'या' नवीन ठिकाणी होणार 'बिग बॉस मराठी'चे दुसरे पर्व

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मार्च 2019

'बिग बॉस' प्रमाणे 'बिग बॉस मराठी' पहिल्या पर्वाचेही शूटींग लोणावळा येथे करण्यात आले होते. मात्र आता हा सेट लोणावळ्यात उभा केला जाणार नाही.

'बिग बॉस मराठी'चे पहिले पर्व गाजल्यानंतर आता दुसरे पर्वही प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहे. पहिल्या पर्वाचे विजेतेपद अभिनेत्री मेघा धाडे हिने जिंकले होते. आता दुसऱ्या पर्वासाठीही बिग बॉस मराठीची टीम कामाला लागली आहे. 

'बिग बॉस' या शोचे सूत्रसंचालन अभिनेता सलमान खान करतो. या कार्यक्रमाच्या धर्तीवरच भारतात अनेक भाषांमध्ये 'बिग बॉस' शो सुरु आहे. 'बिग बॉस मराठी'चीही सुरवात अशीच झाली. म्हणूनच 'बिग बॉस' प्रमाणे 'बिग बॉस मराठी' पहिल्या पर्वाचेही शूटींग लोणावळा येथे करण्यात आले होते. मात्र आता हा सेट लोणावळ्यात उभा केला जाणार नाही. तर एका वृत्त वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, या शो चे चित्रीकरण मुंबई फिल्मसिटीमध्ये होणार आहे. बिग बॉस मल्याळमचे चित्रीकरणही येथेच करण्यात आले आहे. मुंबईत चित्रीकरण करणे हे सोयीस्कर असल्याने 'बिग बॉस मराठी'च्या टिमने हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे. 

दुसऱ्या पर्वात कोण कलाकार सहभागी होतील याविषयी सध्या बिग बॉसच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. मात्र शैलेश दातार, अक्षया गुरव, वीणा जगताप, अर्चना निपाणकर, गौतम जोगळेकर हे कलाकार दुसऱ्या पर्वात दिसतील अशी चर्चा आहे. 'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या पर्वाचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर यांनी केले होते. आता दुसऱ्या पर्वामध्ये देखील तेच या कार्यक्रमाची धुरा सांभाळणार आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bigg Boss Marathi Second Season Shoot Will Be In Mumbai Film City