esakal | 'रिकामी घरे, बंगले, हॉल, गाळे कोरोना रुग्णांसाठी द्या'; भरत जाधवचं आवाहन

बोलून बातमी शोधा

bharat jadhav

'रिकामी घरे, बंगले, हॉल, गाळे कोरोना रुग्णांसाठी द्या'; भरत जाधवचं आवाहन

sakal_logo
By
स्वाती वेमूल

देशातील रुग्णवाढीचा चढता आलेख अद्यापही कायम आहे. शुक्रवारी राज्यात एका दिवसात सर्वाधिक ७७३ रुग्ण्यांच्या मृत्यूची नोंद झाली तर ६६,८३६ नवे रुग्ण आढळले. रुग्णांना रुग्णालयात बेड मिळणंही अवघड होत आहे. अशावेळी रिकामी घरे, बंगले, फ्लॅट्स, हॉल गाळे हे कोरोना रुग्णासांठी द्या, असं आवाहन मराठी अभिनेता भरत जाधव याने केलं आहे. भरतच्या सोसायटीमध्ये ही संकलप्ना अंमलात आणली होती. त्यामुळे त्याने तेच उदाहरण देत कशाप्रकारे कोरोनाबाधितांची आपण मदत करू शकतो, हे सहजपणे पटवून दिलं आहे.

काय आहे ही संकल्पना?

भरतने त्याच्या पोस्टमध्ये ही संकल्पना समजावून सांगितली. त्याने लिहिलं, 'सोशल मीडियावर एक पोस्ट वाचली, ती संकल्पना आवडली म्हणून शेअर करत आहे. एका अपार्टमेंट सोसायटीमधील हा प्रयोग, यावर सर्वांनी विचार करण्यासारखे आहे. माझ्या सोसायटीमध्ये चार जण पॉझिटिव्ह होते. बेड मिळत नव्हते, त्यात प्रत्येकांचे फ्लॅट १ बीएचके, त्यांच्या घरी वृद्ध पालक, त्यामुळे मी माझ्या सोसायटीमधील दोन रिकामे फ्लॅट्स ताब्यात घेतले आणि तेथे पॉझिटिव्ह रुग्ण शिफ्ट केले. दार उघडून जो तो जेवण, नाष्ता, औषधे देत होता. रिकाम्या फ्लॅट धारकांचा सहा महिन्यांचा मेंटेनन्स माफ केला, त्यामुळे त्यांनी सहकार्य केले. १५ दिवसांनी सर्वजण बरे झाले. आता तेच फ्लॅट्स इमर्जेंसीसाठी राखून ठेवले आहेत. हा छोटासा माझा प्रयत्न. आपल्या सर्वांचीच ही वेळ संकटातली आहे, अशा वेळी रिकामी घरे, बंगले, फ्लॅट, हॉल, गाळे यांचा समाजासाठी उपयोग व्हावा. हीच वेळ आहे पुढे होऊन आपले कर्तव्य करण्याची.'

हेही वाचा : बिल थकल्याने श्रवण यांचे पार्थिव देण्यास रुग्णालयाचा नकार? जाणून घ्या सत्य

भरत जाधवची ही संकल्पना नेटकऱ्यांनाही आवडली. 'लोकांना सध्या मदतीची फार गरज असून ही संकल्पना अंमलात आणता येईल', अशी कमेंट एकाने केली. तर 'खरोखर स्तुत्य उपक्रम आहे हा,' असं दुसऱ्याने म्हटलं.