'हत्तीच्या अंगावर फेकला जळता टायर; अरे कुठे गेली माणूसकी'

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 24 January 2021

तामिळनाडू मधील निलगिरी येथे हा माणूसकीला काळीमा फासणारा प्रकार पाहायला मिळाला आहे. 

मुंबई - माणूस स्वताच्या स्वार्थासाठी काय करु शकतो याचा प्रत्यय यापूर्वी अनेकदा आला आहे. प्राण्यांना मारणे, त्यांच्या कत्तली करणे अशी कृत्ये त्यानं केली आहे. त्यांचा नैसर्गिक अधिवास नष्ट करुन त्यांना रस्त्यावर आणण्यास प्रवृत्त करणा-या माणसानं फायद्यासाठी निष्पाप प्राण्यांचा बळीही दिला आहे. मागील वर्षी तामिळनाडू मध्ये एका हत्तीला क्रुरपणे मारल्याची घटना घडली होती. त्याच्यानंतर पुन्हा अशाच प्रकारची एक घटना तामिळनाडू मध्ये घडली असून त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. या घटनेचा कलावंतानी परखड शब्दांत निषेध केला आहे.

तामिळनाडू मधील निलगिरी येथे हा माणूसकीला काळीमा फासणारा प्रकार पाहायला मिळाला आहे. एका महाभागानं चक्क जळता टायर हा हत्तीच्या अंगावर टाकला आहे. त्यात तो हत्ती गंभीररीत्या भाजला आहे. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो व्हायरल झाल्यानंतर लोकांनी त्या घटनेविरोधात निषेध व्यक्त केला आहे. त्या हत्तीचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला आहे. टविटरवर तर हा विषय ट्रेंडिग झाला आहे. अनेकांनी त्यावर आपली नाराती व्यक्त केली आहे. #ElephantDeath सध्या मोठ्या प्रमाणात सुरु आहे.  राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी माणूसकीचा अंत झाल्याचे म्हटले आहे.

याबाबत अधिक माहिती देताना स्थानिक वनाधिका-यानं सांगितले की, एक हत्ती हा आपला रस्ता चुकला होता. त्यावेळी तो एका बांधाच्या बाजूला पडलेला दिसला. त्यावेळी आम्ही त्याला वाचविण्याचा खुप प्रयत्न केला होता. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. तो 50 वर्षीय हत्ती उपचारा दरम्यान मृत्युमुखी पडला. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. ज्यावेळी लोकांनी सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ पाहिला त्यावेळी त्यांनी नाराजी जाहीर केली. ते म्हणाले आता माणूसकी संपत चालली आहे. कुणाला प्राण्यांबद्दल दया वाटत नाही. सगळेजण त्यांना मारायला टपले आहेत. यात काही कलाकारांनी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अभिनेता कमल हसन, कोएना मित्रा, प्रणिता सुभाष यांनीही राग व्यक्त केला आहे.

मागच्या वर्षी केरळ मधल्या एका गर्भवती हत्तीणीचा फटाके खाल्लानं मृत्यु झाला होता. त्या हत्तीणीचा एका तलावात मृत्यु झाला होता. कमल हसन म्हणाले की, माणसानं जंगलं उध्दवस्त करुन टाकली आहेत. त्याला कुणाची काळजी नाही. ज्या राष्ट्राची उभारणी केली त्यासाठी जंगले नाहीशी केली. यासगळ्यात आपल्याला वन्यप्राण्यांचा विसर पडला. त्यांना जिवंत जाळण्याचा अधिकार आपल्याला कुणी दिला, ही कुठली अमानुष पध्दती आहे, रणदीप हुडानं जे काही चाललं आहे ते अतिशय भयानक असल्याचे म्हटले आहे. तर अभिनेत्री कोएना मित्रानं मानवतेच्या नियमांचे उल्लंघन अशाप्रकारच्या कृतीतून होत असल्याचे म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bollywood celebrity angry over the barbaric killing elephants in tamilnadu said humanity dead