
आंतराष्ट्रीय पातळीवर युद्धनीतीचे आदर्श मानले जाणारे महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्ण इतिहासातील आणखी एक सोनेरी अध्याय मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. लेखक-अभिनेता-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरच्या संकल्पनेतून उदयास आलेल्या शिवराज अष्टकातील 'पावनखिंड' (Pavankhind) या तिसऱ्या चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराजांचा लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये पुन्हा एकदा शिवरायांच्या रूपात रसिकांचा लाडका अभिनेता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) झळकला आहे. 'फर्जंद' आणि 'फत्तेशिकस्त' या दोन चित्रपटांच्या अभूतपूर्व यशानंतर 'पावनखिंड'साठी चिन्मयनं पुन्हा एकदा आपल्या मस्तकी शिवरायांचा जिरेटोप चढवला आहे.
ए.ए.फिल्म्स प्रस्तुत आणि आलमंड्स क्रिएशन्स निर्मित 'पावनखिंड' चित्रपट २१ जानेवारी २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. अजय आरेकर, अनिरुद्ध आरेकर आणि भाऊसाहेब आरेकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आजवर दिग्पालनं लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या दोन्ही चित्रपटांमध्ये महाराजांची दोन भिन्न रूपं पहायला मिळाली आहेत. आता 'पावनखिंड' मध्ये पुन्हा महाराजांची तळपती तलवार रसिकांना पहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या पोस्टरवर चिन्मयचं आजवर कधीही न दिसलेलं करारी रूप पहायला मिळत आहे. हुबेहूब शिवराय भासावेत असा पेहराव, भाळी कुमकुम तिलक, उजव्या हातात गनिमांवर तुटून पडणारी तलवार आणि पाठीमागे ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करत मुसळधार पावसातही डौलानं फडकणारा भगवा झेंडा असं काहीसं शिवरायांचं चिन्मयरूप 'पावनखिंड'च्या पोस्टरवर पहायला मिळतं. धो धो कोसळणाऱ्या पावसात नेमकं काय घडलं, शिवरायांच्या मागावर असणाऱ्या शत्रूचा कसा पराभव झाला, पोस्टरवर दिसणारे शिवराय नेमके कोणाशी दोन हात करत आहेत या आणि अशा बऱ्याच इतिहासकालीन प्रश्नांची उत्तरं 'पावनखिंड' चित्रपटात मिळणार आहेत.
एकदा नव्हे, दोनदा नव्हे तर चक्क तिसऱ्यांदा रुपेरी पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याची संधी मिळण्याबाबत चिन्मय म्हणाला की, "पूर्व संचिताशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांची व्यक्तिरेखा वाट्याला येणं शक्य नाही. लागोपाठ तीन चित्रपटांमध्ये महाराजांची भूमिका साकारायला मिळणं हे मी माझं भाग्यच मानतो. दिग्पालला माझ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची छबी दिसली आणि त्यानं ते शिवरूप यशस्वीपणे रसिकांसमोरही सादर केलं हे खूप महत्त्वाचं आहे." 'पावनखिंड'मध्ये बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेने स्वराज्य आणि महाराजांच्या रक्षणाकरीता दिलेल्या अमूल्य बलिदानाची सुवर्णगाथा पहायला मिळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.