
मनोज वाजपेयी यांचा 'द फॅमिली मॅन 2'या वेब सीरिजचा ट्रेलर मंगळवारी प्रदर्शित होणार होता. मात्र आता तो प्रसिध्द होण्याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मुंबई - तांडव या नव्या वेबसीरिजवरुन चाललेल्या वादाचा परिणाम आता इतरही काही मालिकांवर झाला आहे. त्यापैकी एक मालिका म्हणजे 'द फॅमिली मॅन 2'. या मालिकेच्या निर्मात्यांनी थोडी सावध भूमिका घेतली आहे. फेब्रुवारीमध्ये ही मालिका प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून तांडव मालिकेवरुन मनोरंजनाच्या क्षेत्रात वादळाला सुरुवात झाली आहे. याप्रकरणी संबंधितांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहे.
मनोज वाजपेयी यांचा 'द फॅमिली मॅन 2'या वेब सीरिजचा ट्रेलर मंगळवारी प्रदर्शित होणार होता. मात्र आता तो प्रसिध्द होण्याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मेकर्स आणि स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राइम व्हिडिओने तो ट्रेलर लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या कार्यक्रमासंदर्भात पत्रकारांसोबत एक व्हर्च्युअल पत्रकार परिषद होणार होती. तांडवचे निर्माते अली अब्बास जाफर आणि अॅमेझॉन प्राइम ओरिजिनल कंटेंट प्रमुख अपर्णा पुरोहित यांच्यात चर्चा झाली होती. मात्र त्यातून कुठलाही ठोस निर्णय समोर आलेला नाही.
गेल्या वर्षी मिर्झापूर 2 वरही अशाच प्रकारचा आरोप केला गेला. मात्र तो वाद फार काळ काही चालला नाही. तांडवचा वाद भलताच पेटला आहे. त्याचा परिणाम इतरही काही मालिकांवर झालेला आहे. याशिवाय 'पाताल लोक' या वेब सीरिजवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप होता. 15 जानेवारीला सैफ अली खान, डिंपल कपाडिया, मोहम्मद झिशान अयूब स्टारर 'तांडव' ही वेब सीरिज प्रदर्शित झाली आणि त्यातील एक सीन सोशल मीडियावर व्हायरल झाला.
मालिका निर्माते अली अब्बास जफर आणि हिमांशु कृष्णा मिश्रा आणि लेखक गौरव सोलंकी यांच्याविरोधात लखनौच्या हजरतगंज कोतवाली येथे एफआयआर दाखल करण्यात आला. हजरतगंज पोलिस ठाण्यातील चार सदस्यांची टीम चौकशीसाठी मुंबईकडे रवाना झाली. 18 जानेवारी रोजी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री विश्वास सारंग यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहून ओटीटी प्लॅटफॉर्मवरून 'तांडव' हटवण्याची मागणी केली.