'पावनखिंड'ची टीम सरसंघचालकांच्या भेटीला!दिग्पाल म्हणाला, लहानपणापासून मी.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

director digpal lanjekar mrunal kulkarni ajay purkar meets sarsanghchalak mohan bhagawat to show him pawankhind and sher shivraj movie

'पावनखिंड'ची टीम सरसंघचालकांच्या भेटीला!दिग्पाल म्हणाला, लहानपणापासून मी..

digpal lanjekar : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या आयुष्यावर आठ चित्रपट साकारण्याचा संकल्प करणारा तरुण दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर त्यांच्या शिव अष्टकामुळे कायमच चर्चेत राहिला आहे. आतापर्यंत त्याने चार चित्रपट प्रदर्शित केले असून त्या चारही चित्रपटांना चाहत्यांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. काहीदिवसांपूर्वीच त्याचे 'पावनखिंड' आणि 'शेर शिवराज' हे चित्रपट रिलीज झाले होते. या यशानंतर तो आता पाचव्या चित्रपटाच्या तयारीत आहे. पण सध्या तो वेगळ्या गोष्टीमुळे चर्चेत आहे. त्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर संघ चालक मोहन भागवत याची नुकतीच भेट घेतली. त्यामागे एक खास निमित्त होते. यासंदर्भात त्याने एक पोस्ट शेअर केली आहे.

(director digpal lanjekar mrunal kulkarni ajay purkar meets sarsanghchalak mohan bhagawat to show him pawankhind and sher shivraj movie)

दिग्पालने या पोस्टमध्ये लिहीले आहे की, ''रेशीमबाग.. या ठिकाणी जाण्याचं ... ती वास्तू अनुभवण्याचं ... प्रत्येक स्वयंसेवकाचं स्वप्न असतं... आणि या सगळ्यात तुम्हाला संघाच्या कुटुंबप्रमुखांचा म्हणजेच सरसंघचालकांचा सहवास लाभणार असेल तर ? बालपणापासून स्वयंसेवक असलेल्या मला आणि माझा बंधू निखिल याला हीच पर्वणी मिळाली २५ आणि २६ जुलैला... या दोन दिवसातले काही क्षण नव्हे तर काही तास माझ्या आयुष्याला सुवर्ण अनुभवाचे दान देऊन गेले..''

'शिवराज अष्टकातील चौथे पुष्प शेर शिवराज रिलीझ झाला आणि मला संघाचे प्रचारक मा. यशोवर्धन वाळींबे यांचा फोन आला. “ अरे मा. मोहनजींनी (मा. मोहनजी भागवत) २५ आणि २६ जुलैला रेशीमबाग येथे “पावनखिंड” आणि “शेर शिवराज – स्वारी अफझलखान” हे दोन्ही चित्रपट पाहता येतील का?” प्रत्यक्ष सरसंघचालक ... आपली कलाकृती पाहणार ? अधीरता .. उत्सुकता... आणि काहीसा सुखद तणाव ... सगळ्या भावनांचा कल्लोळ घेऊन आम्ही नागपूर ला पोचलो ... मी , मृणालताई, अजयदादा , निखिल, राजवारसा प्रॉडक्शन्स चे निर्माते प्रद्योतजी पेंढरकर, अनिलराव वरखडे आणि क्रिएटिव्ह हेड प्रसादजी कुऱ्हे... २५ तारखेला रेशिमबागेत दाखल झालो... पू. डॉक्टरांच्या आणि श्रीगुरूजींच्या समाधीचं दर्शन घेतलं… त्यानंतर पावनखिंड चं प्रदर्शन करण्यात आलं ... ही कलाकृती पाहताना काहीजणांना भाषा कळत नव्हती ... पण भावना सगळ्यांना भिडत होती... शेवटी बाजीप्रभू आणि बांदल वीरांच्या त्यागाने बलिदानाने भावविभोर झालेल्या त्या देशभक्त कार्यकर्त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.'

'मा. मोहनजींनी दुसऱ्या दिवशी न्याहारीला भेटण्याचा निरोप दिला आणि भारावलेल्या मनानं आम्ही रेशिमबाग सोडली. २६ जुलैला संस्कारभारतीचे अध्यक्ष मा. दादा गोखले यांनी एक वेगळेच सरप्राईझ दिले ... एक सुंदरशी शाल आणि डबीभर शुद्ध केशर ! ... या नंतर शेर शिवराज या चित्रपटाचे प्रदर्शन झाले... आम्ही प्रतिक्रीयेच्या अपेक्षेनं मा. मोहनजींकडे पाहिलं... ते म्हणाले “या कलाकृतींमधून वंदनीय शिवचरीत्र साकारून तुम्ही राष्ट्रीय कार्य करत आहात... हे कार्य असंच चालू ठेवा...” सहजपणे पाठीवर एक शाबसकी देऊन मोहनजी पुढच्या बैठकीला निघून गेले... या शाबासकीचा आनंद मनात घोळवत असतानाच एक वाक्य रूंजी घालत होतं...“इदं न मम ... इदं राष्ट्राय ... इदं शिवराजाय ...” श्री छत्रपती शिवरायर्पणमस्तु ...भारत माता की जय...' असे दिग्पालने पोस्ट मध्ये म्हंटले आहे.