esakal | शूटिंगदरम्यान घोड्याचा मृत्यू; मणी रत्नम यांच्याविरोधात गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

mani ratnam

शूटिंगदरम्यान घोड्याचा मृत्यू; मणी रत्नम यांच्याविरोधात गुन्हा दाखल

sakal_logo
By
स्वाती वेमूल

दिग्दर्शक मणी रत्नम Mani Ratnam आणि त्यांची टीम गेल्या काही महिन्यांपासून पोन्नीयन सेल्वानच्या Ponniyin Selvan शूटिंगमध्ये व्यग्र आहे. युद्धकालीन कथेवर चित्रपट आधारित असल्याने निर्मात्यांनी शूटिंगदरम्यान घोड्यांचा वापर केला आहे. शूटिंग करत असताना एका घोड्याला दुखापत झाली आणि त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी PETA ने (People for Ethical Treatment of Animals) तक्रार दाखल केली असून त्यानंतर अब्दुल्लापुरमेट पोलिसांनी एफआयआर दाखल केली. मद्रास टॉकीजचे व्यवस्थापन (मणी रत्नम यांचं प्रॉडक्शन हाऊस) आणि घोड्याचे मालक यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे. या एफआयआरनंतर पशु कल्याण मंडळाने मणी रत्नम यांना चौकशीसाठी बोलावलं आहे.

पोन्नीयन सेल्वान या चित्रपटाचं शूटिंग सध्या मध्य प्रदेशात सुरू आहे. ऐश्वर्या राय बच्चन, चियान विक्रम, त्रिशा, जयम रवी, कार्ती आणि प्रकाश राज हे कलाकार सध्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. हैदराबादमध्ये शूटिंग सुरू असताना संबंधित दुर्घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. हैदराबादमध्ये पोन्नीयन सेल्वानच्या शूटिंगदरम्यान एका घोड्याचा मृत्यू झाला. पेटा इंडियाला याबद्दलची माहिती मिळताच त्यांनी तक्रार दाखल केली. अब्दुल्लापुरमेट पोलिसांनी कलम ११, पीसीए कायदा, १९६० आणि भारतीय दंड संहितेचा, १८६० च्या कलम 429 अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे.

हेही वाचा: शाहीर साबळेंच्या आयुष्यावर 'महाराष्ट्र शाहीर' चित्रपट; केदार शिंदेंचं दिग्दर्शन

PETA इंडियाच्या मुख्य वकिली अधिकारी खुशबू गुप्ता तक्रारीत म्हणाल्या, "कम्युटर जनरेटेड इमेजरीच्या (CGI) युगात निर्मात्यांनी थकलेल्या घोड्यांना युद्धाच्या सीनसाठी धावायला भाग पाडण्याचे काही कारण नाही." संबंधित घोड्याच्या मालकाने पोन्नीयन सेल्वानच्या निर्मात्यांना थकलेले घोडे शूटिंगसाठी दिले होते, अशी माहिती समोर येत आहे. एफआयआरनंतर भारतीय पशु कल्याण मंडळाने हैदराबादचे जिल्हाधिकारी आणि तेलंगणा राज्य पशु कल्याण मंडळ यांना घोड्याच्या मृत्यूबद्दल चौकशीसाठी बोलावलं आहे.

loading image
go to top