esakal | 'हाच बिग बॉसचा विजेता ठरणार'; प्रेक्षकांचा मोठा पाठिंबा असलेला हा स्पर्धक कोण?
sakal

बोलून बातमी शोधा

bbm 3

BBM 3: 'हाच विजेता ठरणार'; प्रेक्षकांचा मोठा पाठिंबा असलेला हा स्पर्धक कोण?

sakal_logo
By
स्वाती वेमूल

Bigg Boss Marathi 3: 'बिग बॉस मराठी'च्या तिसऱ्या सिझनची धमाकेदार सुरुवात झाली. या सिझनमध्ये एकापेक्षा एक तगडे स्पर्धक घरात एकत्र आले आहेत. बिग बॉसने दिलेल्या टास्कमध्ये कोण कशी कामगिरी करतंय, घरातील इतर स्पर्धकांसोबत कोण कसं वागतंय यांसारख्या निकषांवर प्रत्येक स्पर्धकाची प्रेक्षकांच्या मनात एक प्रतिमा तयार होत असते. एकीकडे गायत्री दातार आणि मीरा जगन्नाथ यांच्याविषयी सोशल मीडियावर नकारात्मक प्रतिक्रिया येत असताना दुसरीकडे बिग बॉसच्या घरातील एका स्पर्धक मात्र प्रेक्षकांची मनं जिंकतोय. या स्पर्धकाने अगदी पहिल्या एपिसोडपासून स्वत:चा चाहतावर्ग तयार केला आहे. हा स्पर्धक आहे अभिनेता विशाल निकम Vishal Nikam.

विशाल निकमच्या खेळीवर नेटकरी खूश असून सोशल मीडियावर त्याला मोठा पाठिंबा मिळत आहे. टास्कमधील विशालची कामगिरी, सहस्पर्धकांसोबतचं वागणं पाहून तोच अखेरपर्यंत टिकून विजेता ठरेल, असं मत नेटकऱ्यांनी व्यक्त केलं आहे. बिग बॉसच्या घरात गेल्या दोन दिवसांपासून हल्लाबोल हा टास्क सुरू होता. या टास्कदरम्यान टीम ए आणि टीम बीमध्ये शाब्दिक युद्ध बरेच रंगले. यावेळी अक्षय आणि विशालमध्ये वादाची ठिणगी पडते. अक्षयच्या अंगावर पाणी पडल्याने विशाल आणि त्याच्यात भांडण होतं. यानंतरही नेटकऱ्यांनी विशालला पाठिंबा दर्शविला.

हेही वाचा: प्रकृतीच्या कारणास्तव शिवलीला पाटील 'बिग बॉस'च्या घराबाहेर

हेही वाचा: 'गायत्री-मीराला बिग बॉसच्या घराबाहेर काढा'; नेटकरी भडकले

विशाल तू बिग बॉसच्या घरातून जाऊ नकोस, अशी कमेंट एकाने केली. तर बिग बॉसमध्ये तोच टिकतो जो खरा आहे आणि विशालच टिकणार, असं दुसऱ्याने लिहिलं. विशाल, विकास आणि मीनल हे त्रिकुट शेवटपर्यंत राहील, असंही एकाने म्हटलंय. विशालच विजेता ठरणार, असा विश्वास नेटकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

कोण आहे विशाल निकम?

२७ वर्षीय विशालने टीव्ही आणि चित्रपटविश्वात नाव कमावलंय. सोशल मीडियावर त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. 'दख्खनचा राजा ज्योतिबा' या मालिकेत ज्योतिबांची भूमिका साकारून तो घराघरात पोहोचला. 'जय भवानी जय शिवाजी' या मालिकेतील त्याच्या शिवा काशिदच्या भूमिकेलाही प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं. विशालचा जन्म १० फेब्रुवारी १९९४ रोजी सांगलीतील देवखिंडी याठिकाणी झाला. अभिनेत्याशिवाय तो फिटनेस ट्रेनर आणि मॉडेलसुद्धा आहे. २०१८ मध्ये 'मिथून' या चित्रपटातून त्याने कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटात त्याने मुख्य भूमिका साकारली होती. यानंतर तो 'धुमस' चित्रपटातही झळकला.

loading image
go to top