा-या स्त्रि‍यांची, आणि ते मुखवटे फाडून नवं, ख-या सहजीवनाचं चित्र उभं करणा-या नायिकेची ही गोष्‍ट आहे”.