'देवी तिथे जागृत आहे' म्हणत केदार शिंदेंनी व्यक्त केली न्युझिलँडला जाण्याची इच्छा

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Tuesday, 11 August 2020

दिग्दर्शक केदार शिंदे सोशल मिडियावर चांगलेच ऍक्टीव्ह असतात. समाजात घडत असलेल्या घटनांवर ते त्यांचं मत सोशल मिडियाच्या माध्यमातून अनेकदा मांडताना दिसतात. आताही अगदी तसंच घडलंय.

मुंबई- भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतंच चालला आहे. मार्च पासून सुरु झालेला हा कोरोना व्हायरसचा संसर्ग ४ महिने उलटले तरी आटोक्यात येत नाहीये. राज्यात अजुनही रुग्णांची संख्या करण्यात सरकारला यश आलेलं नाही. इतकंच काय तर वाढत्या संसर्गामुळे अनेक ठिकाणी सोयी सुविधांचा देखील बोजवारा उडालेला आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. देशातील ही परिस्थिती पाहता दिग्दर्शक केदार शिंदेनी थेट न्युझिलँडला जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

हे ही वाचा: अभिनेत्री हेमांगी कवीने पुरुषांच्या अस्वच्छतेवर व्यक्त केला संताप, 'वेस्टर्न टॉयलेट कसं वापरावं हे कळत नसेल तर...'  

दिग्दर्शक केदार शिंदे सोशल मिडियावर चांगलेच ऍक्टीव्ह असतात. समाजात घडत असलेल्या घटनांवर ते त्यांचं मत सोशल मिडियाच्या माध्यमातून अनेकदा मांडताना दिसतात. आताही अगदी तसंच घडलंय. केदार शिंदे यांनी ट्विटरवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय, 'मला न्युझिलँडला जाऊन राहायचं आहे. कसं शक्य ते माहित नाही. या १०० दिवसात तिथे एकही कोरोना बाधित रुग्ण नाही. महिला पंतप्रधान आह. देवी तिथे जागृत आहे. आम्ही इथे फक्त बेटी बचाव बेटी पढावचे फतवेत काढणार.'

केदार शिंदे यांचं हे ट्विट खूप व्हायरल होत आहे. त्यांनी या ट्विटमधून महिलांना मिळणा-या वागणुकीवरंही प्रश्न उपस्थित केले आहेत. जेसिंडा अर्डर्न या न्युझिलँडच्या पंतप्रधान आहेत. त्यांनी जनतेला विश्वासात घेऊन कडक लॉकडाऊन केला होता आणि विशेष म्हणजे तो यशस्वी झाल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे न्युझिलँडमध्ये त्यांची खूप चर्चा आहे. गेल्या १०० दिवसात कडक निर्बंधांमुळे तिथे कम्युनिटी ट्रान्समिशन झालेलं नाही. या १०० दिवसात टेस्टवर भर देऊन आयसोलेशन व्यवस्थित पाळण्यात आलं.

या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्यानंतरच कदाचित केदार शिंदे यांनी तेथे जाण्याची इच्छा व्यक्त केली असेल. एका  महिला पंतप्रधानाने घेतलेला निर्णय यशस्वी करुन दाखवल्याने केदार शिंदे यांनी देवी तिथे जागृत आहे असं म्हटलं असावं.    

director kedar shinde expressed his desire to go to new zealand in corona period  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: director kedar shinde expressed his desire to go to new zealand in corona period