'बरोबर आहे, सलमानचा चित्रपट नाही तो मग कसा चालणार ?'

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 12 January 2021

या चित्रपटात नसरुद्दीन शाह यांच्यासोबत सुप्रिया पाठक, मनोज पाहवा, कोंकना सेन, विक्रांत मेस्सी यांसारख्या अनेक नामांकित कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत.

मुंबई - आपल्याकडे चित्रपट कलात्मकदृष्ट्या पाहणारा प्रेक्षक वेगळा आहे आणि केवळ मनोरंजन या मानसिकेतून पाहणा-यांची संख्या तुलनेनं मोठी आहे. त्यामुळे अनेकदा ढिसाळ कथा, भपकेबाजपणा, उदात्तीकरण अशाप्रकारचे चित्रपट कोटी रुपयांचा व्यवसाय करताना दिसतात. आशयसंपन्न चित्रपट फक्त काही चित्रपट महोत्सवांमध्ये पाहायला मिळतात. गेल्या अनेक वर्षांपासून बी ग्रेड मुव्ही विरुध्द आर्ट मुव्ही असा संघर्ष सुरु आहे. त्याविषयी अनेकांचे मतभेदही आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी  ‘राम प्रसाद की तेरहवी’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. एक आगळ्या वेगळ्या प्रकारची कथा या चित्रपटांतून मांडण्यात आली आहे. मात्र डोक्याला ताण देणारा आणि विचार करायला लावणारा हा विषय असल्यानं तो बॉक्स ऑफिसवर फारसा यशस्वी झाला नाही. त्यामुळे त्या चित्रपटाच्या दिग्दर्शिका नाराज झाल्या आहेत. त्यांनी त्याविषयी सोशल मीडियावर आपली भूमिका मांडली आहे. मुकेश अंबानी यांच्या जियो स्टुडिओज या बॅनरखाली तयार झालेला हा वर्षातील पहिलाच चित्रपट होता. त्यात प्रख्यात अभिनेते नसरुद्दीन शहा यांची भूमिका आहे. याशिवाय अनेक दिग्गज कलाकारांची फौज असतानाही तो फारसा प्रभावी ठरला नाही. त्यावरुन  दिग्दर्शिका सीमा पाहवा यांनी खंत व्यक्त केली आहे.

सीमा यांनी य़ा चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकले आहे. त्यांनी अमर उजाला वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीतून काही गोष्टीबाबत खुलासा केला आहे. त्या म्हणाल्या की, माझा चित्रपट अयशस्वी झाला याचा दोष माझ्या माथी मारण्यात आला. मात्र मला त्याविषयी एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे हा चित्रपट सलमान खानचा नव्हता. त्यामुळे तो फारसा यशस्वी झाला नाही. या शब्दांत तिनं टीका करणा-यांचे कान टोचले आहेत. राम प्रसाद की तेरहवी हा अतिशय सुंदर चित्रपट आहे. माणसं, त्यांच्या जाणीवा, संघर्ष, स्वार्थ, प्रेम यासारख्या अनेक मुद्दयांना चित्रपटाच्या माध्यमातून स्पर्श करण्यात आला आहे.आम्ही चित्रपटाची जाहिरात करण्यात कमी पडलो. मुळातच लो बजेट चित्रपट त्यात करोनाच्या संक्रमणामुळे आम्हाला अपेक्षित जाहिरातबाजी करता आली नाही. परिणामी इतर बिग बजेट चित्रपटांच्या तुलनेत हा चित्रपट काहीसा मागे राहिला.

युथ डे स्पेशल; 'गॉडफादर' शिवाय 'स्टार' झालेले अभिनेते

एक कौटुंबिक विनोदीपट या चित्रपटातून उलगडण्यात आला आहे.  या चित्रपटात नसरुद्दीन शाह यांच्यासोबत सुप्रिया पाठक, मनोज पाहवा, कोंकना सेन, विक्रांत मेस्सी यांसारख्या अनेक नामांकित कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. मात्र तरी देखील चित्रपटाला केवळ 25 लाख रुपयांची कमाई करता आली.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: director seema pahwa commented on ramprasad ki tehrvi new movie