
सामाजिक, राजकीय अन् शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेली डॉ. निवेदिता एकबोटे हिने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. मनोरंजन क्षेत्राची आवड असल्याने ती आता चित्रपट निर्मितीत उतरली आहे. सा क्रिएशन्स निर्मित आणि डॉ. निवेदिता एकबोटे प्रस्तुत "दिल दिमाग और बत्ती" हा मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. सागर संत यातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. या चित्रपटाला अवधूत गुप्ते यांचे संगीत असून दिग्दर्शक हृषिकेश गुप्ते आहेत. सोनाली कुलकर्णी, दिलीप प्रभावळकर, वंदना गुप्ते, पुष्कर श्रोत्री, किशोर कदम, आनंद इंगळे, वैभव मांगले, सागर संत, मयुरेश पेम, संस्कृती बालगुडे, सखी गोखले, पुष्कराज चिरपुटकर, रेवती लिमये, मेघना एरंडे, संजय कुलकर्णी, विनीत भोंडे अशी तगडी स्टारकास्ट आहे.
याबाबत निवेदिता म्हणाली, "शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्राची सांगड मनोरंजन क्षेत्राशी घातल्यास अनेक उपक्रम आपण प्रभावीपणे करू शकतो, असं मला नेहमी वाटतं होतं. लिखित साहित्यापेक्षा व्हिडिओ आणि ऑडिओच्या माध्यमातून समाज मनावर प्रभावीपणे परिणाम होतो. म्हणून कोरोनामुळे समाजमनावर आलेली मरगळ दूर करून पूर्ण कुटुंब एकत्र बसून पाहू शकेल, अशा विनोदी चित्रपटाची निर्मिती केली आहे."