Exclusive Interview: व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये दोन पुरस्कार पटकावणाऱ्या चैतन्य ताम्हाणेशी केलेली विशेष बातचीत

संतोष भिंगार्डे
Saturday, 19 September 2020

व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये दोन पुरस्कार पटकावून मराठीचा झेंडा अभिमानाने फडकाविला आहे. एकूणच या चित्रपटाबद्दल चैतन्यशी केलेली बातचीत...

दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणेच्या कोर्ट या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले आणि चित्रपट महोत्सवांमध्येही तो चित्रपट गौरविला गेला. भारतातर्फे आॅस्करसाठी हा चित्रपट पाठविण्यात आला आणि आता चैतन्यने द डिसायपल हा मराठी चित्रपट बनविला आहे. या चित्रपटाने व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये दोन पुरस्कार पटकावून मराठीचा झेंडा अभिमानाने फडकाविला आहे. एकूणच या चित्रपटाबद्दल चैतन्यशी केलेली बातचीत...

 

कोर्ट हा चित्रपट प्रदर्शित झाला त्याला आता पाचेक वर्षे झाली आहेत. त्यानंतर आता तुझा द डिसायपल हा चित्रपट येत आहे. एवढा मोठा कालावधी दुसऱ्या चित्रपटासाठी का लागला...
  कोर्ट हा चित्रपट अनेक मोठमोठ्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये गेला होता. सन 2014 मध्ये व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये हा चित्रपट गेला होता. एका वेगळ्या सेक्शनमध्ये तो होता. तेव्हा  या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा (ओरिझोन्टी) पुरस्कार जिंकला होता आणि मला लायन ऑफ द फ्यूचर या पुरस्काराने सन्मानित केलं गेलं होतं. आता द डिसायपल मुख्य स्पर्धेत होता. असो. कोर्टसाठी या सगळ्या फिल्म फेस्टिव्हलची तयारी वगैरे करण्यात आमचा बराच वेळ गेला. त्यानंतर आॅस्करसाठी भारतातर्फे या चित्रपटाची निवड झाली. त्याच्यासाठी पुन्हा आम्हाला खूप वेळ द्यावा लागला. त्यानंतर मी रोलेक्स प्रोजेक्टमध्ये अल्फान्सो यांच्याबरोबर काम करीत होतो. त्याकरिता मेक्सिको, लंडन वगैरे ठिकाणी मी फिरत होतो आणि त्यांचे काम पाहात होतो व शिकतही होतो. त्यानंतर द डिसायपल या चित्रपटावर काम सुरू झाले. शास्त्रीय संगीतावर आधारित हा चित्रपट असल्यामुळे ते समजून घेण्यात वगैरे खूप वेळ गेला. तब्बल चार वर्षे मी या चित्रपटावर काम केले आणि मला एका महान व्यक्तीने सांगितले की तू चित्रपट किती वर्षांनी करतो आहेस याकडे लोक लक्ष देणार नाहीत तर चित्रपट चांगला आहे की वाईट याकडे अधिक लक्ष देतात. त्यामुळे मी विचार केला की वेळ कितीही गेला तरी चालेल, पण कलाकृती उत्तमच बनली पाहिजे.

- द डिसायपल या चित्रपटाची कथा-कल्पना तुला कशी काय सुचली...
- भारतीय शास्त्रीय संगीताला खूप मोठा इतिहास आहे. या संगीताबद्दलचे अनेक किस्से तसेच बाबी माझ्या वाचनात आल्या आणि त्या वाचल्यानंतर मी खूप प्रभावित झालो. त्यानंतर मी हळूहळू तयारी सुरू केली. शास्त्रीय गायकांचे सोशल मीडियावरील प्रोफाईल वाचले. काही म्युझिकच्या कार्यक्रमांना जाण्यास सुरुवात केली. दिल्ली, बनारस, कोलकात्ता, अहमदाबाद आणि मुंबईत आदी ठिकाणी जाऊन म्युझिशियन्सच्या मुलाखती पाहिल्या. खूप  पुस्तके वाचली. एकूणच सांगायचे तर स्वतःला त्या विश्वात झोकून दिले. त्यानंतर मी लिहायला सुरुवात केली.

- त्यानंतर तुला काय तयारी करावी लागली...कलाकारांची निवड कशी काय केली..
-माझी स्क्रीप्ट लिहून पूर्ण झाल्यानंतर कास्टिंगमध्ये अधिक वेळ जाणार आहे याची कल्पना मला आली. कारण मला संगीताची जाण असणारा, मराठी उत्तम बोलणारा, स्क्रीन प्रेझेन्स छान असणारा आणि त्या वयाचा असणारा मुख्य कलाकार हवा होता. त्या दृष्टीने आमचा शोध सुरू झाला. मुळात स्क्रीप्ट लिहीत असताना आदित्य मोडक यांचे काही व्हिडीओ मी पाहिले होते. त्यामुळे त्याची आम्ही आॅडिशन्स घेतली. त्या आॅडिशन्समध्ये आम्हाला त्याचे वजन खूप आहे असे वाटले. त्यामुळे आम्ही त्याला सांगितले की या भूमिकेकरिता सुरुवातीला पाच ते सात किलो वजन कमी करावे लागेल आणि नंतर वाढवावे लागेल. खूप कमी वेळेत हे सगळे करावे लागेल. त्याने होकार दिला. मग आम्ही त्याला एक ट्रेनर उपलब्ध करून दिला डाॅ. अरुण द्रविड हे अमेरिकेत राहतात. तेदेखील म्युझिशियन्स आहेत. त्यांना आम्ही घरी जाऊन भेटलो आणि खूप विनंती त्यांना केली. त्यानंतर ते तयार झाले. त्यांनी गुरुजींची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात बहुतेक सगळे कलाकार हे संगीताशी निगडित आहेत. या सगळ्या कलाकारांच्या निवडीला एक वर्ष लागले.

ः असा विषय हाताळणे एक प्रकारचे आव्हान असते. तुला हा चित्रपट कितपत आव्हानात्मक वाटला..
- खूपच...मला या विषयावरील संशोधनासाठीच दोन ते अडीच वर्षे लागली. त्यानंतर कास्टिंग, लोकेशन्स आणि अन्य बाबी याकरिता खूप वेळ गेला. भारतीय शास्त्रीय संगीताला खूप मोठा इतिहास असल्यामुळे जबाबदारी मोठी होती. हा विषय पडद्यावर मांडताना काही चुकीचे दाखवू नये किंवा प्रेक्षकांना काही चुकीचे वाटू नये याची खूप काळजी घ्यावी लागली.  चित्रपटाची कथा शास्त्रीय संगीतातून पुढे जाणारी आहे. या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण मुंबईतच झाले आहे.
 याकरिता निर्माता विवेक गोम्बर माझ्या मागे ठामपणे उभा राहिला आहे.

ः  व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाला दोन पुरस्कार मिळाले त्याबद्दल....
-परीक्षकांचा बेस्ट फिल्म पुरस्कार-फीप्रसी आणि पटकथेचा पुरस्कार असे दोन मानाचे पुरस्कार या चित्रपटाला लाभले याचा आनंद नक्कीच आहे. हे पुरस्कार माझ्यासाठी खूप स्पेशल आहेत कारण आम्ही केवळ चित्रपट बनविला आणि आम्हाला आवडेल असा बनविला. हा चित्रपट व्हेनिसमध्ये जाईल आणि त्याला पुरस्कार मिळेल असे आम्हाला वाटलेही नव्हते. खरे तर हे वर्ष खूप वाईट आहे सगळीकडे निराशादायक वातावरण आहे आणि अशा वातावरणात आम्हाला पुरस्कार मिळाला ही खूप मोठी बाब आहे. आमच्यासाठी ही भाग्याची गोष्ट आहे.

ः व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमधील अनुभव कसा होता.
-खूप छान. काहीच प्राॅब्लेम आला नाही. चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांनी आमचे कौतुक केले. चित्रपट खूप खूप आवडल्याचे सांगितले. आता आमची जबाबदारी वाढलेली आहे. आता यानंतर अन्य काही चित्रपट महोत्सवात हा चित्रपट जाणार आहे आणि पुढील वर्षी आम्ही तो येथे प्रदर्शित करणार आहोत.

ः तुझ्या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते अल्फान्सो कुआरोन आहेत. त्यांची व तुझी औळख कुठे झाली.
- 2016-2017 साली मी रोलेक्स प्रोजेक्ट करीत होतो जिथे आपल्याला एका तज्ज्ञ व्यक्तीकडून व्यक्तिशः मार्गदर्शन मिळतं. तेव्हा अल्फान्सो कुआरोन व माझी ओळख झाली. तेव्हा रोलेक्स प्रोग्राममध्ये ते माझे मार्गदर्शक होते. आता आम्ही चांगले मित्र झालो आहोत. त्यांना या चित्रपटाची प्रोसेस माहिती होती. त्यांनी हा चित्रपट पाहिला. त्यांना तो खूप आवडला आणि त्यानंतर त्यांनीच कार्यकारी निर्माता होण्याचा निर्णय घेतला.

------------------------------------------------------

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Exclusive Interview Chaitanya Tamhane Two Award Winners at Venice Film Festival