सामान्य असामान्य : लाईट्स, कॅमेरा, अ‍ॅक्शन! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

theater

पॅशन माणसाला बेभान करून सोडते. आपल्या पॅशनसाठी माणूस काय वाट्टेल ते करतो. वर्षानुवर्षे ध्येयाचा पाठपुरावा करतो, नुकसान सोसतो.

सामान्य असामान्य : लाईट्स, कॅमेरा, अ‍ॅक्शन!

- डॉ. संजय वाटवे

पॅशन माणसाला बेभान करून सोडते. आपल्या पॅशनसाठी माणूस काय वाट्टेल ते करतो. वर्षानुवर्षे ध्येयाचा पाठपुरावा करतो, नुकसान सोसतो. कोणतीही साहसे करतो, स्वतःला वाहून घेतो. लोक त्याला ‘वेडा’ म्हणतात, किमान ‘नादखुळा’ म्हणतात.

स्किझोफ्रेनिया एक असाध्य आजार आहे. तो जन्मभर साथ सोडत नाही. पण म्हणून काय स्किझोफेनिक नॉर्मल आयुष्य जगू शकत नाही? स्वप्नपूर्ती करू शकत नाही? ‘स्किसोफेनिया म्हणजे संपलं’ या समजुतीला चपराक म्हणजे अजय गायकवाड.

अजय गायकवाड... सॉरी- अजय अनिल गायकवाड! अजयला लहानपणापासून सिनेमा, अ‍ॅक्टिंगचं जबरदस्त वेड. अभ्यास सोडून सिनेमे बघत बसायचा, स्टायली मारायचा, मिमिक्री करायचा. इतर मुलांसारखं त्याला डॉक्टर, वकील, इंजिनियर व्हायचंच नव्हतं. व्हायचं होतं फक्त अ‍ॅक्टर! तो फिल्मी भाषेत बोलायचा. ताई ‘नॉर्मल बोल’ म्हणायची. आई पण खूप रागवायची. ‘नॉर्मल मुलांसारखं शिकून नोकरीला लाग, नसती थेरं नकोयत या घरात,’ म्हणायची. अनिल मात्र वेगळे होते. त्यांनी ओळखलं होतं, की ही पॅशन हाच त्याचा Driving Force आहे. त्यांनी त्याला कधीच नाउमेद केलं नाही. ते फक्त म्हणायचे, ‘जमिनीवर राहा.’

कॉलेजमध्ये त्याच्या पॅशनला धार चढली. ग्रुपमध्ये, गॅदरिंगमध्ये अजयचा परफार्मन्स असायचाच. तसाही तो चोवीस तास परफार्मन्स करतच होता. अभ्यासातला सोडून. तो म्हणायचा, ‘‘एक दिन मैं बॉलिवूडका बादशाह बनूंगा।’’ त्यामुळे त्यांचं नाव पडलं ‘बॉ. बा.’ (बॉलिवूड बादशाह.) कसंतरी ग्रॅज्युएशन पार पडलं. मग तो अ‍ॅक्टिंगची वर्कशॉप करायला लागला. ऑडिशन्स द्यायला लागला. हेलपाटे, खेटे सुरू झाले; पण अनेक वर्षं हाती काहीच लागलं नाही. फ्रस्ट्रेशन वाढत गेलं आणि व्हायचं तेच झालं. त्याचं रूपांतर स्किझोफ्रेनियामध्ये झालं. चिडचिड करायचा. तुटक राहायचा, तुसडेपणानं बोलायचा. ‘बाबा’, ‘बॉबी’, ‘बॉब्या’ असा कुठं काही शब्द कानावर पडला, की चवताळून उठायचा. डोळे लाल व्हायचे. मग मित्र ‘लाल डोळ्या’ म्हणायचे. तो मारायला धावायचा. सगळे मित्र तुटत गेले. तो हळूहळू निकामी होत गेला; पण अनिल खंबीर होते. त्याच्यावर उपचार सुरू ठेवत राहिले. काहीच उपयोग झाला नाही. शेवटी त्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केलं. अनिलभाऊ रोज रडायचे. शेवटी त्यांनी गुगलवर सिनियर सायकिअ‍ॅट्रिस्टचा शोध घेतला. त्यात माझं नाव सापडलं. मागेही त्यांनी नाव ऐकलं होतंच; पण फी फार आहे कळल्यामुळे आले नव्हते.

मी पहिल्यांदाच कल्पना दिली, की केस क्रॉनिक झालेली असल्यामुळे अवघड झालं आहे. तुम्ही धीर न सोडता प्रयत्न करत राहिलात, तर अजूनही गुण येऊ शकतो. अनिल माझ्या कल्पनेपेक्षा जास्त धीरोदात्त आणि चिवट निघाले. सुमारे दोन वर्षं उपचार केल्यावर हळूहळू आजाराची लक्षणं गायब झाली. चेहऱ्यावरचा काळवंडलेपणा गेला. वागण्याबोलण्यातला तुसडेपणा नाहीसा झाला. राग, संशय पळून गेले. तो नॉर्मल माणसासारखा हसून खेळून राहू लागला. मग, ‘बॉबा’, ‘बॉब्या’, ‘लाल डोळ्या’ या शब्दांसाठी ‘फ्लडिंग’चा विशेष उपचार दिला. हळूहळू हे शब्द बोथट होत गेले. त्यांचा परिणाम अजयवर होईनासा झाला. मी त्याला मुद्दाम ‘बॉब्या’ म्हणायला लागलो.

एक दिवस त्याच्या वाचनात एक जाहिरात आली. प्रसिद्ध दिग्दर्शक शब्बीरकुमार पुण्यात एक महिन्याचा कोर्स घेणार होते. फी फार होती; पण अनिल होते ना! अजयनं कोर्समध्ये खूप मेहनत घेतली. तंत्रं शिकून घेतली. तो शब्बीरजींच्या डोळ्यात भरला. त्यांनी त्याला घेऊन छोटी-छोटी रील्स केली. त्याला सोशल मीडियावर खूप लाईक्स मिळत गेले. एक दिवस शब्बीरकुमारांचा फोन आला, ‘‘मुंबईला ये, तुला वेब सिरीजमध्ये घेतलंय.’’ अजय- अनिल मुंबईला गेले. त्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. अजय लीड रोलमध्ये होता. त्याच्या नशिबाचे लाईट्स लागले होते. त्याच्या पॅशनवर कॅमेरा फिरू लागला आणि स्वप्नपूर्तीची ॲक्शन सुरू झाली. वेब सिरीज संपली. ही सिरीज ‘डिस्ने हॉटस्टार’वर लोकप्रिय होत आहे.

पेनड्राईव्ह हातात पडला, तसा अजय धावतच माझ्याकडे आला. खंदे अनिल होतेच. आम्ही एकत्र फिल्म पाहिली. टायटल्स सुरू झाली. शेवटचं नाव होतं, ‘स्टारिंग अजय अनिल.’ अजयनं फिल्म पॉज केली. मला म्हणाला, ‘‘तुमच्या सगळ्या सूचना पाळल्या. आडनावात लोक जात शोधतात. त्यानुसार चांगलं वाईट ठरवतात, दुसरं म्हणजे नाव, शॉर्ट, कॅची पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं ‘अनिल’शिवाय या ‘अजय’ला काही किंमत नाही.’’

अनिलभाऊंनी हळूच डोळे पुसले, कित्येक वर्षांचे कष्ट होते ते. फिल्म संपली. मी अजयच्या अभिनयाची प्रशंसा केली. आशीर्वाद दिला. अजय म्हणाला, ‘सर, तुमचा बॉब्या आता तर बॉम्बेला चाललाय. मोठी भरारी घ्यायला.’ मी दोघांना माझं शास्त्रीय प्रवचन दिलं. अजय म्हणाला, ‘काही झालंच तर तुम्ही आहात, बाबा आहेत. ट्रीटमेंट्स आहेत, त्यामुळे फिकर नॉट.’ मी पुन्हा त्यांच्या आनंदावर विरजण घातलं, ‘हो, पण हा रोग सहजासहजी साथ सोडत नाही.’

अजयनं एक फिल्मी पोज घेतली. विशिष्ट लकबीची भावमुद्रा धारण केली. मान तिरकी करत झुल्फे उडवली आणि डोळे मिचकावत तो म्हणाला.

‘मैंनु अ‍ॅक्टिंग दा लगिया रोग, मैंनु बचनेदी नय्यो उम्मीद!’