प्रेरणा कलापूरच्या पहिल्या कॅमेऱ्यापासूनच...!

संभाजी गंडमाळे
मंगळवार, 21 मे 2019

मुळात हे क्षेत्र संघर्षाचं आहे. नव्या पिढीची झटपट पैसा म्हणजे फिल्म इंडस्ट्री, अशी मानसिकता आहे. मात्र, इथे प्रामाणिकपणे कष्ट करण्याची तयारी असणाराच पाय घट्ट रोवून उभे राहू शकतो.
- सुरेश पाटील

भारतीय बनावटीचा पहिला कॅमेरा तयार झाला तो कलापुरात. कलामहर्षी बाबूराव पेंटर, आनंदराव पेंटर यांच्या याच कॅमेऱ्याच्या साक्षीने कोल्हापूरच्या चित्रपट व्यवसायाला प्रारंभ झाला. एक छायाचित्रकार, कॅमेरामन म्हणून नेहमीच या कॅमेऱ्यानं प्रेरणा दिली आणि वृत्तपत्रासाठी फोटोग्राफी, छोटे म्युझिक अल्बम करता करता विविध शॉर्टफिल्म व चित्रपटांसाठीही काम करू लागलो...प्रसिद्ध कॅमेरामन सुरेश पाटील संवाद साधत असतात. त्यांच्या एकूणच साऱ्या प्रवासाचा पट यानिमित्ताने उलगडत जातो.

श्री. पाटील यांचे मूळ गाव शिरोळ तालुक्‍यातील निमशिरगांव. मात्र, सारे बालपण आणि शिक्षण झाले ते किणी (ता. हातकणंगले) येथे मामाच्या गावी. १९९३ ला त्यांनी फोटोग्राफीचे शिक्षण घेतले आणि हौशी फोटोग्राफी करत करत व्यवसायालाही सुरुवात केली. हौशी फोटोग्राफी करताना जाणीवपूर्वक राष्ट्रीय कार्यक्रमांवर ते भर देऊ लागले. भारतीय स्वातंत्र्याची पन्नासी, पल्स पोलिओ कार्यक्रमाच्या त्यांच्या छायाचित्रांना ‘सकाळ’ने पहिल्यांदा प्रसिद्धी दिली आणि त्यांचे नाव अनेक घरांत पोचले. त्यानंतर २००४ पासून एका न्यूज चॅनेलसाठीही काम करत असतानाच त्यांची शॉर्टफिल्म आणि चित्रपटांत कॅमेरामन म्हणून एंट्री झाली. 

गोवा येथे मराठी व कोकणी चित्रपटांसाठी त्यांनी सहायक कॅमेरामन म्हणून काम केले. सातारा येथे ‘झोला’ चित्रपटासाठी मुख्य कॅमेरामन म्हणून काम केले. पण, हा चित्रपट काही तांत्रिक अडचणींमुळे रिलीज झाला नाही. शिवाजी विद्यापीठातील मास कम्युनिकेशन विभागातील विद्यार्थ्यांच्या दहा माहितीपटासाठी छायाचित्रण केले. त्यातील ‘अभंग काळोखाचे’ या माहितीपटाला अनेक पारितोषिकं मिळाली. अभिनेता व दिग्दर्शक (कै) सागर चौगले यांच्याबरोबर अनेक जाहिराती आणि माहितीपटांसाठी काम केलं. आजवर पन्नासहून अधिक माहितीपट, सव्वाशेहून अधिक लघुपट आणि सात म्युझिक अल्बमसाठी त्यांनी छायाचित्रण केलं. नुकतेच जगदीश वाठारकर दिग्दर्शित ‘खाऊन पिऊन जगायचं’ या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं असून, लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

मुळात हे क्षेत्र संघर्षाचं आहे. नव्या पिढीची झटपट पैसा म्हणजे फिल्म इंडस्ट्री, अशी मानसिकता आहे. मात्र, इथे प्रामाणिकपणे कष्ट करण्याची तयारी असणाराच पाय घट्ट रोवून उभे राहू शकतो.
- सुरेश पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cameraman Suresh Patil interview Amhi Kolhapuri