esakal | 'कोर्ट' चित्रपटातील अभिनेते विरा साथीदार यांचे कोरोनामुळे निधन

बोलून बातमी शोधा

Vira Sathidar

आठ दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती.

'कोर्ट' चित्रपटातील अभिनेते विरा साथीदार यांचे कोरोनामुळे निधन
sakal_logo
By
स्वाती वेमूल

नागपुरातील विचारवंत, लेखक आणि अभिनेते विरा साथीदार यांचे कोरोनामुळे निधन झाले. प्रतिष्ठित ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळवलेल्या 'कोर्ट' या चित्रपटात त्यांनी मुख्य भूमिका साकारली होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. आठ दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. सोमवारी मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली. ते ६१ वर्षांचे होते. 

'कोर्ट' या चित्रपटाने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय असे तब्बल १८ पुरस्कार पटकावले होते. मात्र विरा साथीदार हे हलाखीच्या परिस्थितीतच राहात होते. नागपुरातील बाबुलखेडा इथं ते भाड्याच्या घरात राहायचे. घराचं भाडं भरण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नसायचे. "माझ्या घराचं भाडं भरण्यासाठी मी असमर्थ आहे. माझे मित्र माझी अनेकदा मदत करतात", असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. साथीदार यांच्या पत्नी नागपूरपासून ३० किलोमीटर लांब एका आंगणवाडीत काम करतात. "पत्नी काम संपल्यानंतर तिथेच कुठेतरी राहण्याचा बंदोबस्त करते. याशिवाय दुसरा कुठला पर्यायच नाही. कारण दररोज प्रवासाचा खर्च परवडेनासा आहे. ती दरमहा सात हजार रुपये कमावते आणि संपूर्ण घरखर्च तीच उचलते. तिला थोडा आराम मिळावा यासाठी मी खूप प्रयत्न करतो", असंही त्यांनी सांगितलं होतं. 

हेही वाचा : ट्रोलिंगविरोधात शशांक केतकरची पोस्ट; मराठी कलाकारांनी दिला पाठिंबा

साथीदार यांच्या आईवडिलांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसोबत काम केलं होतं. घराच्या परिस्थितीमुळे साथीदार हे त्यांचं शिक्षण पूर्ण करू शकले नव्हते. सुरुवातीला ते नागपूर फॅक्टरीत काम करायचे.