भारतात होणार नाट्य ऑलिम्पिक

टीम ई सकाळ
गुरुवार, 13 जुलै 2017

 १७ फेब्रुवारीला दिल्लीमध्ये या नाटय़ ऑलिम्पिकवरील पडदा उठेल तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, तर ८ एप्रिलच्या मुंबईतील समारोपाला देशाचे नवे राष्ट्रपती उपस्थित असतील. मिळालेल्या माहितीनुसार, या महाकाय रंगमंचासाठी केंद्राने सुमारे अडीचशे कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

पुणे : ऑलिम्पिक भरविण्याचा मान मात्र भारताने पटकाविला आहे. आठव्या नाटय़ ऑलिम्पिकचे यजमानपद भारताला मिळाले असून १७ फेब्रुवारी ते ८ एप्रिल २०१८ दरम्यान देशातील पंधरा शहरांमध्ये जगातील पाचशे नाटय़ कलाकृतींचा आस्वाद रसिकांना घेता येईल.

केंद्रीय सांस्कृतिक मंत्री डॉ. महेश शर्मा, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (एनएसडी) सोसायटीचे अध्यक्ष व ख्यातनाम रंगकर्मी रतन थिय्यम आणि एनएसडीचे संचालक व प्रख्यात दिग्दर्शक डॉ. वामन केंद्रे यांनी ही घोषणा केली.

पाचशे गाजलेल्या कलाकृतींच्या निमित्ताने अवघा जागतिक रंगमंच भारतामध्ये अवतरण्याची ही पहिलीच वेळ आहे. या दोन महिन्यांच्या नाटय़महोत्सवामध्ये पाचशे नाटकांबरोबर सुमारे सातशे कलाकृतींचे प्रयोग केले जातील. देशातील दीडशे, तर जगातील पन्नास नाटय़समूहांचा सहभाग असेल.हा भारतीय कलेसाठी सर्वोच्च आनंदाचा, समाधानाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. तिच्या यशस्वितेमध्ये कोणतीही कसर सोडणार नाही अशी ग्वाही यावेळी वामन केंद्रे यांनी दिली.

क्रीडा क्षेत्रातील ऑलिम्पिकच्या धर्तीवर नाटय़ ऑलिम्पिकची संकल्पना १९९३मध्ये ग्रीसमध्ये मांडण्यात आली आणि पहिले नाटय़ ऑलिम्पिक १९९५ मध्ये ग्रीसमध्येच पार पडले. त्यानंतर १९९९ मध्ये दुसरे जपानमध्ये, २००१मध्ये तिसरे रशियात, २००६मध्ये इस्तंबूलमध्ये, २०१०मध्ये दक्षिण कोरियातील सोलमध्ये, २०१४ मध्ये सहावे बीजिंगमध्ये आणि २०१६मध्ये सातवे वॉर्सा (पोलंड) पार पडले. आणि आठव्या यजमानपदाचा मान भारताला मिळाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: entertainment news india hosts drama olympic first time