‘तुझ्यात जीव रंगला’मधील रानाचं स्‍वप्‍न वाचून थक्‍क व्‍हाल!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

ड्रायव्हिंगची मला प्रचंड आवड आहे. त्यामुळे थोडा जरी रिकामा वेळ मिळाला की मी ड्रायव्हिंग करतो. माझं आणि माझ्या भावाचं एक स्वप्न आहे.

मी माझी पहिली कार २०१७ मध्ये घेतली. आय २०. माझ्या पडत्या काळात माझ्या भावाने मला खूप साथ दिली. कुठे कामानिमित्त जायचं झालं तर तो त्याची गाडी मला द्यायचा. हे सांगायचं कारण असं, की मी आय २० माझ्या स्व-कमाईतून घेतली आणि ती माझ्या भावाच्या मुलीला तिच्या वाढदिवसानिमित्त गिफ्ट म्हणून दिली. हा क्षण मी कधीच विसरू शकत नाही. मलाच नव्हे; तर माझ्या कुटुंबामध्ये सगळ्यांनाच कारचं वेड आहे. सगळेच कारप्रेमी आहेत. त्यामुळे माझ्या घरासमोर नवनवीन मॉडेलच्या गाड्या असाव्यात, असे मला नेहमी वाटते. आताही माझ्याकडे चार कार आहेत. 

२०१७ नंतर मी एकेक गाडी घेत गेलो. माझ्याकडे व्हॅगनर आहे. सध्या मी स्कोडाची लॉरा ही गाडी वापरतो. अल्टो ८०० ही आहे. कारबरोबरच मला बाईकचंही प्रचंड वेड आहे. मी माझ्या साऱ्या गाड्यांची अगदी प्रेमाने काळजी घेतो. अगदी माझ्याकडे सायकल जरी असली तरी मी तिला अगदी योग्य पद्धतीने हाताळतो. मला जसं प्रेझेंटेबल राहायला आवडतं, तसंच मी माझ्या कारलाही प्रेझेंटेबल ठेवतो. माझी कोणतीही गाडी थोडी जरी खराब दिसली की लगेच मी सर्व्हिसिंगला नेतो. आपण जर गाडीला जपलं तर गाडी आपल्याला जपते. 

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेच्या चित्रीकरणासाठी मी कोल्हापूरमध्ये असतो. तिथेही मी माझी कार घेऊन जातो. चित्रीकरणामधून वेळ मिळाला किंवा एक दिवस सुट्टी असली की कोल्हापूरमध्येच जवळपास मित्रांसोबत कारने फिरायला जातो. बऱ्याचदा आम्ही पन्हाळ्याला जातो. शिवाय कोकणात माझे नातेवाईक राहतात, तिने जातो. हे माझ्या कारमुळेच सारं शक्‍य होतं. ड्रायव्हिंगची मला प्रचंड आवड आहे. त्यामुळे थोडा जरी रिकामा वेळ मिळाला की मी ड्रायव्हिंग करतो. माझं आणि माझ्या भावाचं एक स्वप्न आहे. एक जुन्या मॉडेलची कार घ्यायची आणि ती मॉडिफाय करून नव्या स्टाईलमध्ये बनवायची. आणखी एक लक्‍झरी कार माझ्याकडे असावी, अशी माझी इच्छा आहे. 
शब्दांकन : काजल डांगे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Be amazed to hear the dream of a rana