esakal | पाणीपुरी खूप आवडीची : धनश्री काडगावकर
sakal

बोलून बातमी शोधा

पाणीपुरी खूप आवडीची : धनश्री काडगावकर

पाणीपुरी खूप आवडीची : धनश्री काडगावकर

sakal_logo
By
शब्दांकन : अरुण सुर्वे

मला तिखट आणि गोड दोन्ही खायला आवडतं. मात्र, पावभाजी आणि पाणीपुरी प्रचंड आवडते. पुण्यात अनेक ठिकाणी मी पाणीपुरी खाल्ली आहे. कोल्हापूरमधील पाणीपुरीही मला खूप आवडली. मुंबई चाटसाठी फार प्रसिद्ध आहे; पण मी कदाचित तिकडे जास्त पाणीपुरी खाल्ली नसावी किंवा जिथली खाल्ली ती फारशी आवडली नाही. पुण्यामध्ये स. प. महाविद्यालयाच्या मागे मिळणारी पाणीपुरी, तर जयश्री आणि रिलॅक्समधील पावभाजी खूप आवडते.

पाणीपुरी हा पदार्थ मी डाएट करत असतानाही कंट्रोल करू शकले नाही. मी आणि चंदा बऱ्याचवेळा कोल्हापुरात पाणीपुरी खायला गेलो. आम्ही कोल्हापूरमध्ये कितीही स्कार्फ बांधून गेलो, तरी लोक ओळखायचे. कारण, पाणीपुरी खाताना स्कार्फ काढावा लागत असे. लोकांनी ओळखल्यामुळे आम्हाला आवरत घ्यावं लागायचं. प्रवास करताना कोल्हापूरची मिसळ नक्कीच खातो. मुंबई-पुणे प्रवासात दत्तचं थालीपीठ हमखास खाते.

स्वयंपाक करणं इतकी वर्षं मला काही आवडत नव्हतं. मात्र, पहिल्या लॉकडाउनमध्ये घरी असल्यामुळे मी बरेच नवीन प्रयोग करून पहिले. मी १२ ते १५ केक केले. त्यासाठी लागणारी बरीच उपकरणंदेखील विकत घेतली. आता मी चांगल्या प्रकारे स्वयंपाक करू शकते. मला वेगवेगळे पदार्थ करायला आवडतात. कधी चाट, कधी राजमा चावल, मोमोज, तर कधी गोड पदार्थ बनवायला आवडतात.

गेल्या वर्षी रामनवमीचा उपवास होता. तेव्हा मला भगर करायची होती. एका डब्यात खूप दिवसांपासून भगरीसारखं दिसत होतं. मला वाटलं ती खसखस आहे. नंतर मला असं वाटलं, की ती खसखस नाही भगरच आहे, म्हणून मी करायला घेतली आणि तेलात टाकल्यावर ती तडतडायला लागली आणि ते वेगळंच काही तरी झालं. ती खसखसही नव्हती अन् भगरही. ते राजगिऱ्याचे दाणे होते.

मला सुरण अजिबात आवडत नाही. माझे वडील खूप उपवास करायचे आणि ते दर उपवासाला सुरण आणायचे. त्यांच्यासोबत आम्ही सगळे सुरण खायचो आणि कदाचित त्याला कंटाळून मला आता सुरण आवडत नसावं. आईनं केलेले अनेक पदार्थ आवडतात; माझी आई गोड पदार्थ खूप स्वादिष्ट करते. ती पुरणपोळी खूप छान करते. लहानपणी आमच्याकडे सर्वच पदार्थ घरी बनत असत. श्रीखंड, बासुंदी सर्वच पदार्थ आम्ही घरीच बनवायचो. पण, तिनं बनवलेली पुरणपोळी मला खूपच आवडते.

(शब्दांकन ः अरुण सुर्वे)

loading image
go to top