प्रेक्षकांसाठी खुशखबर; चित्रपटगृहे 100 टक्के क्षमतेनं होणार सुरु  

central government issues guidelines 100 percent occupancy allowed in cinema halls from February 1
central government issues guidelines 100 percent occupancy allowed in cinema halls from February 1

मुंबई -  कोरोनामुळे प्रशासनानं सांगितलेल्या नियमानुसार चाललेल्या चित्रपटगृह चालकांना केंद्र शासनानं हिरवा कंदील दाखवला आहे. त्यांनी आता 100 टक्के क्षमतेनं चित्रपटगृह सुरु करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे चित्रपटगृह चालकांनी समाधान व्यक्त केले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना मोठ्या आर्थिक समस्येला सामोरं जावं लागत  होते. यानिमित्तानं परिस्थिती पूर्वपदावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सरकारनं पुन्हा नवी काही नियमावली जाहीर केली असून त्यात चित्रपटगृह चालकांना सवलती देण्यात आल्या आहेत.

1 फेब्रुवारीपासून 100 टक्के क्षमतेनं थिएटर सुरु होणार आहेत. कोविडच्या दरम्यान थिएटर चालकांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला होता. कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी सहा महिन्यांहून अधिक काळ थिएटर बंद ठेवली होती. थिएटर सुरु करावी म्हणून थिएटर संघटनेकडूनही वेळोवेळी निवेदनं शासनाला देण्यात आली होती. त्यावर सरकारनं 50 टक्के क्षमतेनं ती सुरु करण्यास परवानगी दिली होती. मात्र प्रेक्षकांची संख्या आणखीनच कमी झाल्यानं पुन्हा मोठा प्रश्न निर्माण झाला. यावेळी सरकारनं सध्याच्या परिस्थितीचा अंदाज पाहता 100 टक्के क्षमतेनं ती सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

यासंबंधीची अधिक माहिती सूचना आणि प्रसारण मंत्रालयानं दिली आहे. त्यासाठी थिएटरकरिता नव्यानं मानक संचालन प्रक्रिया (एसओपी) जाहीर केली आहे. आता 1 फेब्रुवारीपासून सिनेमागृह हे 100 टक्के क्षमतेनं सुरु करण्यात येणार आहे. सिनेमागृह सुरु करण्यास परवानगी दिल्यास कोरोनाचा धोका वाढेल अशी भीती प्रशासनाला असल्यानं त्यांनी यापूर्वी चित्रपटगृहांच्या प्रश्नावर तातडीनं निर्णय घेण्यास टाळाटाळ केली होती. चित्रपट पाहताना मास्कचा वापर करणे, दोन सीटमध्ये पुरेसे अंतर ठेवणे, शो चे बुकिंग याविषयी काही सुचना प्रशासनाकडून करण्यात आल्या होत्या. 

आता नव्यानं सुचना संबंधित प्रशासनानं जाहीर केल्या आहेत. त्यात हॉलच्या बाहेर असणा-या वेटिंग रुममध्ये किमान सहा फुटाचे अंतर ठेवणे गरजेचे आहे. प्रत्येकवेळी तोंडाला मास्क असणे अनिवार्य आहे. सिनेमागृहात प्रवेश करताना सॅनिटायझरचा वापर करणे तसेच सुरक्षेची काळजी घेणे गरजेचं आहे. कोविडच्या सर्व नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. कोणी खोकत अथवा शिंकत असल्यास त्याच्याकडे लक्ष देणे, त्यासाठी वेगळ्या आसनाची व्यवस्था करणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले आहे. इतरत्र कुठेही थुंकण्यास मनाई करण्यात आली आहे. कोणी आजारी व्यक्ती सिनेमागृहात आल्यास तातडीनं राज्यशासनाच्या आरोग्य खात्याला त्याची माहिती देणं महत्वाचे आहे असे सांगण्यात आले आहे. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com