esakal | 'रहना है तेरे दिल में' चे छायाचित्रकार जॉनी लाल काळाच्या पडद्याआड

बोलून बातमी शोधा

bollywood cinematographer johnny lal
'रहना है तेरे दिल में' चे छायाचित्रकार जॉनी लाल काळाच्या पडद्याआड
sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - प्रख्यात छायाचित्रकार जॉनी लाल यांचे निधन झाले आहे. प्रसिध्द अभिनेता आर.माधवन याने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन ही माहिती दिली आहे. त्यांना काही दिवसांपूर्वी कोरोना झाला होता. त्यात त्यांचे निधन झाल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. कोरोना झाल्यानंतर ते घरीच क्वॉरंनटाईन झाले होते. तिथेच त्यांच्यावर उपचारही सुरु होते. अखेर त्यांचे मुंबईतील राहत्या घरी निधन झाले. लाल यांची दोन आठवड्यांपासून जगण्यासाठी सुरु असलेली लढाई अखेर संपुष्टात आली आहे. त्यांच्या जाण्यानं बॉलीवूडमध्ये शोककळा पसरली असून वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी त्यांना श्रध्दांजली वाहिली आहे.

प्रसिध्द अभिनेता आर.माधवन याने जॉनी यांच्याविषयी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यात त्यानं म्हटलं आहे की, आम्ही आता एका महान व्यक्तीला निरोप दिला आहे. त्यांनी माझ्या रहना है तेरे दिल में या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी केली होती. देव त्यांच्या आत्म्याला चिरंशांती देवो ही त्याच्याकडे प्रार्थना. सरांचे व्यक्तिमत्व हे प्रभावी होते. त्यांचा नम्रपणा, दयाळु स्वभाव आम्हाला सतत प्रेरणा देणारा होता. त्यांनी अतिशय सुंदरपणे रहना है तेरे दिल में मध्ये काम केले होते. मला खुप वाईट वाटत आहे.

जॉनी लाल यांनी तुषार कपूरच्या मुझे कुछ कहना है चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी केली होती. त्यावर तुषार कपूर यानेही लाल यांना श्रध्दांजली वाहिली आहे. माझ्या चित्रपटात सुंदर सिनेमॅटोग्राफी केल्याबद्दल त्यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो. तुमच्या अनेक आठवणी मनात ताज्या आहेत. जॉनी लाल हे प्रसिध्द सिनेमॅटोग्राफर कबीर लाल आणि आमिर लाल यांचे भाऊ होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात त्यांनी उत्तर भारतातील अनेक ठिकाणी शुटिंगचे काम सुरु केले होते. मुंबईत शुटिंग सुरु असताना जॉनी आजारी प़डले होते. तो चित्रपट त्यांना मध्येच सोडावा लागला होता.