अश्रद्ध माणसाचा सश्रद्धतेकडे चाललेला प्रवास! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jitendra Joshi
अश्रद्ध माणसाचा सश्रद्धतेकडे चाललेला प्रवास!

अश्रद्ध माणसाचा सश्रद्धतेकडे चाललेला प्रवास!

संवेदनशील आणि कविमनाचे दिलखुलास मराठी चित्रपट अभिनेते जितेंद्र जोशी यांच्या अभिनयाची अदाकारी तुम्हा-आम्हाला नवी नाही. भूमिका कोणतीही असो, आपली छाप सोडण्यात ते माहीर आहेतच. त्यांच्या प्रत्येक कामाचं कौतुक होतं. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवल्या गेलेल्या ‘गोदावरी’ चित्रपटातील निशिकांत देशमुखच्या भूमिकेसाठी ‘इफ्फी’पाठोपाठ आता त्यांची न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल २०२२ मध्ये सर्वोकृष्ट अभिनेते म्हणून नुकतीच निवड करण्यात आली आहे. त्यानिमित्त त्यांच्याशी साधलेला संवाद...

‘गोदावरी’ चित्रपट काय आहे?

‘गोदावरी’ म्हणजे नदीकिनारी राहणाऱ्या माणसाच्या आयुष्याची गोष्ट आहे. एका अश्रद्ध माणसाचा सश्रद्धतेकडे चाललेला प्रवास आहे. आयुष्यात आपण काहीच करू शकलो नाही, असं कधी कधी वाटून जातं. तेव्हा नायकाची होणारी चीड चीड आणि भवतालावर होणारी आगपाखड व नंतर त्याच्या आयुष्यात एक घटना घडल्याने त्याच्यात माणूस म्हणून होत जाणारा बदल मोकळेपणाने मांडण्याचा प्रयत्न सिनेमात केला गेला आहे.

‘गोदावरी’च्या आंतरराष्ट्रीय प्रवासाबद्दल...

‘गोदावरी’चा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर गौरव होत आहे याचं आम्हालाही अप्रूप आहे. विशेष म्हणजे, उद्या रविवारी, २२ मे रोजी ‘कान’ चित्रपट महोत्सवात तो दाखवला जाणार आहे याचाही एक वेगळाच आनंद आणि अभिमान आहे. भारताचे प्रतिनिधित्व करणारे सहा चित्रपट महोत्सवासाठी पाठवण्यात आले होते. त्यात ‘गोदावरी’चं विशेष स्क्रीनिंग होत आहे. याचं श्रेय सर्वांबरोबरच नावीन्यपूर्ण कलाकृतींवर प्रेम करणाऱ्या आणि त्यांना साथ देणाऱ्या प्रेक्षकांना जातं. त्यांच्यामुळेच, इफ्फी आणि आता न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये अभिनय अन् दिग्दर्शनाचा सर्वोत्कृष्ट पुरस्काराचा सन्मान मला आणि आमचे दिग्दर्शक निखिल महाजन यांना मिळाला, असं म्हणता येईल. दिग्दर्शक आणि अभिनेत्याला एकत्रित पुरस्कार मिळण्याचं भाग्य आम्हाला दुसऱ्यांदा लाभलं आहे.

‘गोदावरी’ची निर्मितीप्रक्रिया कशी होती?

प्रसिद्ध दिग्दर्शक आणि माझा जीवलग मित्र निशिकांत कामत यांच्या निधनानंतर मी अस्वस्थ होतो. त्यानंतर निखिल महाजन यांच्याशी बोलल्यानंतर एक उत्तम कलाकृती निशिकांत यांना समर्पित करण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि त्यातून जन्माला आला ‘गोदावरी’ चित्रपट.

कोरोनाकाळात सिनेमा करताना आलेल्या आव्हानांचा सामना कसा केला? आर्थिक गणित कसं जमवलं?

खरंच खूप कठीण होतं. तेव्हा कोरोनाचा संसर्ग फारसा नियंत्रणात आला नव्हता. साहजिकच निर्मितीसाठी पैशांचा प्रश्न होता. कोरोना काळात माणसं पै न पै जमवत होती तेव्हा निखिल महाजन, पवण मालू आणि मी असे आम्ही तिघे स्वतःकडचे पैसे घेऊन ‘गोदावरी’साठी एकत्र आलो. मग आमचे मित्र अमित डोग्रा, आकाश पेंढारकर आणि पराग मेहता यांचं पाठबळ मिळालं. पहिल्या लाॅकडाऊनंतर जेव्हा माणसं बाहेर पडू लागली तेव्हा चित्रीकरण केलं. विक्रम गोखले, नीना कुळकर्णी आणि संजय मोने यांच्यासारखे ज्येष्ठ कलाकार व त्यांच्यासोबत प्रियदर्शन जाधव अन् गौरी नलावडे आमच्याबरोबर होते. शिवाय महत्त्वाच्या; परंतु छोट्याशा भूमिकांकरिता मोहित टाकळकर, सखी गोखले, सिद्धार्थ मेनन व टेडी मौर्यासारखे कलाकार आपलेपणाने चित्रीकरणासाठी नाशिकमध्ये यायला तयार झाले; पण त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न होताच. तरीही ते आले आणि त्यांनी मनापासून काम केलं. म्हणूनच अवघ्या १७ दिवसांत चित्रीकरण पूर्ण करू शकलो. निखिल महाजन यांना सिनेमाची पूर्ण समज आणि तांत्रिक बाजू उत्तमरीत्या माहीत असल्याने आमचं काम सोपं झालं. माझी पाॅवरफूल टीम आणि आमचे मित्र प्राजक्त देशमुख यांची ‘निर्माण मोहा’ नाटकाची संस्था सगळेच मदतीला धावून आले. नाशिककरांचे विशेष आभार. नाशिक पोलिस आणि महापालिकेचं खूप मोठं सहकार्य लाभलं.

काही महिन्यांच्या अंतराने दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान होतोय... नेमक्या काय भावना आहेत?

‘गोदावरी’ला जगभरातून अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. नामांकित अशा ‘कान’ चित्रपट महोत्सवात स्क्रिनिंगसाठी निवडलेल्या चित्रपटांमध्ये ‘गोदावरी’चा समावेश आहे. ‘इफ्फी २०२१’मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून मी आणि दिग्दर्शनातील विशेष ज्युरी पुरस्कार निखिल महाजन यांनी पटकावला आहे. न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये २०२२ मध्ये ‘गोदावरी’ चित्रपटाची ओपनिंग फिल्म म्हणून निवड करण्यात आली. व्हॅन्कुव्हर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये वर्ल्ड प्रीमिअर आणि न्यूझीलंडमध्ये एशिया पॅसिफिक प्रीमिअरही दाखवण्यात आले. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निखिल महाजन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन आणि शमीन कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट छायाचित्रणाबरोबरच संगीतासाठी विशेष पुरस्कार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांना मिळाला... सारंच स्वप्नवत. एखाद्या कलाकृतीसाठी खूप माणसं प्रचंड मेहनत घेत असतात. मग तो लेखक-दिग्दर्शक असो, तंत्रज्ञ असो, बॅकस्टेज आर्टिस्ट असो की स्पॉटबॉय. अभिनेता पडद्यावर दिसतो; पण त्यामागे अनेकांची मेहनत असते. पुरस्कार एकट्याचा नसतो. तो सगळ्यांचा असतो. अशा सगळ्यांनाच मी तो समर्पित करतो.

तुमच्या अभिनय कारकीर्दीला २५ वर्षें होत आहेत... काय भावना आहेत?

मला मनोरंजन सृष्टीत येऊन २५ वर्षें होत आहेत याचं खरंच खूप समाधान आहे. माणसाने स्वप्नं बघितली आणि प्रामाणिकपणे काम करत राहिलं की ती पूर्ण होतातच. नशिबानेही मला साथ दिली. चांगली माणसं भेटत गेली. मुंबईत मला अनेकांनी वेगवेगळ्या टप्प्यावर सांभाळून घेतलं. किती नावं घेणार? मला काही ना काही मिळत गेलं. मी शिकत गेलो. मुंबईतल्या असंख्य अशा मित्रांची नावं आहेत ज्यांच्या मदतीमुळे माझं आयुष्य सार्थकी लागलं. काही भूमिका स्वीकारायच्या आधी त्या फक्त ऐकतानाच मजा आली. त्या करायच्याच, असा निर्णय मी तिथेच घेतला. ‘सेक्रेड गेम्स’मधला कॉन्स्टेबल काटेकर आणि ‘कार्टेल’मधील मधू भाऊबद्दल ऐकतानाच माझ्यासमोर त्या व्यक्तिरेखा उभ्या राहिल्या.

कविता, गाणी, सूत्रसंचालन, अभिनय आणि आता निर्माता...

‘गोदावरी’साठी निश्चितच जिओ स्टुडिओज, ब्ल्यू ड्राॅप फिल्म आणि ‘जितेंद्र जोशी पिक्चर्स’ असा योग जुळून आला. निर्माता म्हणून माझा पहिलाच प्रयत्न आहे. पुढेही जर काही चांगलं खुणावलं तर नक्कीच कृतीत उतरवू.

तुमचा स्वतःचा आवडता चित्रपट आणि आव्हानात्मक भूमिका कोणती?

‘बाजी’ चित्रपट मला खूप आवडला. खूप मेहनत करावी लागली त्या चित्रपटासाठी. निखिल महाजन यांच्यासोबतचा पहिला चित्रपट; पण त्याने मला विश्वास दिला, की मी करू शकतो... ‘व्हेंटिलेटर’ही फारच महत्त्वाचा चित्रपट. ‘तुकाराम’ जर आयुष्यात आलाच नसता तर आज मी वेगळाच असतो. पुण्यातील नाना पेठेतील माझ्या जडणघडणीचा खूप फायदा झाला. पहिली इयत्ता पास झाल्याशिवाय दहावीमध्ये जाता येत नाही ना, तसंच आहे हे. प्रत्येक चित्रपटातून शिकत गेलो. आता अजून काही वेबसीरिजही आहेत. काही हिंदी चित्रपट आहेत. आजवरची सगळ्यात आव्हानात्मक भूमिका म्हणाल, तर अर्थातच ‘गोदावरी’तील निशिकांत देशमुखची. खूप समजून-उमजून करावी लागली ती. भूमिका आधी लेखकाला दिसते, मग दिग्दर्शकाला दिसते आणि मग एक अभिनेता म्हणून ती तुमच्यापर्यंत येते. आपण बस चांगल्या कलाकृती करत राहायच्या...

मुलीसाठी खास १८ रोल करायचं स्वप्न!

प्रत्येक कलाकाराला काही तरी वेगळं काम करायचं असतं. मलाही विविध जॉनरचे रोल करायला मजा येते. माझ्या मुलीच्या जन्मानंतर मी ठरवलं होतं, की ती जेव्हा १८ वर्षांची होईल तेव्हा निदान माझ्या १८ तरी अशा भूमिका हव्यात की ज्या एकमेकांपासून पूर्ण वेगळ्या असतील. ती १८ माणसं वेगवेगळी आहेत; पण ती साकारणारा एकमेव माणूस आहे तो म्हणजे तिचा बाप... एवढंच माझं स्वप्न आहे. काम करत असताना मला स्वतःला जगता येईल का ती भूमिका, एवढाच विचार मी करतो. प्रेक्षकांना आपलं काम रुचलं पाहिजे याच्यावरच माझा भर असतो.

sushil.amberkar@esakal.com

Web Title: Discussion With Jitendra Joshi Entertainment

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top