विद्यार्थीच राहायला आवडेल... 

चिन्मयी खरे 
शुक्रवार, 7 जुलै 2017

लोकप्रिय हिंदी, मराठी मालिकांमधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणारी आपली आवडती अभिनेत्री दीप्ती देवी "कंडिशन्स अप्लाय' या चित्रपटात पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याबद्दल तिच्याशी मारलेल्या गप्पा...

लोकप्रिय हिंदी, मराठी मालिकांमधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणारी आपली आवडती अभिनेत्री दीप्ती देवी "कंडिशन्स अप्लाय' या चित्रपटात पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याबद्दल तिच्याशी मारलेल्या गप्पा...

कंडिशन्स अप्लाय हे सिनेमाचं नाव आजच्या वातावरणाला साजेसं आहे. मला असं वाटतं, आपला समाजच कंडिशन्सवर आधारित आहे. आपण आता माणूस म्हणून जगासमोर उभे आहोत ते याच समाजातील नियम आणि अटींमुळे. समाजात वावरण्यासाठी काही नियम असतात. तसेच प्रत्येक नात्यामध्येही अटी आणि नियम असतात. जसं जग बदललं, तसं आपण आपल्यावर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नियम घालून घेतो. आपल्या कामाच्या ठिकाणी काही नियम, अटी नकळत स्वीकारत असतो. ते नियम आपल्या अंगवळणी पडत जातात आणि आपण ते काम किंवा नोकरी टिकविण्यासाठी ते पाळत जातो. नात्यांमध्येही तसंच आहे. एखादं नातं टिकवण्यासाठी आपण त्या नात्यामध्ये असलेल्या अटी पाळतो. ते नियम लिहिलेले नसतात, पण ते आपल्याला आतून कुठे तरी जाणवत असतं की आपण एखादी गोष्ट करणं आवश्‍यक आहे किंवा कोणतीही गोष्ट आपल्याला टिकवायची असते तेव्हा आपण नियमांप्रमाणे जातो. म्हणूनच लहानपण देगा देवा असं म्हणतात ते त्याचसाठी; कारण लहान असताना आपल्याला हवं ते हवं तेव्हा कुठेही काहीही करू शकतो, पण जसजसे आपण मोठे होत जातो, तेव्हा काय करावं किंवा काय करू नये हे कळत जातं आणि आपण दुसऱ्यांच्या उदाहरणावरून काय करायचे किंवा आपल्याला काय हवे आहे हे आपण ठरवू लागतो. आपल्याला आनंदाने जे करावं वाटतं, जे हवं वाटतं त्याच अटी आपण स्वत:वर लादाव्यात असं मला वाटतं आणि आपल्या प्रेमाच्या व्यक्तीलाही त्याला ज्या गोष्टीत आनंद मिळतोय त्या गोष्टी करू दिल्या पाहिजेत. त्यावर कसलंही बंधन लादणं हे चुकीचं आहे असं मला वाटतं. 

या चित्रपटात मी स्वराची भूमिका करतेय. ती रेडिओ जॉकी असते. ती सगळ्यांची खूप लाडकी आहे, खूप फेमस आहे. लोकांशी बोलायला, नवनवीन लोकांना भेटायला तिला खूप आवडतं. आरजेसाठी जी कुशलता लागते ती तिच्यात आहे. तिला वेगवेगळे प्रयोग करायला आवडतात, ती खूप मनमोकळी आहे, बडबडी, उत्साही, आव्हान स्वीकारणारी, आजच्या काळातील स्वत:ची मतं ठाम मांडणारी आहे, हुशार आहे. तिची प्रेमाच्या बाबतीतही स्वत:ची मतं आहेत. त्याप्रमाणे ती वागतेही. तिला प्रेम करायचंय, पण लग्न वगैरे करायचं नाहीय. तिला असं वाटतं, की मला असा जोडीदार हवा आहे जो माझ्यातील सगळे दुर्गुण आणि माझं स्वातंत्र्य टिकवून मला स्वीकारेल. मग तिला हळूहळू कळतं की ती प्रेमात पडलीय. मग ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायला लागतात आणि एकमेकांना समजून घेताना ते स्वत:चाही शोध घेतात. 

मालिका करताना दोन शॉटच्या मध्ये मला थोडा वेळ मिळायचा. तेव्हा माझा एकच सोबती होता तो म्हणजे रेडिओ. रेडिओ तुमचा एकटेपणा घालवतो. कोणी तरी तुमच्याशी सतत बोलतं आहे असं वाटतं. तुम्ही गाणी ऐकता. त्यामुळे तुम्हाला बरं वाटतं. मला रेडिओ ऐकायची सवय आहे. लहानपणापासून मी आकाशवाणी ऐकत आलेय. माझी आई काम करताना सतत रेडिओ ऐकायची, पण तेव्हाचं निवेदन वेगळं होतं, आताचं निवेदन वेगळं आहे. पण एफएम खूप ऐकते. त्यामुळे मला एक कल्पना होती, की मला अशा प्रकारे बोलायला लागणार आहे. पण याशिवाय मी काहीच तयारी केली नव्हती. 

मला असं वाटतं, की मुली-मुलाने एकत्रितपणे कुठला निर्णय घेतला तर त्यावर ठाम राहिलं पाहिजे. मग ते लग्न असो वा लिव्ह इन. मग त्यातील फायदे-तोटेही त्यांनी समर्थपणे पेलले पाहिजेत. कारण लग्न असो वा लिव्ह इन, जबाबदारी कुठेच संपत नाही. मला मी अभिनेत्री असल्याचा खूप अभिमान आहे. कारण मला वेगवेगळ्या छटा अनुभवायला मिळतात. मला तेच तेच करायला लागलं असतं तर मी अस्वस्थ झाले असते, पण आता मी खूप आनंदी आहे की मी एक अभिनेत्री आहे. या सिनेमात काम करताना असं जाणवलं आहे की खूप वाचन केलं पाहिजे. वेगवगळ्या ठिकाणी फिरलं पाहिजे. सुबोध भावेकडून मला खूप काही शिकायला मिळालं. ज्याप्रकारे तो बोलतो त्यातून त्याचा अनुभव कळतो. हे खूप आकर्षित करणारं आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही तरी आकर्षित करणारी गोष्ट असते आणि त्या व्यक्तीशी बोलताना ते आपल्याला जाणवतं आणि आपण खिळून राहतो. गिरीश मोहिते सरांची कलाकाराकडून काम काढून घ्यायची पद्धत खूप छान आहे. मला सिनेमाच्या टीमसोबत काम करताना खूप छान अनुभव आला. म्हणून असं वाटतं, की विद्यार्थीदशेतून कधी बाहेर पडूच नये. 
 

Web Title: dipti devi marathi actress interview