अनिकेत विश्वासरावविरोधात गुन्हा दाखल; पत्नीकडून मारहाणीचे आरोप | Aniket Vishwasrao | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aniket Vishwasrao and Sneha Chavan

अनिकेत विश्वासरावविरोधात गुन्हा दाखल; पत्नीकडून मारहाणीचे आरोप

sakal_logo
By
सनील गाडेकर - सकाळ वृत्तसेवा

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अनिकेत विश्वासरावसह त्याच्या आईवडिलांविरोधात पत्नी स्नेहा चव्हाणने कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती अनिकेत विश्वासराव, सासरे चंद्रकांत विश्वासराव आणि सासू अदिती विश्वासराव या तिघांविरोधात स्नेहाने तक्रार दाखल केली.

पती अनिकेत विश्वासरावने १० डिसेंबर २०१८ ते २ फेब्रुवारी २०२१ या तीन वर्षांच्या कालावधीत सिनेसृष्टीत आपल्यापेक्षा पत्नीचं नाव मोठ होईल, या भीतीपोटी वेळोवेळी नातेवाईकांसमोर अपमानास्पद वागणूक दिली आणि गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न देखील केला. यामध्ये सासू-सासऱ्यांनीही त्याची साथ दिली, अशी तक्रार स्नेहाने पोलिसांकडे केली. स्नेहाच्या तक्रारीवरून अनिकेत आणि त्याच्या आईवडिलांविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: Bigg Boss Marathi 3: 'हा' लोकप्रिय स्पर्धक पुन्हा बिग बॉसच्या घरात येणार?

अनैतिक संबंध आणि सिनेक्षेत्रात त्याच्यापेक्षा माझं नाव मोठे होईल, या भितीने पतीने जीवे मारण्याची धमकी दिली. तसंच गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मला मारहाण करुन लोकांसमोर अपमानास्पद वागणूक देऊन माझा छळ केला. सासू- सासरे यांनी माझ्यावर होणार्‍या अत्याचाराला न रोखता अनिकेतला दुजोरा दिला, असं स्नेहाने तक्रारीत नमूद केलं. ही घटना मुंबईतील दहिसर इथल्या विश्वासराव रेसिडेन्सीमध्ये १० डिसेंबर २०१८ ते 2 फेब्रुवारी २०२१ दरम्यान घडल्याचं तिने म्हटलं. गेल्या काही दिवसांपासून स्नेहा आणि अनिकेत यांच्यात वाद सुरू होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

अनिकेत आणि स्नेहाने ५ ऑगस्ट २०१८ रोजी लग्नगाठ बांधली. अनिकेत हा मराठी मालिका आणि चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चेहरा आहे. तर स्नेहाने २०१६ मध्ये स्वप्निल जोशीच्या 'लाल इश्क' या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. अनिकेत आणि स्नेहाने 'हृदयात समथिंग समथिंग'मध्ये एकत्र काम केलं.

loading image
go to top