
कंगना हाजीर हो! वेळ नाही म्हणून केली टाळाटाळ
मुंबई : सतत वेगवेगळ्या प्रकारची वादग्रस्त वक्तव्य करुन लक्ष वेधून घेणाऱ्या कंगनाचा (kangana ranaut) परिचय कुणालाही नवीन नाही. ती आपल्या बेताल वक्तव्यासाठी ओळखली जाते. आपण जे काही बोलतो त्याचे परिणाम तिला माहिती असून देखील धाडसानं ती बेताल वक्तव्यं करते यामुळे तिनं अनेकदा कित्येकांची नाराजीही ओढावून घेतली आहे. सध्या ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्याचे कारण म्हणजे तिनं चौकशीला सामोरं जाण्यास केलेली टाळाटाळ. याचा फटका तिला बसला आहे. संबंधित न्याय प्रशासनानं तिला चौकशीला हजर राहण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कंगनाची अडचणीत वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे.
त्याचं झालं असं की, काही दिवसांपूर्वी कंगनानं केलेल्या बेताल वक्तव्यामुळे तिच्या विरुद्ध एफआयआर मुंबईतील एका पोलीस (mumbai police) स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती. त्यासंबंधीची फिर्याद दिल्ली शीख गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अमरजित सिंग संधू यांनी दिली होती. त्यांच्यासह शिरोमणी अकाली दलाच्या नेत्यांनीही तक्रार दिली होती. तक्रारकर्त्यांनी कंगनावर आंदोलक शेतकर्यांना खलिस्तानी दहशतवादी म्हटल्याचा आरोप त्या तक्रारीत केला होता. यामुळे शीख समुदायाच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला होता. यासंबंधी मुंबई पोलिसांनी तिला चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र कंगनाला त्यानंतर पुन्हा एकदा नोटीस पाठवण्यात आली. त्यामध्ये तिला हजर राहण्यास बजावण्यात आले आहे.
याप्रकरणी कंगनाच्या वकिलांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितलं की, कंगना तिच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तसेच ती मुंबईबाहेर आहे. अशा परिस्थितीमध्ये खार पोलीस ठाण्यात त्यांचे म्हणणे नोंदवण्याकरिता त्यांना थोडा वेळ लागेल. तो आम्हाला मिळावा. अशी मागणी केली आहे. कंगना पुन्हा मुंबईत आल्यानंतर चौकशीला सामोरं जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. आज कंगनाला खार पोलिस स्टेशनमध्ये तिची बाजु मांडण्यासाठी बोलवण्यात आले होते.