अनुप-जसलीन 'हटके जोडी' बिग बॉसमध्ये!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 17 September 2018

मुंबई : छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय शो अर्थात ‘बिग बॉस’च्या बाराव्या मोसमाची सुरुवात झाली असून, 65 वर्षीय भजनसम्राट अनुप जलोटा हे त्यांच्या 28 वर्षीय गर्लफ्रेण्ड जसलीन हिच्यासोबत बिग बॉसच्या घरात दाखल झाले आहेत.

मुंबई : छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय शो अर्थात ‘बिग बॉस’च्या बाराव्या मोसमाची सुरुवात झाली असून, 65 वर्षीय भजनसम्राट अनुप जलोटा हे त्यांच्या 28 वर्षीय गर्लफ्रेण्ड जसलीन हिच्यासोबत बिग बॉसच्या घरात दाखल झाले आहेत.

प्रीमियर एपिसोडमध्ये अभिनेता सलमान खानने या मोसमातील 17 स्पर्धकांची ओळख करुन देताना 'विचित्र जोडी' म्हटले आहे. भजनसम्राट अनुप जलोटा (वय 65) हे त्यांची गर्लफ्रेण्ड जसलीन मथारू (वय 28) हिच्यासोबत बिग बॉसच्या घरात दाखल झाले आहेत. दोघांच्या वयामध्ये 37 वर्षांचे अंतर आहे. गेल्या साडेतीन वर्षांपासून ते रिलेशनशीपमध्ये आहेत. प्रीमियर एपिसोडमध्ये बिग बॉसच्या व्यासपीठावर अनुप जलोटा यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का देत प्रथमच त्यांनी जसलीन गर्लफ्रेण्ड असल्याचे मान्य केले. बिग बॉसच्या घरामध्ये दोघांनी प्रवेश केल्यानंतर सोशल मीडियावर दोघांबाबात चर्चा सुरू झाली आहे.

बिग बॉसच्या बाराव्या मोसमाचा भाग बनून अनुप जलोटा यांनी एका अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. अनुप जलोटा हे बिग बॉसच्या आतापर्यंतच्या सर्व मोसमातील सर्वाधिक मानधन घेणारे स्पर्धक ठरले आहेत. त्यांना प्रत्येक आठवड्याला 45 लाख रुपये मानधन दिले जाणार आहे. याआधी बिग बॉसमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या स्पर्धकांच्या यादीत टीव्ही अभिनेत्री हिना खान हिचे नाव पहिल्या स्थानी होते. तिला आठवड्याला 40 लाख रुपयांचे मानधन दिले जात होते. हिना खान अकराव्या मोसमात बिग बॉसची स्पर्धक होती.

दरम्यान, बिग बॉसमध्ये सहभागी होण्याआधी ज्यावेळी अनुप जलोटा यांना जसलीनबाबत प्रश्न विचारले गेले, त्यावेळी त्यांनी अफवा असल्याचे म्हटले होते. जसलीनने मात्र अनुप जलोटांसोबत साडेतीन वर्षांपासून डेट करत असल्याचे एका मुलाखतीत सांगितले होते. मात्र, अनुप जलोटा यांनी थेट बिग बॉसच्या व्यासपीठावरुनच दोघांच्या नात्याबद्दल माहिती दिली आहे. प्रीमियर एपिसोडमध्ये बिग बॉसच्या व्यासपीठावर एकमेकांवरील प्रेमाची जाणीवही करून दिली.

जसलीनचा जन्म मुंबईमधील असून, ती गायक व अभिनेत्री आहे. तिने प्रसिद्ध गायक मिका सिंग सोबत तिन वर्ष गायक म्हणून काम केले आहे. अनुप जलोटा हे प्रसिद्ध भजनसम्राट असून, त्यांचे विविध ठिकाणी कार्यक्रम होत असतात. अनुप जलोटा यांच्याकडे जसलीन गायनाचे धडे घेत होती. यावेळी दोघांमध्ये मैत्री झाली. पुढे मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले, याबद्दलची माहिती दोघांनी बिग बॉसच्या स्टेजवर दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bigg Boss 12: Anup Jalota Girlfriend Jasleen Matharu in bigg boss house