नागार्जुनच्या फार्महाऊसवर सापडला मृतदेह

वृत्तसंस्था
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

दाक्षिणात्य अभिनेता नागार्जुनच्या फार्महाऊसवर एका व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. तेलंगणातील महबूबनगर जिल्ह्यातील पापिरेड्डीगुडा गावात असलेल्या फार्महाऊसशेजारील एका खोलीत पुरुषाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला असल्याने खळबळ उडाली आहे.

हैद्राबाद : दाक्षिणात्य अभिनेता नागार्जुनच्या फार्महाऊसवर एका व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. तेलंगणातील महबूबनगर जिल्ह्यातील पापिरेड्डीगुडा गावात असलेल्या फार्महाऊसशेजारील एका खोलीत पुरुषाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला असल्याने खळबळ उडाली आहे.

मृतदेहाची ओळख पटत नसली तरी अंगावर फुल शर्ट आणि पँट आढळली आहे, तो मृतदेह एखाद्या अधिकाऱ्याचा असावा असा अंदाज पोलिसांकडून बांधण्यात येत आहे, नागार्जुनचं फार्महाऊस 40 एकर परिसरावर आहे. या ठिकाणी त्याची फारशी ये-जा नसते. मात्र सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात त्याची पत्नी अक्किनेनी अमला आली होती. जैविक शेती करण्यासाठी अमलाने काही मजुरांना बोलावून घेतलं होते.

फार्महाऊसवर बुधवारी सकाळी शेतकाम करताना काही मजुरांना दुर्गंधी जाणवली. त्यांनी दुर्गंधीचा माग काढत एक बंदिस्त खोली उघडून पाहिली असता, मजुरांना हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. ते पाहून घाबरलेल्या मजुरांनी ही माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलिस पोहोचल्यानंतर संबंधित व्यक्तीचा मृत्यू सहा महिन्यांपूर्वी झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी बांधला आहे. हा मृतदेह नेमका कोणाचा असेल, याचा पोलिसांकडून शोध घेतला जात असून पोलिसांनी नजीकच्या काळात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झालेल्या व्यक्तींची यादी मागवली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Decomposed body of a male found at Nagarjunas farmland