esakal | 'आधी तुझ्या सिनेमांच्या तिकिटांबद्दल बोल'; लशीच्या किंमतीबद्दल बोलणारा फरहान ट्रोल

बोलून बातमी शोधा

farhan akhtar
'आधी तुझ्या सिनेमांच्या तिकिटांबद्दल बोल'; लशीच्या किंमतीबद्दल बोलणारा फरहान ट्रोल
sakal_logo
By
स्वाती वेमूल

कोरोना प्रतिबंधक ‘कोव्हिशिल्ड’ लशीची खुल्या बाजारातील किंमत इतर देशांच्या तुलनेत भारतात जास्त असल्याची चर्चा सुरू आहे. सर्व राज्यांच्या सरकारी रुग्णालयांसाठी ४०० रुपये तर खासगी रुग्णालयांसाठी ६०० रुपये आणि केंद्र सरकारच्या रुग्णालयांना १५० रुपयांत लशीचे डोस देण्यात येणार आहेत. लशींच्या किंमतींवरून अभिनेता फरहान अख्तरने प्रश्न उपस्थित केला होता. 'कोव्हिशिल्ड ही लस केंद्राला ज्या किंमतीत मिळतेय, त्याच किंमतीत राज्याला का नाही मिळू शकत, हे सीरम इन्स्टिट्यूटचे प्रवक्ते समजावून सांगू शकतील का? जर काही कारणांमुळे त्यांनी ही किंमत ठरवली असेल तर ती कारणं सांगा', असं ट्विट फरहानने केलं होतं. आता लस उत्पादक कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. मात्र त्यानंतर सोशल मीडियावर फरहानला जोरदार ट्रोल करण्यात येत आहे.

लस महाग असल्याच्या चर्चांवर 'सीरम'चं स्पष्टीकरण

सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला निवेदनात म्हणाले, ‘‘जगभरातील लशींच्या किंमतीशी भारतातील किंमतीची तुलना करणे अयोग्य असून, 'कोविशिल्ड'ची लस सध्या बाजारात उपलब्ध लशींपैकी परवडणारी लस आहे. ज्या देशांनी उत्पादनासाठी निधी पुरवला होता, अशा देशांमध्ये लशीची सुरुवातीची किंमत अत्यंत कमी ठेवण्यात आली आहे. भारतासह जगभरातील सरकारी लसीकरण मोहिमेसाठी ही लस अत्यंत कमी किंमतीत उपलब्ध करून देण्यात आली आहे.’’

फरहान अख्तर ट्रोल

चित्रपट तिकिटांच्या किंमतींशी तुलना करत नेटकऱ्यांनी फरहानला ट्रोल केलं आहे. 'चित्रपट किती बजेटमध्ये बनतो आणि प्रेक्षकाकडून तिकिटाची किती रक्कम घेतली जाते', असा सवाल नेटकऱ्यांनी फरहानला केला आहे. तर व्हॅक्सिन आणि व्हायरस यांबद्दल सखोल माहिती नसतानाही लशींच्या किंमतीबद्दल प्रश्न विचारणारा फरहान मूर्ख आहे, असं काहींनी म्हटलंय.