बॉलीवूडमध्ये पदार्पण हा चत्मकारच... 

तेजल गावडे 
सोमवार, 3 जुलै 2017

सुनील दर्शन निर्मित व दिग्दर्शित "एक हसीना थी, एक दिवाना था' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झालाय. या रोमॅंटिक थ्रिलर चित्रपटात काम करण्याचा अनुभव कसा होता... सांगतेय या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री नताशा फर्नांडिस... 

मला बालपणापासूनच अभिनयाची आवड होती. जशी मी मोठी झाले तसतशी अभिनयात जास्त रुची निर्माण झाली. शाळा-महाविद्यालयातील नाटकांत मी हिरिरीने भाग घ्यायचे. लेक्‍चर बंक करून मी ऑडिशनला जायचे. ऍक्‍टिंग, पेंटिंग, लिखाण असं क्रिएटिव्ह काम करायला मला खूप आवडायचं; पण अभ्यास करायला मला अजिबात आवडायचं नाही. पुस्तक पाहून मला अक्षरश: झोप यायची. गेल्या वर्षी 28 जूनला माझ्या मैत्रिणीसोबत मी वांद्रे येथील बॉम्बे सॅलाड रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले होते. त्या वेळी तिथे योगायोगाने दिग्दर्शक सुनील दर्शन यांच्याशी भेट झाली. मला माहीत नव्हतं, की त्या दिवसानंतर माझं संपूर्ण आयुष्य बदलणार आहे. आमचं जेवण आटोपल्यानंतर आम्ही तिथून निघणार होतो. तेव्हा आम्हाला त्यांच्या मित्राने बोलावलं आणि आम्ही सुनील दर्शन यांच्या टेबलापाशी गेलो. तेव्हा दिग्दर्शक सुनील दर्शन यांची त्यांनी ओळख करून दिली. त्यांनी माझ्यातील टॅलेंट ओळखलं आणि मला त्यांच्या "एक हसीना थी एक दिवाना था' चित्रपटातील मुख्य नायिकेच्या रोलसाठी विचारलं आणि दुसऱ्या दिवशी फोटो शूटसाठी बोलावलं. अशी या चित्रपटासाठी माझी निवड झाली. 
मी मध्यमवर्गीय कुटुंबातील असून आमच्या घरातली मी पहिलीच कलाकार आहे. माझे वडील बिझनेसमन आहेत. माझ्या पालकांची मी बॅंकेत काम करावं किंवा सीए करावं, अशी इच्छा होती. एकदा जेव्हा सहजच मी ऍक्‍टर बनायचं आहे, असं बोलले होते तेव्हा ते खूप नाराज झाले होते. पण जेव्हा माझी या चित्रपटासाठी निवड झाली, तेव्हा मी आईला मिठी मारून सांगितलं, की मला चित्रपटात मुख्य भूमिका मिळालीय. आपल्या मुलीचं स्वप्न सत्यात उतरणार आहे हे बघून आईने मला पाठिंबा दिला. माझे वडील खूप कडक शिस्तीचे आहेत. सुरुवातीला माझे त्यांच्यासोबत वादही झाले; पण शेवटी तेदेखील माझ्या आनंदासाठी तयार झाले. 

"एक हसीना थी एक दिवाना था' चित्रपटातील माझ्या भूमिकेचं नावसुद्धा नताशाच आहे. मला भेटण्याआधीच चित्रपटातील मुख्य नायिकेचं नाव ठरलेलं होतं. हे फारच योगायोगाने घडून आलं. माझ्यातील टॅलेंट पाहून माझी निवड झाली, हे कोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नाही. चित्रपटातील नताशा ही खूप पॅशनेट आहे. ती नेहमी मनापासून विचार करते आणि ती हॅप्पी गो लकी आहे. 

मी अभिनयाचं कोणतंही प्रशिक्षण घेतलेलं नाही. मी जे काही ट्रेनिंग घेतलं आहे, ते "एक हसीना थी एक दिवाना था' चित्रपटाच्या वर्कशॉपमध्ये घेतलंय. सुनील दर्शन, शिव दर्शन व उपेन पटेल यांच्यासोबतच माझी कार्यशाळा झाली. दोन महिन्यांचं वर्कशॉप होतं. त्यात मी सरोज खान यांच्याकडून नृत्य शिकले. या चित्रपटात घोडेस्वारी हा खूप महत्त्वाचा भाग असल्यामुळे घोडेस्वारी शिकले. या क्षेत्राबद्दलचं ज्ञान मला सुनील दर्शन व माझ्या सहकलाकारांकडून मिळालं. 

"एक हसीना थी एक दिवाना था' या माझ्या पहिल्या सिनेमाचा अनुभव खूप छान होता. सुरुवातीला चित्रीकरणावेळी कॅमेऱ्याला सामोरे जाताना व इतक्‍या लोकांसमोर अभिनय करताना खूप भीती वाटत होती. आम्ही नोव्हेंबर-डिसेंबरच्या दरम्यान लंडनमधे चित्रीकरण केलं. त्या वेळी तिथे खूप थंडी होती. आणि आम्ही तिथे उन्हाळ्यातील कपडे घातले होते. पहिल्या दिवशी सकाळी लवकर उठून तयार झाले. माझा पहिला शॉट होता. सुनील सर रोलिंग, कॅमेरा व ऍक्‍शन म्हणाले, की आमची भीती निघून जायची. इतकंच नाही; तर आमची थंडीही दूर पळायची. उपेन पटेल व शिव दर्शन या दोघांसोबत काम करण्याचा अनुभव खूपच मजेशीर होता. दोघंही खूप मस्तीखोर आहेत. आमचं ट्युनिंग जमायला थोडा वेळ लागला. एके दिवशी घोडेस्वारीसाठी जात होतो. त्या वेळी दूरदर्शन वाहिनीवरील निरमा, लिज्जत पापड अशा बऱ्याच जाहिरातींच्या जिंगल्स आठवून बालपणींच्या आठवणींना उजाळा दिला. तेव्हापासून आमच्यात मैत्री झाली. आधी माझं आयुष्य खूप साधं होतं. पण आता आयुष्य पूर्णपणे बदललंय. मला स्वत:मध्ये खूप बदल करावा लागला. आता मी आत्मविश्‍वासपूर्ण काम करू शकते. 

Web Title: Bollywood debut is a hit : natasha fernandez