‘जयप्रभा’तील शूटिंग बनली माझी प्रेरणा...!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 मे 2019

२०११ साली स्वतःचाच एडिटिंग स्टुडिओ सुरू केला आणि आजवर अनेक चित्रपट, लघुपट, माहितीपटांबरोबरच म्युझिक अल्बमसाठी एडिटिंग केले. कलापूरच्या प्रोत्साहनामुळेच हा सारा प्रवास सुरू असून येत्या काळातही बरेच काही करायचे आहे

-  किरण जेजूरकर

तसे पाहिले तर माझे शिक्षण डिप्लोमा इन इलेक्‍ट्रॉनिक्‍स; पण करिअर म्हणून प्रवास सुरू झाला तो एका जाहिरात कंपनीत मार्केटिंग मॅनेजर म्हणून. कधी प्रॉडक्‍शन हेड, कॅमेरामन, तर कधी व्हिडिओ एडिटर म्हणूनही काम केले; पण २०११ साली स्वतःचाच एडिटिंग स्टुडिओ सुरू केला आणि आजवर अनेक चित्रपट, लघुपट, माहितीपटांबरोबरच म्युझिक अल्बमसाठी एडिटिंग केले. कलापूरच्या प्रोत्साहनामुळेच हा सारा प्रवास सुरू असून येत्या काळातही बरेच काही करायचे आहे... युवा फिल्म एडिटर, कॅमेरामन किरण जेजूरकर संवाद साधत असतो. नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘हलगी शान महाराष्ट्राची’ या चित्रपटाला रसिक मायबाप प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळतो आहे. या चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्‍शनचे सारे काम कोल्हापुरात केल्याचेही तो अभिमानाने सांगतो.      

किरण राहायला नेहरूनगर परिसरात. राजारामपुरीत ‘जेके’ या नावाने त्याचा स्टुडिओ आहे. त्याचे शिक्षण झाले ते शाहू दयानंद हायस्कूलमध्ये. बालवाडीपासून या शाळेत शिकताना पलीकडे जयप्रभा स्टुडिओत सुरू असणारी शूटिंग त्याला सतत खुणवायची. अर्थातच शालेय वयापासूनच फिल्म इंडस्ट्रीत येण्याचा संकल्प त्याने केला. आजवर त्याने दोनशेहून अधिक जाहिरातीला, सव्वाशेहून अधिक माहितीपट, दीडशेहून अधिक लघुपटांसाठी, तर वीसहून अधिक हिंदी-मराठी अल्बमसाठीही त्यानं काम केलं. ‘क्रांती’, ‘डेप्थ’, ‘बाभळी’, ‘धर्म माझा भारतीय’, ‘डंबऱ्या’, ‘हलगी’, ‘सेव्ह वॉटर’, ‘नॉन ग्रॅंटेबल’, ‘कुणाचा तरी’ अशा अनेक लघुपटांना विविध महोत्सवात अनेक पारितोषिके मिळाली. त्यानं केलेल्या ‘मन सुटलं’ आणि ‘नगरसेवक झालो’ ही अल्बम साँग्ज्‌ ‘यूट्यूब’वर चांगलीच हिट झाली आहेत. गेल्या चार वर्षांत पाच मराठी चित्रपटांसाठी त्यानं एडिटिंग केलं असून एका हिंदी चित्रपटासाठी कॅमेरामन म्हणूनही काम केलं आहे. आजपर्यंतच्या या प्रवासात सलीम फरास, अजित तांबेकर, अरविंद गंगाधर, अलका कुलकर्णी, भरत दैनी आदींचे मार्गदर्शन मिळाल्याचे तो आवर्जून सांगतो.  

सद्यःस्थितीत मराठी चित्रपटाचे शूटिंग झालं की, पोस्ट प्रॉडक्‍शनसाठी मुंबई गाठावी लागते. मात्र, आम्ही सारे मिळून या गोष्टीही कोल्हापुरातच चांगल्या पद्धतीने कशा करता येतील, यासाठी प्रयत्न करतो. कलापूरला पुन्हा या क्षेत्रात आणखी मोठं करायचं आहे.
- किरण जेजूरकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cameraman Kiran Jejurkar interview in Amhi Kolhapuri