Dil Bechara Review: दिल बेचारा...जीवनात आनंद पेरणारा

dil bechara movie review
dil bechara movie review

मुंबई- अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा' आता प्रदर्शित झाला आहे. सगळ्यांना या चित्रपटाबाबत कमालीची उत्सुकता लागलेली होती. आता त्यांची ती उत्सुकता पूर्ण झाली आहे. या चित्रपटाची कथा जॉन ग्रीन यांच्या बेस्ट सेलर "द फॉल्ट इन अवर स्टार्स" या कादंबरीवर आधारित आहे. दिग्दर्शक मुकेश छाबरा यांनी कादंबरीवरून चित्रपट बनविताना पटकथा उत्तम बांधलेली आहे. हसविता हसविता आपल्या डोळ्यांमध्ये पाणी आणणारा असा हा चित्रपट आहे.

खरे तर प्रत्येकाच्या आयुष्यात काही गंभीर प्रसंग किंवा निराशा वा संकटे येत असतात. परंतु त्या निराशेवर व संकटांवर हसत हसत मात कशी करावी हे या चित्रपटात सांगण्यात आले आहे. स्वतःचे दुःख लपवून दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद कसा पेरावा हे सांगणारा आहे. मॅनी (सुशांत सिंग राजपूत) आणि  किझी बसू (संजना सांघी) या दोन व्यक्तिरेखांभोवती फिरणारा हा चित्रपट आहे.

किझी तिच्या आई (स्वस्तिका मुखर्जी) आणि वडिलांसोबत (साश्वता चॅटर्जी) रहात असते. किझीला थायरॉईड कर्करोग आहे आणि ती नेहमी तिच्या ऑक्सिजन सिलेंडरसह फिरत असते. उपचारादरम्यान किझीला इमॅन्युएल राजकुमार ज्युनियर अर्थात मॅनी भेटतो, जो स्वत:  कर्करोगाच्या ऑस्ट्रियोसर्कोमाशी सामना करत असतो. किझीदेखील आपले आयुष्य निराशादायक जगत असते. अन्य मुलींप्रमाणे खेळावे आणि बागडावे असे तिला वाटत असते. परंतु ती निराशेचे जीवन जगत असते. अशातच तिची मैत्री मॅनीशी होते आणि मॅनी तिच्या आयुष्यात आनंद आणण्याचा प्रयत्न करतो.

किझीचा अभिमन्यू वीर सिंह (सैफ अली खान) नावाचा एक आवडता गायक आहे. परंतु त्यांचे शेवटचे गाणे अपूर्ण राहिलेले आहे. किझीला तिच्या आयुष्यात एकदा तरी अभिमन्यूला भेटण्याची इच्छा असते. तिची ही इच्छा कॅन्सरशी झुंज देत असलेला मॅनी पूर्ण करतो आणि तिला पॅरिसला घेऊन जाण्याचा प्लान आखतो. अशातच अर्थात  पॅरिसला जाण्यापूर्वी किझीची प्रकृती खालावते. मग मॅनी किझीला पॅरिसला घेऊन जातो का...? तिचे स्वप्न पूर्ण करतो का...? वगैरे प्रश्नांच्या उत्तरासाठी हा चित्रपट पाहावा लागेल.

कास्टिंग डिरेक्टर म्हणून इंडस्ट्रीत सुपरिचित असलेल्या मुकेश छाबरा यांचा हा पहिलाच दिग्दर्शक म्हणून चित्रपट. पण त्यांनी आपले दिग्दर्शकीय कौशल्य दाखविले आहे असेच म्हणावे लागेल. मॅनी आणि किझी यांची मैत्री खुलवता खुलवता त्यांच्यामध्ये प्रेमाचे हळूवार धागे त्यांनी पटकथेतून उत्तम दर्शविले आहेत. मैत्री, प्रेम, इच्छा व आकांक्षा..अशा सगळ्याच गोष्टी छान टिपण्यात आल्या आहेत. जमशेदपूर आणि पॅरिस येथील लोकेशन्स सुंदर आहेत. चित्रपटाला ए. आर. रेहमान यांचे संगीत लाभलेले आहे आणि ते सुमुधर झालेले आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने मस्तमौला मॅनीची भूमिका छान साकारली आहे. त्याची संवाद फेक आणि एकूणच स्टाईल झकास जमलेली आहे. सुशांतच्या चाहत्यांसाठी त्याची ही भूमिका म्हणजे पर्वणी आहे. सुशांतने ही भूमिका समरसून केली आहे. मॅनीची त्याची ही भूमिका जीवनात आनंद कसा शोधावा ही सांगणारी आहे. जन्म आणि मृत्यू आपल्या हातात नाही. पण कसं जगायचं हे आपल्या हातात आहे, असे या चित्रपटातील सुशांतचे संवाद मनाला भिडणारे आहेत.

नवोदित अभिनेत्री संजना सांघीनेही आपले अभिनय कौशल्य दाखविले आहे. तिने आपल्या भावभावना डोळ्यांतून छान व्यक्त केल्या आहेत. अन्य कलाकारांनीही आपापली काम उत्तम केली आहे. ही एक प्रेमकथा असली तरी दिग्दर्शक मुकेश छाबरा यांनी भावभावनांची उत्तम जोड त्याला दिली आहे. हसत-खेळत पुढे जाणारा आणि तितकाच मनाला आनंद देणारा हा चित्रपट आहे. जीवन खूप सुंदर आहे. या जीवनात कधी आनंद आहे तर कधी दुःख आणि निराशादेखील आहे. परंतु प्रत्येक क्षण आनंदाने जगा...जीवनात आनंदी राहा...असेच हा चित्रपट सांगतो.

खरे तर सुशांत सिंह हे खणखणीत नाणे होते. 'पवित्र रिश्ता' या मालिकेपासून त्याचा प्रवास सुरू झाला. 'काय पो छे', 'शुद्ध देसी रोमान्स', 'एम. एस. धोनी...अनटोल्ड स्टोरी', 'केदारनाथ', 'छिछोरे' आणि आताचा 'दिल बेचारा' अशा काही चित्रपटांतून त्याने आपले अभिनय कौशल्य दाखविले. त्याने घेतलेली एक्झिट सगळ्यांच्या मनाला चटका लावणारी आहे. पण तो त्याच्या कलाकृतींतून आपल्या स्मरणात कायम राहील हे नक्की.

संपादनः दिपाली राणे-म्हात्रे

dil bechara movie review sushant singh rajput one last time

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com