
Darling Review: 'दैवं देतं कर्म नेतं' सांगणारा 'डार्लिंग', आलियाची कमाल!
Bollywood Movie: काय होतं जेव्हा आपण आपल्याच माणसाला पुन्हा पुन्हा त्याच्या चुकांसाठी माफ करतो. तो आज ना उद्या सुधारेल या आशेवर त्यानं आपला कितीही छळ केला तरी त्याची काळजी घेत असतो. पण काही केल्या तो काही (Alia bhatt movie) सुधारत नाही. याउलट आपला विश्वासघात करुन आपलं जगणं आणखी बिकट करुन टाकतो. आलियाचा डार्लिंग पाहत असताना असं सारखं जाणवतं. बद्रुला (आलिया) तिची आई (शेफाली शहा) सारखी बेडकाची (darling movie review) आणि विंचवाची गोष्ट सांगत असते. बेडुक भलेही त्या विंचवाला आपल्या पाठीवर बसवून नदीच्या पलीकडे घेऊन जातो. मात्र विंचू त्याला चावतो कारण चावणं हे त्याच्या वृत्तीत असतं. तोच धागा आपल्या डार्लिंगमध्ये आपल्याला अनेकदा पाहायला मिळतो.
बद्रुचा पती हमजा शेख (विजय शर्मा) हा साधासा तिकिट चेकर (टीसी) पण त्याचा रुबाब असा की, मोठ्या कार्यालयात अधिकारी हुदयावर काम केल्यासारखा. साहेब त्याला आपलं बाथरुम साफ करायला सांगतो. घरात बायकोवर दारु पिऊन अन्याय अत्याचार करणाऱ्या हमजाला आपल्या पत्नीविषयी आदर नाही. वास्तविक त्या दोघांचे प्रेमप्रकरण. त्या प्रेमविवाहाला आईची पसंती नसतेच. पण मुलीच्या हट्टापोटी ती तयार होते. हमजाचा स्वभाव तिला माहिती आहे. एकाच चाळीत राहणारे ते शेजारी आहे. आईला आपल्या पोरीला नवरा करत असलेली मारहाण माहिती आहे. त्यामुळे ती पोलिसांत तक्रार करायला तिला घेऊन जाते तेव्हा मात्र पोलिसांनी तक्रार दाखल करु नये. अजुन एक चान्स त्याला मिळायला हवा असं म्हणणारी बद्रु आपल्या डोक्यात जाते.
काही झालं तरी माझा पती सुधारेल अशी आशा बद्रुला आहे. त्यामुळे ती नवी स्वप्न पाहत आहेत. अख्ख्या चाळीतली लोकं आपल्या घराची जागा रिडेव्हल्पमेंटला द्यायला तयार झाली आहेत. अपवाद एकाचा तो म्हणजे हमजा शेख. त्याला आपल्या घराची जागा द्यायची नाही. त्याच्यामुळे सगळ्यांचे घराचे स्वप्न लांबत चालले आहे. मात्र त्याला त्याची फिकीर नाही. काही चांगलं होत असल्यास त्याला विरोध करायचा असा त्याचा होरा आहे. पत्नीनं समाजात येणं, जबाबदारीनं वागणं त्याला पसंत नाही. त्याचा अहंभाव कायम दुखावला जातो. आणि हे सगळं बद्रुला माहिती आहे. तिच्यापेक्षाही तिच्या आईला सगळ्यात जास्त माहिती आहे. म्हणून तर ती सतत तिला त्याच्यापासून दूर व्हायला सांगत असते.
हमजा जेव्हा आपल्या सासूच्या नाकावर ठोसा मारतो तेव्हा मात्र बद्रुला कळते की आपली आई खोटी नव्हती. येथून पुढचा प्रवास हा मात्र आवर्जुन चित्रपटात पहावा. गौरी खान, आलिया भट्टची निर्मिती असलेला डार्लिंग हा निखळ आनंद देणारा चित्रपट आहे. वरवर नेहमीच कथा वाटणारा हा चित्रपट आपल्याला पुरुषी मानसिकता किती हिंसक आणि आक्रमक असू शकते याचा सातत्यानं प्रत्यय देत असते. खरं तर या चित्रपटात विजयनं जी हमजाची जी भूमिका साकारली आहे त्यासाठी त्याचं कौतूक करायला हवं. त्यानं प्रभावीपणे हमजाला व्यक्त होऊ दिलं आहे. त्याची देहबोली, त्याचे संवाद, त्याचा आक्रमकपणा हे सारं लक्षवेधी आहे. त्यामुळे डार्लिंग पाहताना हमजाचा आपल्याला सारखा राग येतच असतो.
हमजावर काही झालं तरी दया नको असं वाटण्या इतपत विजयनं सुरेख काम केलं आहे. त्याला आलिया आणि शेफालीची तितकीच महत्वाची साथ मिळाली आहे. दोघींनी छान भूमिका केली आहे. एरवी आलिया आपल्याला त्याच त्या लवस्टोरी बेस चित्रपटांमधून थिरकताना दिसली आहे. मात्र डार्लिंगमध्ये तिचा अभिनय अधिक परिपक्व झाल्यासारखा दिसतो. आलियाला डार्लिंगमध्ये पाहावेसे वाटते. जसं यापूर्वी तिच्या राझी या चित्रपटात वाटले होते तसे... शेफाली शहा तर अॅक्टिंगचं मोठं पॅकेज आहे. यांच्या जोडीला ज्येष्ठ अभिनेते किरण करमरकर, संतोष जुवेकर, विजय मौर्य यांच्याही भूमिका लक्षवेधी आहेत.
कॅमेरा, संगीत, संवाद हे सारं आपल्याला प्रभावित करतं. जसमीत रिन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातून आलियाचा नेहमीपेक्षा वेगळा परफॉर्मन्स चाहत्यांचे लक्ष वेधून घेईल एवढं मात्र नक्की.. छायाचित्रणाचा खास उल्लेख करावा लागेल. त्याचे कारण म्हणजे बॉलीवूडमधील ख्यातनाम छायाचित्रकार अनिल मेहता यांनी डार्लिंगची सिनेमॅटोग्राफी केली आहे. त्यातील गाणीही प्रसंगानुरुप आहे. सव्वा दोन तासांचा डार्लिंग हा दैव देतं पण कर्म नेतं....चा प्रत्यय देणारी कलाकृती आहे. हे सांगण्यासाठी पुरेशी आहे. असं वाटून जातं.
--------------------------------------------------------------
चित्रपट - डार्लिंग -
दिग्दर्शक - जसमीत रिन
कलाकार - आलिया भट्ट, विजय वर्मा, शेफाली शहा, संतोष जुवेकर, किरण करमरकर, विजय मौर्य
रेटिंग - ***