‘काय रे रास्कला’च्या प्रमोशनसाठी प्रियांकाकडून आज गाणे लाँच

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

नाशिक - अभिनेत्री प्रियांका चोप्राने सुरू केलेल्या ‘पर्पल पेबल पिक्‍चर्स’ या चित्रपटनिर्मिती संस्थेतर्फे ‘काय रे रास्कला’ हा मराठी चित्रपट १४ जुलैला राज्यभर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी उद्या (ता. २९) ती गाणे ‘लाँच’ करणार आहे.

डॉ. मधू चोप्रा - ‘सेल्फी’ स्पर्धा होणार सोशल मीडियामधून जाहीर, विनोदी कथानकामुळे प्रेक्षकांना आवडेल

नाशिक - अभिनेत्री प्रियांका चोप्राने सुरू केलेल्या ‘पर्पल पेबल पिक्‍चर्स’ या चित्रपटनिर्मिती संस्थेतर्फे ‘काय रे रास्कला’ हा मराठी चित्रपट १४ जुलैला राज्यभर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी उद्या (ता. २९) ती गाणे ‘लाँच’ करणार आहे. तसेच, चित्रपटातील गाण्याच्या आधारे ‘सेल्फी’ स्पर्धा सोशल मीडियातून जाहीर होईल, अशी माहिती संस्थेची धुरा सांभाळणाऱ्या प्रियांकाच्या आई डॉ. मधू चोप्रा यांनी आज ‘सकाळ’ला दिली.

डॉ. चोप्रा म्हणाल्या, की ६४ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात तीन पुरस्कारांनी गौरविण्यात आलेला ‘व्हेंटिलेटर’ चित्रपट गंभीर आशयाचा होता. नेमक्‍या त्याच्या उलट ‘काय रे रास्कला’ हा विनोदी चित्रपट आहे. गौरव हा छोट्या मुलाच्या माध्यमातून खोड्या करतो. खोड्यांमधून मोठ्यांची सुटका होत नाही. अखेर तोच छोटा पोलखोल करतो. चित्रपटाचा शेवट चकित करणारा आहे. तो प्रेक्षकांना नक्की आवडेल. गिरिधन स्वामी यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. गौरव घाटणेकर आणि भाग्यश्री मटे ही जोडी पहिल्यांदा चित्रपटामधून प्रेक्षकांपुढे येईल. निहार गिते हा बालकलाकार चित्रपटात दिसणार आहे.

याशिवाय निखिल रत्नपारखी, सुप्रिया पाठारे, नागेश भोसले, श्रीकांत मस्की, अक्षय कोठारे, ऐश्‍वर्या सोनार यांच्या भूमिका आहेत. प्रियांका जाहीर करणाऱ्या सेल्फी स्पर्धेत राज्यभरातील शहरांमधून दहा विजेत्यांची निवड केली जाईल. विजेत्यांना भेटवस्तू देण्याबरोबरच ‘प्रीमिअर शो’साठी काही जणांना मान्यवरांबरोबर आमंत्रित केले जाणार आहे.

नव्या चेहऱ्यांना संधी
देशाच्या विविध भागांतील भाषांमध्ये चित्रपटांची निर्मिती केली जात आहे. पंजाबी, बंगाली, मल्याळममधील चित्रपट सप्टेंबरमध्ये ‘फ्लोवर’वर येईल, असे सांगून त्या म्हणाल्या, की कथानक चांगले असावे एवढी अट निर्मितीमागे असते. त्याचबरोबर नव्या चेहऱ्यांना चित्रपटामधून संधी देण्याचे धोरण स्वीकारण्यात आले आहे. गेल्या वर्षी भोजपुरीमधून ‘काशी अमरनाथ’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. सामाजिक आशयावर आधारित या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. ‘सरवन’ या पंजाबी चित्रपटाची निर्मिती केली आहे. आता मराठीमधून प्रदर्शित होणाऱ्या ‘काय रे रास्कला’ या चित्रपटात चार गाणी आहेत.

मराठी कलावंतांचा अभिमान
महाराष्ट्रात चित्रपटाची निर्मिती करण्याचा अनुभव खूपच चांगला आहे. मराठी कलावंत व्यावसायिक पद्धतीने काम करतात. वेळेचा अपव्यय होऊ देत नाहीत. त्यामुळे मराठी कलावंतांबद्दल अभिमान वाटतो, असे गौरवोद्‌गार डॉ. चोप्रा यांनी काढले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: entertainment news kay re rascala