बॉलिवूड स्टार प्राण आणि दिलीपकुमार यांच्या आत्मकथनात नेमकं काय आहे

महेश बर्दापूरकर 
Friday, 17 April 2020

हिंदी चित्रपटसृष्टीचा इतिहास बदललेल्या दिलीपकुमार आणि प्राण या दोन कलाकारांच्या चरित्रांची माहिती घेऊयात. कलाकारांचं आयुष्य तुफान ग्लॅमरबरोबरच अनेक धमाल घटनांनी,संघर्षानी,चढ-उतारांनी भरलेलं असतं

चित्रपट कलाकारांचं आयुष्य तुफान ग्लॅमरबरोबरच अनेक धमाल घटनांनी, संघर्षानी, चढ-उतारांनी भरलेलं असतं. हे चरित्र प्रेक्षकांच्या मनात त्या कलाकाराबद्दल असलेल्या अनेक प्रश्‍नांची उत्तरं देणारं असतंच, त्याचबरोबर ते चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील एक विशिष्ट काळ, त्यातील इतर कलाकराचं आयुष्य आणि घटनांचा मागोवाही घेतं. मराठी, हिंदी व इंग्रजी चित्रपटांतील अनेक कलाकारांनी आत्मचरित्रे लिहिली आहेत किंवा त्यांची चरित्रे लिहिली गेली आहेत. अशा शेकडो चरित्रांचे वाचन केल्यास चित्रपटसृष्टीचा एक मोठा काळ आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. या लेखात हिंदी चित्रपटसृष्टीचा इतिहास बदललेल्या दिलीपकुमार आणि प्राण या दोन कलाकारांच्या चरित्रांची माहिती घेऊयात... 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिलीपसाहब! 
चित्रपटसृष्टीमध्ये अनेक दशकं गाजविलेल्या दिलीपकुमारसारख्या अभिनेत्याच्या जीवनप्रवासाबद्दल मोठी उत्सुकता असणं साहजिकच.‘दिलीपकुमार - द सबस्टन्स ऍण्ड द शॅडो’ हे त्यांचं इंग्रजीतील आत्मचरित्र याच पठडीतील असून, ते वाचकांच्या मनातील अनेक प्रश्‍नांची उत्तरं देतं. दिलीपकुमार पाकिस्तानातील पेशावर येथील आठवणींद्वारा आपलं कथन सुरू करतात. एका फकिरानं हा मुलगा मोठेपणी खूप नाव कमावणार असं सांगितल्यानं आजी छोट्या युसूफला नजर लागू नये म्हणून कायम त्याचं टक्कल करून कपाळावर काळा पट्टा ओढत असे. या विचित्र दिसण्यामुळं त्याला शाळेत अवमान सहन करावा लागे व पुढं अभिनय करताना हेच दुःख आपल्याला ‘ट्रॅजेडी किंग’ बनवून गेलं, असं ते सुरुवातीचाच स्पष्ट करतात. पुढं भारतात आल्यावर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील देवळाली येथील व नंतर मुंबईतील दिवस, आई-वडील व भावा-बहिणींबरोबरचे संबंध यांवर त्यांनी विस्तृतपणानं लिहिलं आहे. वडिलांशी भांडणानंतर पुण्यात येऊन एका कॅन्टिनमध्ये केलेल्या कामाचे अनुभव रोमांचित करणारे आहेत. मुंबईत वडिलांच्या फळांच्या दुकानातील काम व नोकरी शोधत असताना अभिनेत्री देविकाराणी यांच्याशी झालेली ओळख, बॉम्बे टॉकीजमध्ये मिळालेली बड्या पगाराची नोकरी, देविकाराणी यांनी ठेवलेलं ‘दिलीपकुमार’ हे नाव, वडिलांना न सांगता चित्रपटात केलेलं काम व चित्रपटाचं पोस्टर पाहिल्यानं फुटलेलं गुपित, हा प्रवास वाचनीय आहे. 

दिलीपकुमार ‘देवदास’, ‘मुघले आझम’, ‘नया दौर’, ‘गंगा जमुना’,‘मधुमती’ या चित्रपटांबद्दलचे अनुभव विस्तारानं कथन करतात. त्यांची प्रेमप्रकरणं कायमच चर्चेत राहिली. कामिनी कौशल यांच्याबरोबरच्या प्रेमाचा उल्लेख त्यांनी टाळला आहे. मधुबालाबरोबरच्या प्रेमप्रकरणाचं वर्णन थोडक्‍यात; पण रंजक आहे. कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यांत त्यांनी स्वीकारलेले चित्रपट, मनोजकुमार, राजकुमार, अमिताभ बच्चन आदी कलाकारांबरोबरच्या कामाचे अनुभव, मुंबईचे शेरीफ म्हणून गाजलेली कारकीर्द, अस्मा या महिलेशी केलेला निकाह व त्यामुळे संसारात उठलेलं वादळ यांचे संदर्भ येतात. 

...आणि प्राण! 
चित्रपटसृष्टीचा लाडका खलनायक प्राण यांच बनी रुबेन यांनी लिहिलेलं व अशोक जैन यांनी अनुवादित केलेलं ‘...आणि प्राण’ हे चरित्रही असंच वाचनीय आहे. विसाव्या शतकाच्या मध्यकाळात प्राणची खलनायकी लोकांच्या मनात इतकी खोलवर रुजली की, कोणतीही आई आपल्या मुलाचं नाव प्राण ठेवत नसे! प्राण यांनी नायक, खलनायक व चरित्रनायक म्हणून ३५०पेक्षा अधिक चित्रपटांत काम केलं. प्राण यांचा जन्म १२ फेब्रुवारी १९२०ला दिल्लीतील एका गडगंज पंजाबी कुटुंबात झाला. त्याचे वडील सरकारी कंत्राटदार होते. चार भाऊ व तीन बहिणी अशा भरगच्च कुटुंबात राहणाऱ्या प्राणला शिक्षणात मोठी गती होती; गणितात ते अव्वल होते. वडिलांच्या बदल्यांमुळे शिक्षणाकडं दुर्लक्ष झालं व मॅट्रिकच्या परीक्षेनंतर प्राणनं फोटोग्राफीचा व्यवसाय सुरू केला. व्यवसायाच्या निमित्तानं ते सिमल्यात पोचले व तेथील रामलीला कार्यक्रमात सीतेची भूमिका करीत ते अभिनयाच्या क्षेत्रात उतरले! प्राण यांनी १९४७पर्यंत २२ चित्रपटांमध्ये भूमिका केल्या; मात्र फाळणीमुळे त्यांच्या कारकिर्दीला ब्रेक बसला. नायकाच्या भूमिका मिळणं बंद झालं. मुंबईत प्राणना मोठा संघर्ष करावा लागला. मात्र, १९४८मध्ये देवआनंद व कामिनी कौशल यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘जिद्दी’ या चित्रपटात त्यांना खलनायकाची भूमिका मिळाली व घौडदौड पुन्हा सुरू झाली. दिलीपकुमार, देव आनंद व राज कपूर यांच्या चित्रपटांमध्ये १९५० व ६०च्या दशकांमध्ये ते खलनायक म्हणून झळकत राहिले. त्यांच्या वाट्याला बदल म्हणून काही विनोदी भूमिकाही आल्या. ‘उपकार’ या मनोजकुमार यांच्या चित्रपटानं त्यांना चरित्रनायकाचा नवा चेहरा दिला. अमिताभ बच्चन यांच्याबरोबरच्या त्यांच्या अनेक भूमिका नंतरच्या काळात गाजल्या. वाढतं वय व आजारपणामुळं १९९७नंतर त्यांनी चित्रपटांमध्ये काम करणं थांबवलं. मात्र, पडदा व्यापून टाकणारी त्यांची अदा, भेदक डोळे, चीड आणणारी संवादफेक व आणि कठोर राहून प्रेम करणाऱ्या प्राण यांचं चरित्र प्रेक्षकांना समृद्ध अनुभव देतं. 

जुन्या-नव्या कलाकारांची अशी चरित्रं वाचत गेल्यास आपलं भावविश्‍व समृद्ध होतं, एवढं नक्की. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Famous Bollywood personalities dilip kumar praan auto biography