स्वप्नाची परिपूर्ती... 

चिन्मयी खरे  
Saturday, 20 May 2017

"मेरे डॅड की मारुती' या चित्रपटातून घराघरात पोहोचलेला चेहरा म्हणजे साकीब सलीम. "दोबारा- सी युअर एव्हिल' या चित्रपटातून तो पहिल्यांदाच आपली बहीण हुमा कुरेशी हिच्याबरोबर काम करतोय. त्यानिमित्ताने त्याच्याशी मारलेल्या गप्पा- 

"मेरे डॅड की मारुती' या चित्रपटातून घराघरात पोहोचलेला चेहरा म्हणजे साकीब सलीम. "दोबारा- सी युअर एव्हिल' या चित्रपटातून तो पहिल्यांदाच आपली बहीण हुमा कुरेशी हिच्याबरोबर काम करतोय. त्यानिमित्ताने त्याच्याशी मारलेल्या गप्पा- 

तुझा हा पहिला वेगळा अनुभव कसा होता? 
- माझ्यासाठी भयपटात काम करणं हा एक खूपच वेगळा अनुभव होता. मी ठरवलं नव्हतं की मी असा काही चित्रपट करेन. पण मला या चित्रपटाची पटकथा खूपच आवडली. हा चित्रपट "ऑक्‍युलस' या हॉलीवूडपटावर आधारित आहे. तो चित्रपट बघितल्यावर मला खूप छान वाटला. काहीतरी वेगळं करण्याचं ठरवलं होतंच. तसंच मला आणि हुमाला कधीपासून एकत्र काम करायचं होतं, ती संधी मिळणार होती. त्यामुळे मी हा चित्रपट करायचं ठरवलं. 

या चित्रपटात तुझी भूमिका काय आहे? 
- मी कबीर मर्चंट या मुलाची भूमिका करतोय. त्याच्या कुटुंबात एक विचित्र घटना घडते. कबीरच्या वडिलांची 10-12 वर्षांपूर्वी हत्या होते. लोकांचं म्हणणं असतं, की कबीरनं लहानपणी त्याच्या वडिलांना गोळी घालून मारलं. पण त्याच्या बहिणीचं म्हणणं होतं, की काहीतरी अदृश्‍य शक्ती आहे, ज्यामुळे त्याच्या वडिलांची हत्या झालीय. कबीर 10-12 वर्षांनंतर सुधारगृहातून बाहेर येतो. त्याचं सगळं लहानपण वाया गेलंय. त्याला ते जगताच आलेलं नाही. त्याला आता पुन्हा ते सगळं जगायचंय. त्याला त्याच्या आयुष्यात काहीतरी करायचंय. त्याने खूप वेळ आयुष्यातला वाया घालवलाय, असं त्याला वाटतंय. पण त्याच्या बहिणीला अजूनही असंच वाटतं, की त्यांच्या वडिलांच्या हत्येमागे काहीतरी अदृश्‍य शक्तीच होती. तर या दोघांमधील संघर्ष म्हणजेच "दोबारा' हा चित्रपट आहे. 

बहिणीबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता? 
- माझं आणि हुमाचं स्वप्न होतं एकमेकांबरोबर काम करण्याचं, ते पूर्ण झालं. मोठ्या पडद्यावर बहीण भावाच्या भूमिकेत वावरणं पहिल्यांदा थोडं कठीण गेलं. कारण आम्ही एकमेकांना गेली 27-28 वर्षं ओळखतो. एकमेकांच्या सवयी, प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टी एकमेकांबद्दल माहीत आहेत. त्यामुळे त्या सगळ्या विसरून एका खट्याळ भावाच्या भूमिकेतून बाहेर येऊन मला माझ्या भूमिकेत शिरण्यासाठी खूप प्रयत्न करावा लागला. तसाच प्रयत्न तिलाही करावा लागला. कधी कधी आम्ही विसरून जायचो, की आम्ही पडद्यावर भावंडं आहोत आणि आमचं खरं नातं बाहेर यायचं. त्यामुळे काम करताना मजाही तितकीच आली आणि प्रयत्नही तेवढाच करावा लागला. पण एक छान अनुभव मिळाला. 

मूळ हॉलीवूडपटाचा यावर कितपत प्रभाव आहे? 
- "ऑक्‍युलस' हा हॉलीवूडपट असल्यामुळे त्याचे संदर्भ, तसेच कायदे, न्यायालयीन काही गोष्टी या नक्कीच वेगळ्या झाल्या आहेत. "ऑक्‍युलस' या चित्रपटाचे निर्माते "दोबारा' या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. त्यामुळे या चित्रपटाचा गाभा हा तसाच ठेवून हा चित्रपट जास्तीत जास्त भारतीय बाजाचा बनवण्याचा प्रयत्न झालाय. आपल्या देशात नात्यांना खूप महत्त्व दिलं जातं. आपल्याकडे आपल्या नातेवाईकांविषयीचा जिव्हाळा हा परदेशातील नात्यांपेक्षा खूपच वेगळा असतो. भावा- बहिणीच्या नात्यामध्ये असलेलं ते प्रेम 10-12 वर्षांनंतर भेटल्यानंतरही तसंच आहे. अशा प्रकारचे अनेक बदल या चित्रपटात मांडणीनुसार केलेत. 

चित्रपटाचं नाव "दोबारा' का ठेवलंय? 
- कबीर 10-12 वर्षांनंतर परत घरी येतो. तेव्हा त्याचं त्याच्या बहिणीशी असलेलं नातं आणि त्याच्या सगळ्या आठवणी परत त्याच्या मनात घर करू लागतात. त्यांच्या आयुष्यात घडलेले वाईट प्रसंग, त्यांच्या वडिलांचा मृत्यू आणि ज्यामुळे तो सुधार गृहात गेलेला असतो आणि का गेला... या सगळ्यावर ते दोघे चर्चा करतात. त्यांच्यात एक प्रकारचा संघर्ष होतो. तोच या चित्रपटातून दाखवला आहे. म्हणून या चित्रपटाचं नाव "दोबारा' असं ठेवलं असावं. 

या चित्रपटानंतर पुढे काय? 
- या चित्रपटानंतर मी वासू भगनानी यांच्याबरोबर माझा पुढचा चित्रपट करतोय. माझ्यासोबत तापसी पन्नू काम करणारेय. 

शब्दांकन :चिन्मयी खरे  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dream fulfillment says sakib salim