esakal | बिल थकल्याने श्रवण यांचे पार्थिव देण्यास रुग्णालयाचा नकार? जाणून घ्या सत्य

बोलून बातमी शोधा

popular music director shravan rathod
बिल थकल्याने श्रवण यांचे पार्थिव देण्यास रुग्णालयाचा नकार? जाणून घ्या सत्य
sakal_logo
By
स्वाती वेमूल

संगीतकार श्रवण राठोड यांचं कोरोनामुळे निधन झालं. गुरुवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पण रुग्णालयाचं दहा लाख रुपयांचं बिल थकल्याने कुटुंबीयांना पार्थिव मिळण्यास विलंब होत असल्याची माहिती समोर येत होते. श्रवण राठोड यांना माहिम इथल्या रहेजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र रुग्णालयाचं बिल थकल्याच्या चर्चांवर आता श्रवण यांचे जवळचे मित्र आणि गीतकार समीर अंजान यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्या सर्व चर्चा खोट्या असल्याचं त्यांनी म्हटलंय.

"अशा तथ्यहीन बातम्या वाचून खरंच वाईट वाटतं. श्रवण यांच्या मोठ्या मुलाशी माझं बोलणं झालं आणि त्याने बिलशी संबंधित कोणतीच समस्या नसल्याचं स्पष्ट केलं. मेडिकल क्लेम डिपार्टमेंटशी संबंधित काही काम होतं आणि त्याला थोडा वेळ लागत होता. मोठा मुलगा संजीव आणि पत्नीलाही कोरोनाची लागण झाल्यामुळे रुग्णालयाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विलंब लागत होता", असं समीर म्हणाले.

कोरोनाची लागण होण्यापूर्वी श्रवण हे कुंभमेळ्याला गेले होते. तिथून परतल्यानंतर त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवत होती. त्यानंतर त्यांचा मोठा मुलगा आणि पत्नीलाही कोरोना झाला.

हेही वाचा : ज्येष्ठ अभिनेते ललित बहल यांचे कोरोनाने निधन

'दंगल' या भोजपुरी चित्रपटापासून श्रवण यांनी संगीतकार म्हणून सुरुवात केली. त्यानंतर हिंदीतील काही छोट्या चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. मात्र महेश भट्ट यांच्या 'आशिकी' या चित्रपटानंतर त्यांना खूप लोकप्रियता मिळाली. या चित्रपटातील रोमँटिक गाणी चांगलीच गाजली. या संगीतकार जोडीने 'साजन', 'सडक', 'दिल है की मानता नही', 'साथी', 'दिवाना', 'फूल और काँटे', 'राजा हिंदुस्थानी', 'जान तेरे नाम', 'रंग', 'राजा', 'धडकन', 'परदेस', 'दिलवाले', 'राज' अशा अनेक सिनेमांसाठी संगीत दिग्दर्शन केले होते.