तरुणाईच्या कंडिशन्स (नवा चित्रपट : कंडिशन्स अप्लाय...अटी लागू )

conditions apply movie review
conditions apply movie review

अलीकडे तरुण पिढीची लग्नाबद्दलची व्याख्या बदलत चाललेली आहे. लग्नाबाबत त्यांची स्वतःची अशी काही ठाम मतं आहेत. काही जण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा बेधडक निर्णयही घेत आहेत. "कंडिशन्स अप्लाय...अटी लागू' हा चित्रपट याच गोष्टींवर भाष्य करणारा आहे. आजच्या तरुणाईचा हा चित्रपट आहे. त्यांना आवडतील असे संवाद आणि गाणी या चित्रपटात आहेत. ही कथा आहे अभय केळकर (सुबोध भावे) आणि स्वरा हळदणकर (दीप्ती देवी) यांच्या प्रेमाची. स्वरा ही एका मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुणी. ती रेडिओ जॉकी असते. तिचा फॅन फॉलोअर मोठा असतो.

अभय केळकर हा एका मोठ्या कंपनीमध्ये जनरल मॅनेजर या पदावर काम करत असतो. लग्न... कुटुंब वगैरे गोष्टींवर त्याचा विश्‍वास नसतो. अगदी मुक्तपणे आणि स्वच्छंदी जीवन जगावं असं त्याला वाटत असतं. स्वराचा स्वभावही तस्साच असतो. तिलाही मुक्तपणे जीवन जगावं असं वाटत असतं. अचानक या दोघांची भेट होते आणि पहिल्या भेटीतच दोघांचे विचार चांगलेच जुळतात. त्या दोघांमध्ये चांगली मैत्री होते आणि ते दोघेही लग्न न करता लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतात. आपला हा निर्णय ते दोघेही आपापल्या घरी जेव्हा सांगतात तेव्हा काहीसा विरोध होतो; परंतु ते दोघेही आपापल्या निर्णयावर ठाम असतात. लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर त्यांच्या आयुष्यात काय काय बदल किंवा प्रसंग उद्‌भवतात ती कथा या चित्रपटात आहे. दिग्दर्शक गिरीश मोहितेने आजच्या तरुणाईला भावेल आणि आवडेल असा सिनेमा बनविला आहे. सुबोध आणि दीप्ती हे दोन कलाकार पहिल्यांदाच एकत्र काम करीत आहेत आणि त्या दोघांनीही चोख कामगिरी बजावली आहे.

एका बॅचलर तरुणाची भूमिका सुबोधने साकारली आहे. दीप्ती देवी या चित्रपटात विशेष भाव खाऊन गेली आहे. बिनधास्त-बेधडक आणि तितकीच बोलघेवड्या स्वराच्या भूमिकेत तिने चौकार आणि षटकार मारले आहेत. तिचं हसणं... वागणं... आणि बोलणं... व्वा क्‍या बात है! असंच म्हणावे लागेल. सुरुवातीला होणारी ओळख व त्यातून फुलत जाणारी मैत्री आणि त्यानंतर एकत्र राहण्याचा अगदी बिनधास्तपणे घेतलेला निर्णय... अभय आणि स्वराच्या नात्यांतील हे विविध टप्पे दिग्दर्शकाने छान टिपले आहेत. मिनारच्या भूमिकेत अतुल परचुरेने छान धमाल उडविली आहे. त्याने स्वरा आरजेचा फॅन आणि अभयचा मित्र अशी दुहेरी कसरत उत्तम अभिनीत केलीय. त्याची भूमिकाही लक्षात राहणारी आहे. अन्य कलाकारांमध्ये राजन ताम्हाणे, राधिका विद्यासागर, डॉ. उत्कर्षा नाईक, मिलिंद फाटक, अतिशा नाईक यांनी आपापल्या वाट्याला आलेल्या भूमिकेला चांगला न्याय दिला आहे.

अविनाश-विश्‍वजित यांचं संगीत या चित्रपटाला लाभलं आहे. संगीत निश्‍चितच चांगलं झालंय. तसंच कृष्णा सोरेन हे या चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर आहेत. चित्रपटाचे संकलन काही ठिकठाक झालेलं दिसत नाही. त्याबाबतीत दिग्दर्शकाचा काहीसा गोंधळ उडालेला दिसतो. थोडक्‍यात सांगायचं झालं तर तरुणाईच्या बदललेल्या लग्नाबाबतच्या व्याख्येवर आणि विचारसरणीवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. 

<

>

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com